खिचडी म्हणजे काही आजारी लोकांचं खाणं नाही. आज मोठ मोठ्या सेलिब्रेटी आनंदानं खिचडीचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करतात. आहारतज्ज्ञ देखील रोजच्या आहारात खिचडीचं महत्त्व सांगतात. खिचडीतील पोषक तत्त्वं शरीराचं पोषण करतात तसेच वजन कमी करण्यासाठीही खिचडी परिणामकारक असते. वजन कमी करण्यासाठी पाच प्रकारच्या खिचडी महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि या केवळ वजन कमी करत नाही तर त्या चविष्टही लागतात. अगदी दोन्ही वेळेस अशा स्वरुपाची खिचडी खायचं म्हटलं तरी कंटाळा येणार नाही.
पाच खिचडींची कमाल
डाळ खिचडी
छायाचित्र- गुगल
डाळ खिचडी हा पौष्टिक आहार आहे. या खिचडीसाठी मूग, तूर, हरभर्याची डाळही वापरता येते. डाळीत प्रथिनं, लोह, कॅल्शियम हे महत्त्वाचे घटक असतात. ही डाळ खिचडी खाल्ल्यास भरपूर वेळ भूक नियंत्रित ठेवता येते. खिचडीत प्रथिनं आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. तज्ज्ञ सांगतात की आठवड्यातून दोन दिवस खिचडी खाल्ल्यास वजन वेगानं कमी होतं.
डाळ खिचडी कशी कराल?
1 कप तांदूळ, 1 कप मुगाची डाळ, अर्धा वाटी मटार, 1 टमाटा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे, मीठ, दोन मोठे चमचे तूप आणि गरजेनुसार पाणी घ्यावं.
सर्वात आधी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. कुकरमधे तूप घालावं. तूप गरम झालं की आधी जिरे घालावेत. ते तडतडले की हिरवी मिरची, टमाटा आणि हिंग घालून हे चांगलं परतून घ्यावं. त्यानंतर डाळ, तांदूळ आणि मटार घालावेत आणि ते परतून घ्यावेत. यात तीन कप पाणी किंवा खिचडी जेवढी पातळ हवी आहे त्याप्रमाणात पाणी घालावं. कुकरला तीन चार शिट्या घेवून गॅस बंद करावा. कुकरची वाफ गेली की खिचडीवर वरुन कोथिंबीर पेरावी.
दलिया खिचडी
छायाचित्र- गुगल
दलिया आरोग्यास अतिशय फायदेशीर असतो. यात भरपूर पोषक घटक असतात. दलिया खिचडी खाल्ल्यानं उष्मांकाच्या सेवनावर नियंत्रण येतं आणि त्याचा फायदा वजन कमी होण्यास होतो. दलिया खिचडीमुळे बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.यात ब6 हे जीवनसत्त्वं, मॅग्नेशियम, लोह यासारखे पोष्टिक घटक असतात आणि दलिया खिचडीत उष्मांक मात्र कमी असतात.
दलिया खिचडी कशी कराल?
1 कप दलिया, 3 कप पणी, तूप, कांदा, गाजर, मटार, सिमला मिरची, फ्लॉवर, मीठ, हळद, हिंग, जिरे आणि हिरवी मिरची घ्यावी.आधी कढईत तूप घ्यावं. तूप गरम झालं की त्यात दलिया घालून तो तीन चार मिनिटं परतावा. हा दलिया नंतर कुकरमधे घालावा. त्यात मीठ घालावं. पाणी थोडं गरम करुन दलियात घालावं. मिश्रणाला उकळी आली की कुकरला दोन शिट्या घ्याव्यात.दलिया शिजेपर्यंत एका कढईत तूप घ्यावं. ते गरम झालं की त्यात कांदा परतून घ्यावा. नंतर फ्लॉवर, गाजर घालून ते परतून घ्यावं. मटार आणि टमाटा घालावा. नंतर कढईवर झाकण ठेवून भाज्यांना वाफ काढावी. टमाटा शिजेपर्यंत वाफ काढावी. नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची, हळद, तिखट, जिरे घालावेत. ते परतून पुन्हा दोन तीन मिनिटं कढईवर झाकण ठेवावं. कुकरमधे शिजलेला दलिया या भाज्यांमधे घालावा. दलिया भाज्यांमधे एकत्र करावा. एक दोन मिनिटं वाफ येवू द्यावी आणि शेवटी यावर कोथिंबीर पेरावी.
ओटस खिचडी
छायाचित्र- गुगल
ओटसमधे मोठया प्रमाणात मॅग्नीज, प्रथिनं, फायबर, लोह असतं. फायबरमुळे पचन क्रिया हळुवार होते. ओटस खिचडी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही.
ओटस खिचडी कशी कराल?
पाऊण कप क्विक कुकींग ओटस, पाऊन कप मूग डाळ, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, 1 छोटा कांदा, 1 टमाटा, 1 गाजर, हिरवे मटार, एक उंच आलं, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल , अडीच कप पाणी आणि कोथिंबीर.
प्रेशर कुकरमधे तेल गरम करावं. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालावेत. ते तडतडू द्यावेत. यात कापलेला कांदा घालून तो परतावा. नंतर बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची घालून हे परतून घ्यावं. नंतर यात हळद, लाल तिखट घालून लगेच टमाटा घालावा. टमाटा नरम होईपर्यंत परतावा. नंतर यात भाज्या, धुतलेली मुगाची डाळ आणि ओटस घालावेत. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. त्यात पाणी आणि मीठ घालावं. पाण्याला उकळी आली की कुकरला झाकण लावून ते 7-8 मिनिटं कुकरमधे शिजवावं. कुकरची वाफ गेल्यावर झाकण उघडावं. वरुन कोथिंबीर पेरावी.
मक्याची खिचडी
छायाचित्र- गुगल
मका आरोग्यासाठी लाभदायक असतो. यात असलेल्या फायबरमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. लवकर भूक लागत नाही.विविध भाज्या घालून ही मक्याची खिचडी पौष्टिक होते आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. मक्याची खिचडी ही गुजरात आणि राजस्थानमधे प्रामुख्यानं केली जाते.
मक्याची खिचडी कशी कराल?
2 कप जाडसर मक्याचे दाणे, 2 चमचे तूप, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा कप दूध, 1 कप पाणी, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला, एक मोठा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग , मीठ, ओलं खोबरं आणि कोथिंबीर एवढं जिन्नस घ्यावं.
सर्वात आधी कढईत तूप गरम करावं. तूप गरम झालं की त्यात मोहरी, जिरे घालावेत. ते तडतडले की हिंग, हिरवी मिरची घालून ती परतून घ्यावी. नंतर त्यात मक्याचे दाणे घालून पाच मिनिटं परतावेत. मका परतला गेल्यावर त्यात गरम मसाला, लाल तिखट, मीठ, साखर, पाणी आणि दूध घालावं. हे सर्व चांगलं हलवून घ्यावं. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून 10-15 मिनिटं मध्यम आचेवर ते शिजू द्यावं. मका शिजला की त्यावर लिंबाचा रस घालून पुन्हा दोन मिनिटं झाकण ठेवून ते शिजवावं. शेवटी कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं घालावं.
बाजरीची खिचडी
छायाचित्र- गुगल
बाजरीची खिचडी राजस्थानात खूप लोकप्रिय आहे. बाजरीत प्रथिनं, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम असे अनेक पोषक घटक असतात. यात उष्मांक मात्र कमी असल्यानं वजन कमी करण्यासाठी बाजरी खिचडी मदत करते. एक वाटी खिचडी खाल्ली की लवकर भूक लागत नाही.
बाजरीची खिचडी कशी कराल?
1 कप बाजरी, अर्धा कप हिरव्या सालाची मूग डाळ, अर्धा कप गाजर, अर्धा कप घेवडा, अर्धा कप वाटाणे, कांदा, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट आणि एक चमचा तेल लागतं.
आधी मुगाची डाळ धुवावी आणि ती अर्धा तास भिजवावी. बाजरी धुवावी आणि ती एक तास पाण्यात भिजत ठेवावी. कुकरमधे तेल घालावं. तेल तापलं की त्यात जिरे घालावेत. जिरे तडतडले की कांदा घालावा. कांदा लालसर झाला की त्यात गाजर घालावं. नंतर घेवडा, वाटाणे घालून ते चांगलं परतून घ्यावं. भाज्या नरम झाल्या की त्यात भिजवलेली मुगाची डाळ पाण्यासह आणि बाजरीही पाण्यासह घालावी. त्यात थोडं आणखी पाणी गरम करुन घालावं. मिर्शणाला उकळी आली की त्यात मीठ, लाल तिखट, हळद घालावी. थोडं आणखी गरम पाणी घालावं. मग कुकरला झाकण लावावं. कुकरला तीन शिट्या घ्याव्यात. दहा मिनिटं कुकर गार होवू द्यावा. शेवटी खिचडीवर कोथिंबीर पेरावी.