वाढलेलं वजन कमी करायचं हा अनेकांपुढील एक मोठा प्रश्न असतो. वजन वाढलं की आपण बेढब दिसतो ही एक गोष्ट झाली. पण त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात हेही तितकेच खरे. त्यामुळे वेळीच वजन आटोक्यात आणलेले केव्हाही चांगले. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या चुकीच्या वेळा, जंक फूड, ताण यांमुळे वजन वाढते. एकदा वजन वाढायला लागले की ते काही केल्या कमी होत नाही (Weight Loss Tips 6 Super food From Kitchen).
नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल. यामध्ये व्यायाम, डाएट यांसारख्या बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. भारतीय किचनमधील काही पदार्थ वजन कमी करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ते ५ पदार्थ कोणते आणि त्याचा काय फायदा होतो याविषयी समजून घेऊयात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ख्याती रुपाणी यांनी याबाबत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या याबाबत महत्त्वाची माहिती देतात.
१. कसुरी मेथी
पदार्थाला स्वाद आणणारा हा पदार्थ फायबर आणि लोहाचा महत्त्वाचा स्त्रोत असतो. पदार्थ चविष्ट होण्याबरोबरच शरीराचे पोषण व्हावे यासाठी कसुरी मेथी फायदेशीर ठरते. ज्यांना डायबिटीस आणि हृदयरोग आहे अशांनी आहारात आवर्जून कसुरी मेथीचा समावेश करायला हवा.
२. कडीपत्ता
आपण आहारात नियमितपणे फो़णीमध्ये घालण्यासाठी कडीपत्त्याचा वापर करतो. कडीपत्ता त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असतो. कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी, बी १२, कॅल्शियम आणि लोह हे घटक असतात. कडीपत्ता चावून खाल्ला तर कॅलरीज बर्न होण्यासाठी आणि शरीरात फॅटस साचू नयेत यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.
३. हळद
हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ असून अंटीबॅक्टेरीयल म्हणून हळदीचा उपयोग होतो. हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्यूमिन या घटकामुळे फॅटसच्या टिश्यूची वाढ कमी होते. वजन कमी होण्याबरोबरच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते.
४. तीळ
तीळामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस असतात. त्यामुळे चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी तीळ फायदेशीर असतात. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि इन्शुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा फायदा होतो.
५. दालचिनी
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून प्यायल्यास वजन कमी होण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
६. गवती चहा
गवती चहा मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. शरीर डीटॉक्स करण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही गवती चहा अवश्य घेऊ शकता.