वीकेण्ड आनंदानं जाण्यासाठी मस्त हेल्दी वीकेण्ड म्हटलं की रोजच्या रुटीनमधून थोडं सुटल्यासारखं वाटतं. आठवडाभर व्यायामाचं, आहाराचं रुटीन पाळून कंटाळा आलेला असतो त्यामुळे वीकेण्डला सरळ सर्व नियम गुंडाळून मजा करण्यावर भर असतो. पण वीकेण्डला आहार नियमांची तोडमोड केल्यास, लोळत पडून नुस्ता आराम केल्यास आठवड्याचा पहिला दिवस जड जातो. इतकंच नाही तर आठवड्याचे पाच दिवस आपण आपल्या आहाराचे नियम पाळून, शिस्तशिर व्यायाम करुन जे कमावलेलं असतं ते वीकेण्डच्या दोन दिवसात स्वत:ला खाण्या पिण्याच्या बाबत सैल सोडल्याने गमावण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून वीकेण्डसाठी आहार विहाराचे नियम ठरवून त्याप्रमाणे वागल्यास वीकेण्ड छान जातो आणि नवीन आठवड्याची सुरुवातही छान होते.
वीकेण्डचं नियोजन करताना....
- वीकेण्डचं आरोग्यदायी नियोजन करणं हे सुट्टीचा दिवस सत्त्कारणी लागण्यासाठी फार गरजेचं आहे. नियोजन करणं म्हणजे सुट्टीचा दिवसही नियमांनी बांधून टाकणं नव्हे. तर आज दिवसभरात मी काय करणार, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मुलांसोबत, कुटुंबासोबत काय करणार याचा एक आराखडा डोक्यात तयार असायला हवा. त्यामूळे सुट्टीच्या दिवसालाही छान उद्देश मिळतो. आणि आज सुट्टी काय करायचं या विचारांनी चिडचिड होत नाही. वीकेण्ड असला तरी त्या दिवसाला रंग रुप आकार उकार देण्याचं काम आपण करु शकतो. आरोग्य, फिटनेस आणि आनंद या तीन गोष्टी डोळ्यापुढे ठेवून नियोजन केल्यास पुढच्या अख्ख्या आठवड्यासाठी आनंद आणि उर्जा मिळते
- बऱ्याचदा वीकेण्डच्या संपूर्ण दिवसात काय खायचं प्यायचं याचं नीट नियोजन नसल्याने अनेकींची पोट बिघडण्याची तक्रार असते. त्यामुळे सूट्टीच्या दिवशी आधी आरोग्यदायी नाश्त्याला महत्त्व द्यावं. पोटभरीचा पौष्टिक आणि वेगळा नाश्ता केल्यास चयापचयाची क्रिया नीट होते. भूक भागते. सारखं काही बाही खाण्याची इच्छा होत नाही. आठवड्याचे पाच दिवस जो नाश्ता केला जातो त्यापेक्षा वेगळा नाश्ता हवा. त्यात वेगळेपणा, चटपटीतपणा यासोबतच पोषणाचा विचार हवा. घरातल्या सगळ्यांनी मिळून काय करायचं हे ठरवल्यास उत्तम पर्याय सापडतो.
- नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण याचं नियोजन करताना आपल्या पोटात प्रथिनं जायलाच हवीत हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून भाज्या, फळं, कडधान्यं यांचा समावेश करावा. आहारातले हे घटक पोटभर खाल्ल्याचा आनंद आणि समाधान देतात. अनेकांना आज काय सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे आज शिस्तशीर न जेवता येता जाता काही तरी खात राहाण्याची सवय असते. यामुळे हवं ते खाण्याचा तात्कालिक आनंद मिळण्यापलिकडे फार काही मिळत नाही. पोट भरत नाही उलट बिघडतं. आवडीच्या पदार्थांचा समावेश करुन नाश्ता, दूपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेतल्यास सुट्टीच्या दिवशी पोट जड न वाटता छान हलकं फुलकं राहातं. सुट्टीतले खाण्याचे नियम सुट्टीच्या दिवसातला उत्साह टिकवून ठेवतो.
- वीकेण्डला अनेकांचं बाहेर जेवण्याचं प्लॅनिंग असतं. खाण्याच्या नियमासाठी बाहेर जाऊन जेवण्याचं रद्द करण्याचं काही कारण नाही. पण बाहेर हॉटेलमधे खाताना आपण काय खातो आहोत याचं पूर्ण भान असायला हवं. आवडीच्या पदार्थांसोबतच सॅलेड,सूप यांचं सेवन महत्त्वपूर्ण आहे. पावाचे, ब्रेडचे पदार्थ टाळायला हवेत. मागवलेल्या पदार्थाचं प्रमाण खूप असेल तर तिथेच संपवण्याचा अट्टाहास न करता उरलेला पदार्थ पॅक करुन घरी आणावा. घरी भूक लागल्यास किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा उपयोग होऊ शकतो.
- घरी तळलेलं, बेक केलेलं , चटपटीत खायचं असल्यास ते जरुर खावं. पण त्या पदार्थांमधे जाणिवपूर्वक पौष्टिक आणि तंतूमय घटकांचा समावेश करावा.
- वीकेण्ड आहे म्हणून रोज जो व्यायाम करतो तोच या दिवशीही करावा याचा आग्रह नाही. मात्र दिवसभरात सुस्तावल्यासरखं न वाटण्यासाठी उत्साहवर्धक कृती करणं जास्त चांगलं. यासाठी सकाळी लवकर उठून सहकुटुंब चालायला जाणं, किंवा मैदानी खेळ खेळणं अशा कृती केल्यास कुटुंबासोबत वेळ घालवता येतो आणि काहीतरी छान केल्याचं समाधान मिळतं. या कृतीने दिवसभरासाठीची ऊर्जा मिळते.
- वीकेण्डचा योग साधून संपूर्ण आठवड्याचं डाएट नीट प्लॅन करुन ठेवता येतं. त्यामुळे रोज उठून काय करायचं? हा प्रश्न छळत नाही. आणि काही बाही पर्यार्य निवडण्याची किंवा तेच तेच खातोय असं वाटण्याची वेळ येत नाही. सुट्टीच्या दिवशी सगळ्यांची मदत घेऊन संपूृर्ण आठवड्याचं डाएट प्लॅन केल्यास वेगवेगळ्या पदार्थांचं नियोजन करता येतं. आणि त्यासाठी घरात काय आहे नाही याचा कानोसा घेऊन तशी तजवीज करुन ठेवण्यासाठी वेळही हाताशी असतो.