नाश्ता हा नेहमी पोटभरूनच केला पाहिजे असे म्हणतात. कारण रात्रीच्या जेवणानंतर पडलेला मोठा गॅप भरून काढायचा असतो. शिवाय दिवसभरासाठी आपल्याला फ्रेश आणि ताजेतवाणेही रहायचे असते. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, दुध, सुकामेवा असे पौष्टिक पदार्थ खावेत, असा सल्ला डॉक्टर देत असतात. पोहे, उपमा, इडली, डोसा असा कोणताही नाश्ता केला तरी तुमच्या ब्रेकफास्टला अधिक पौष्टिक बनविण्यासाठी खालील पदार्थातला एखादा पदार्थ तरी रोजच्या नाश्त्यामध्ये असायलाच हवा.
१. पपई
पपईमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही मिळते. त्यामुळे सकाळचा नाश्ता करण्याच्या ५ ते १० मिनिटे आधी पपई खाणे चांगले असते. दिवसाची सुरूवात फळे खाऊन करणे कधीही चांगले. सकाळच्या वेळी पपई खाल्ल्याने पचनाचे त्रास दूर होतात.
२. सफरचंद
व्हिटॅमिन ए, सी यासोबतच फायबर, लोह, पोटॅशियम आणि इतर अनेक खनिजे सफरचंदमध्ये विपूल प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी एक सफरचंद आवर्जून खावे. यामुळे ॲसिडीटी, कॉन्स्टिपेशन असे त्रास कमी होतात आणि पचनसंस्था सुधारते.
३. काकडी
काकडी हा थंड पदार्थ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ब्रेकफास्टमध्ये काकडी खात जावी. काकडीमध्ये असणारे द्रव्य पचन क्रियेसाठी पोषक असते. पोटातील उष्णता कमी करून अन्न पचविण्याचे कामही काकडी करते. तसेच पित्ताचा त्रासही काकडी खाल्ल्याने कमी होतो.
४. केळी
उत्तम आरोग्यासाठी केळी हा सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. केळीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनासाठी केळी खाणे कधीही चांगले. ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी केळी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते.
५. ग्रीन टी
सकाळचा नाश्ता झाल्यावर ग्रीन टी घेणे चांगले असते. ग्रीन टी मध्ये असणारे घटक तुमच्या शरीराला उत्तेजना देतात आणि टवटवीत ठेवतात. मेंदूलाही ॲक्टीव्ह बनवितात. त्यामुळे पोटभर नाश्ता केल्यानंतर ग्रीन टी घेण्यास काहीच हरकत नाही.