अस्वस्थ वाटणं, तगमग होणं , जीवाची काहिली होणं, अंगाची लाहीलाही होणं हे असं उन्हाळ्यात नेहेमीचं घडतं. पण आपण काय करतो पंखा लावतो, फ्रीजमधलं पाणी किंवा एखादं सरबत पितो, तात्पुरतं थंड वाटतं की पुन्हा तगमग सुरुच. उन्हाळ्यातल्या या त्रासाचा उपाय केवळ बाहेरुन करुन कसा चालेल? शरीराला आतून थंडावा देणाऱ्या नैसर्गिक गोष्टी जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत या समस्या अशाच छळणार. उन्हाळ्यातली तमगम कशी कमी होणार या प्रश्नाचं उत्तर छतावरील पंख्याकडे किंवा स्वयंपाकघरातील फ्रीजकडे नसून आपल्या ताटातल्या भाज्यांमधे आहे. खास उन्हाळ्यात जाणवणाऱ्या समस्यांचा विचार करुन कोणत्या भाज्या खाव्यात याचा विचार आहारतज्ज्ञांनी अगदी कारणांसह केला आहे. या भाज्या उन्हाळ्यातील शरीराच्या पोषणाची गरज भागवतात आणि शरीराला थंडावा देत उन्हाळ्याचा जाच कमी करतात.
थंडावा देणाऱ्या भाज्या.१ काकडी- उन्हाळा म्हटलं की काकडी ही हवीच. काकडी ही बहुगुणी आहे. काकडी ही प्रामुख्यानं कच्ची खाण्यातच फायदा आहे. पण काही ठिकाणी रस्सम सारख्या पदार्थात काकडी घातली जाते. काकडीत भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे रोज काकडी खायलाच हवी. त्यामूळे शरीरातला ओलसरपणा टिकतो. काकडीत अॅण्टिऑक्सिडण्टस, के आणि क जीवनसत्त्वं असतात त्याचाही फायदा शरीराला मिळतो.
२ टोमॅटो- फळ की भाजी हा वाद टोमॅटोबाबत होतोच पण टोमॅटोचं स्थान आणि महत्त्व भारतीय आहारात निर्विवाद आहे. टोमॅटो कच्चा सलाड स्वरुपात, ज्यूस, करी, सॉस, सूप या कोणत्याही प्रकारात खाल्ला तरी फायदेशीर आहे. टोमॅटो शरीराला आतून ओलावा देतो कारण टोमॅटोत ९४ ते ९५ टक्के पाणी असतं. लायकोपेनीसारखे अॅण्टिऑक्सिडण्टस आणि क आणि के जीवनसत्त्वं, पोटॅशिअम आणि कॅल्शिअमसारखी खनिजं असतात. जी शरीराला ओलाव्यासह पौष्टिक गुणधर्मही पुरवतात.
३ भोपळा- भाज्यांमधे गुणवाण भाजी म्हणून आधी भोपळ्याचा नंबर लागतो. साध्या भाजीपासून कोफ्ताकरी, मुटकुळे, थालीपीठ असे चविष्ट प्रकार भोपळ्यापासून करता येतात. भोपळ्यात पाण्याचा अंश मोठ्या प्रमाणात असतो . हाडांना मजबूत करणारं कॅल्शिअम त्यात असतं. पोटाच्या अनेक समस्यांवर भोपळा गुणकारी आहे. शिवाय हाय कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम भोपळा करतं म्हणून कोणत्या ना कोणत्या स्वरुपात भोपळा वरचेवर खायलाच हवा.
४ वांगी- वांगे हे पौष्टिक असतात हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल पण वास्तव तेच आहे. वांग्यांमधे तंतूमय घटक भरपूर असतात त्यामूळे आतड्यांचं आरोग्य सांभाळलं जातं. शिवाय वांग्यात फ्लेवोनिडस, जीवनसत्त्वं आणि पोटॅशिअम असतं. एकूण आरोग्याचा विचार करता वांगे आहारात असणं आवश्यक आहे.
५ डांगर- पोळीसोबत भाजी म्हणून ते उपवासाला खीर म्हणून डांगर अनेक प्रकारे खाता येतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं अ जीवनसत्त्वं, अॅण्टिऑक्सिडण्टस, बेटा केरोटीन डांगरात असल्यानं हदयाचं आरोग्य चांगलं राहातं. शिवाय या गुणांंमुळे डांगर शरीराला थंडावाही देतं.
६ कारलं- कारलं चवीला अनेकांना आवडत नाही पण त्यातले गुणधर्म बघता चवीकडे दुर्लक्ष करुन त्याचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. कारल्यात कॅल्शिअम, क जीवनसत्त्वं, लोह आणि पोटॅशिअम असतं. कारल्यानं पचनक्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित राहाते. त्यामुळे शरीर बाहेरच्या उष्णतेशी ताकदीनं लढू शकतं.
७. हिरव्या पालेभाज्या- पालक, तांदुळका, पुदिना या पालेभाज्या उन्हाळ्यात शरीरास आवश्यक असलेला नैसर्गिक थंडावा देतात. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्यात लोह आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. या पालेभाज्या उन्हाळ्यात फायदेशीर असतात कारण यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं.
८ सिमला मिरची- रंग आणि चवीमूळे सिमला ही बहुतेकांची आवडती भाजी आहे. पण ही केवळ चवीनं आणि रुपानंच गुणवान नाही तर पौष्टिक गुणधर्मांनी श्रीमंत आहे. यात असलेल्या फायटोकेमिकल्समुळे सिमल्याला विशिष्ट चव असते. शिवाय हे रसायन पचनक्रिया सुधारतं. वजन कमी करण्यास, वेदनामुक्तीसाठी ही भाजी उपयुक्त आहे. सिमला मिरचीत जीवनसत्त्वं आणि अॅण्टिऑक्सिडण्टस असल्यानं उन्हाळ्यातल्या आहारात सिमलाचा समावेश अवश्य करावा.
९ घेवडा- घेवडा ही भारतीय स्वयंपाकघरातली मुख्य भाजी आहे. साध्या भाजीपासून व्हेज पुलावापर्यंत सर्व ठिकाणी तिची गरज असते. कमी उष्मांकामुळे वजन कमी करण्यासाठी ही भाजी आवश्यक मानली जाते. घेवडा ही पचण्यास हलकी असते शिवाय तिच्यात तंतूमय घटक असल्यानं उन्हाळ्यात ही प्रामुख्यानं खायला हवी. घेवड्यात के जीवनसत्त्वासोबतच हाडांचं आरोग्य सांभाळणारे गुणधर्म असतात शिवाय प्रथिनं, लोह, झिंक आणि अॅण्टिऑस्किडण्टसही असतात.
१० गाजर - डोळ्यांचं, पोटाचं आरोग्य सांभाळणारे गाजर फक्त उन्हाळ्यातच नाही तर कूठल्याही ॠतूत खाणं आवश्यक असतात. गाजरात बी६ हे जीवनसत्त्व, मॅग्नेशिअम, फोलिक अॅसिड आणि अॅण्टिऑक्सिडण्टस हे महत्त्वाचे घटक असतात. यात तंतूमय घटक असल्यामुळे ते पटकन पचतात. उन्हाळ्यात काही हलकं फुलकं हवं असल्यास ती गरज गाजर भागवतं.