Join us  

"व्हिटॅमिन सी'साठी गोळ्या कशाला, ही भाजी, फळं खा, त्यात आहे भरपूर इम्युनिटी बुस्टर व्हिटॅमिन सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 7:46 PM

पावसाळा आणि भजी हे जसं समीकरण आहे ना, तसंच पावसाळा आणि आजारपण यांचं नातंही अगदी जवळचं आहे. साथीच्या आजारांनी या दिवसात डोकं वर काढलेलं असतंच त्यात यंदा पुन्हा कोरोनाची भर. म्हणून जर या दिवसांत तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर इम्युनिटी बुस्टर असणारी ही फळे तुम्ही आवर्जून खावीत.

ठळक मुद्देव्हिटॅमिन सी मधून शरीराला मोठ्या प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स मिळत असतात. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यासाठीही व्हिटॅमिन सी खूप उपयुक्त ठरते. याशिवाय कॅन्सर, न्युरोडीजनरेटीव्ह डिसिज, डायबेटीज होण्याची शक्यताही व्हिटॅमिन सी च्या सेवनाने कमी होऊ शकते. 

पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजार वाढलेले असतात. सर्दी, खोकला, पडसे तर या काही दिवसातले अगदी नेहमीचेच आजार. या आजाराची लागण होऊ द्यायची नसेल, तर स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा त्यावरचा एकमेव इलाज. याशिवाय कोरोनाची तिसरी लाट पुन्हा एकदा जोरदार धडकणार असल्याचे संकेतही वारंवार आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनासकट इतर सगळ्याच साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण तयार असणे गरजेचे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा उत्तम स्त्रोत म्हणजे व्हिटॅमिन सी. मग पावसाळ्यात इम्युनिटी वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी च्या गोळ्या घेण्यापेक्षा ही काही फळे नक्की खा.

 

संत्रे हा व्हिटॅमिन सी चा मोठा स्त्रोत असतो. आपल्या शरीराला दररोज ९० मिलिग्रॅम व्हिॅटॅमिन सी ची गरज असते. एक मध्यम आकाराचे संत्रे खाल्ले, तर त्यातून ७० मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते. पण संत्र्यांपेक्षाही अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी चा पुरवठा करणारे काही फळं आहेत, हे इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

ही फळे वाढवतील इम्युनिटी

१. किवी एका मध्यम आकाराच्या किवीतून आपल्याला ७१ मिलिग्रॅम एवढे व्हिटॅमिन सी मिळते. किवी आकाराने लहान असते. त्यामुळे दोन किवी आपण एकावेळी सहज खाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर शरीराची झीज भरून येण्यासाठी आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी रूग्णाला किवी खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

२. स्ट्रॉबेरीस्ट्रॉबेरी हा व्हिटॅमिन सी चा मोठा सोर्स आहे. आपण दोन ते तीन स्ट्रॉबेरी खाल्ल्या तर आपल्याला एका मोठ्या संत्र्यातून जेवढे व्हिटॅमिन सी मिळते, त्यापेक्षाही जास्त मिळू शकते. याशिवाय अनेक आजार दूर करण्यासाठीही स्ट्रॉबेरी अत्यंत गुणकारी ठरते.

 

३. ब्रोकोलीएरवी अनेक जणांना ब्रोकोली खायला फारसे आवडत नाही. पण एखादा कप जर ब्रोकोली खाल्ली तर ती तुम्हाला ९० मिलिग्रॅम एवढे व्हिटॅमिन देऊ शकते. ब्रोकोली नियमितपणे खाल्ली तर कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो, असाही संशोधकांचा अभ्यास आहे.

 

४. यलो बेल पेपरयलो बेल पेपर म्हणजेच आपली बोली भाषेतली पिवळी सिमला मिरची. वाचून आश्चर्य वाटेल, पण एक कप जर पिवळया सिमला मिरचीचे तुकडे घेतले तर त्यातून आपल्याला २७५ मिलीग्रॅम एवढे व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे आता हिरव्या सिमला मिरचीसोबत पिवळी सिमला मिरचीही आणत जा. 

टॅग्स :अन्नफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स