वजन कमी करणं हे सोपं काम नाही. खरंतर हा एक दीर्घ प्रवास आहे. आज सुरुवात केली आणि लगेच वजन कमी झालं असा चमत्कारिक परिणाम वजन कमी होण्याच्या प्रक्रियेबाबत घडत नाही. एक एक पायरी, एक एक टप्पा ओलांडत हा वजन कमी करण्याचा प्रवास करावा लागतो. या प्रवसात काय खाणं टाळायला हवं हे समजून घेणं जितकं महत्त्वाचं तितकंच काय खायला हवं , कसं आणि कधी खायला हवं हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. कुठलीही एक गोष्ट खाल्ली आणि वजन कमी झालं असं होत नाही. अभ्यासकांनी वजन कमी होण्यासाठी काही पदार्थांचे मेळ अर्थात फूड कॉम्बीनेशन्स सूचवले आहेत. अभ्यासकांच्या मते हे फूडकॉम्बीनेशन्स केवळ वजनच कमी करतात असं नाही तर त्यांच्यामुळे चयापचय क्रिया सुधारुन पचन नीट होतं, परिणामी वजन लवकर कमी होण्यास मदत होते. काही विशिष्ट फूड कॉम्बिनेशन्समुळे वजन कमी होण्यासोबतच पोटात गॅस होणं, पोट फुगणं या समस्याही बर्या होतात. अभ्यासकांनी वजन कमी करण्यासाठी चार प्रकारचे फूड कॉम्बीनेशन्स सूचवले आहेत.
1. ग्रीन टी-लिंबू-पुदिना
छायाचित्र- गुगल
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त असतो. ग्रीन टी आणखी प्रभावी आणि परिणामी करण्यासाठी ग्रीन टीमधे लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं घालावीत. ग्रीन टी मधे लिंबाचा रस आणि पुदिना घातल्यानं पोटावरची चरबी कमी होते. ग्रीन टीमधे भरपूर अँण्टिऑक्सिडण्टस असतात. म्हणूनच ग्रीन टीमधे लिंबाचा रस आणि पुदिना घातल्यास वजन लवकर कमी होतं.
2. अननसाचं ज्यूस- लिंबू
छायाचित्र- गुगल
अननसात भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे अननसामुळे शरीरात पाणी भरपूर जातं , त्यामुळे शरीरातील उष्मांक कमी होतात. अननसाचं ज्यूस पिल्यानं पोट भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं. अननसाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अननसात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. अननसाचं सेवन केल्यानं त्यातील फायबरमुळे पचन सुधारतं. अननसाच्या रसात थोडं लिंबू पिळून घातलं तर वजन कमी होण्यास मदत होते.
3. अंडं-शिमला मिरची
छायाचित्र- गुगल
अंड्यात प्रथिनं भरपूर असतात. अंड्यासोबत सिमला मिरचीचं सेवन केल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो. अंड्यात जीवनसत्त्वं, आरोग्यदायी फॅटस आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. शिमला मिरचीत अंड एकत्र करुन खाल्ल्यास सिमला मिरचीतील क जीवनसत्त्वं शरीरात जातं. अंड्यातील गुणधर्म आणि सिमला मिरचीतील गुणधर्म यांचा एकत्रित परिणाम शरीरातील चरबीचं ज्वलन होण्यास प्रोत्साहन मिळतं. तसेच अंडं आणि सिमला मिरचीच्या एकत्रित सेवनामुळे कर्बोदकांचं रुपांतर उर्जेत होण्यास मदत मिळते.
4. डाळ- टमाटा
छायाचित्र- गुगल
वेटलॉससाठी अनेकजण डाळींचा वापर जास्त करतात. डाळींमुळे वजन कमी होण्यास फायदा होतो हे खरेच आहे . पण यासाठी डाळी या सूपच्या स्वरुपात सेवन करायला हव्यात. यामुळे शरीरात उष्मांक कमी जातात आणि पोट जास्त काळ भरलेलं राहातं. डाळीचं सूप हे घट्ट असता कामा नये. ते पातळ असायला हवं. शिवाय डाळीच्या सुपात टमाट्याचा वापर अवश्य करावा. टमाट्यातील गुणधर्म शरीरातील सूज, दाह कमी करतात. तसेच अनेकांना जेवल्यानंतर भूक भागल्यासारखं होत नाही. त्यामुळे आणखी काही खाल्लं जातं जे पुढे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. ही समस्या डाळीत जर टमाटा घालून ते सूप घेतल्यास कमी होते. यामुळे वजन कमी होण्यासही फायदा होतो.