वजन वाढणं ही सध्या अतिशय सामान्य समस्या आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्येही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वजन वाढले की आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांनी वजन वाढत जाते. एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की ते कमी व्हायचे नाव घेत नाही. मग आपल्याला या वजनाचे काय करायचे असा प्रश्न पडतो आणि एकाएकी आपण काहीतरी डाएट सुरू करतो किंवा कधी भरपूर व्यायाम करतो. पण त्याचाही म्हणावा तितका लगेच फरक पडतोच असे नाही. पण आपल्याला फार वेळ घालवून चालणार नसतो आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वजन घटवायचे असते. अशावेळी घरच्या घरी काही सोप्या गोष्टी केल्यास शरीरावर जमा झालेली चरबी कमी होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पाहूया वाढलेले वजन कमी करण्यासाठी काय करायला हवे (Weight Loss Diet Tips)...
१. मेथ्या
मेथीचे दाणे चवीला कडू असल्याने एखाद्या पदार्थात हे दाणे असतील तर आपण ते बाजूला काढून टाकतो, पण असे करणे योग्य नाही. दररोज १० ग्रॅम मेथीचे दाणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मेथ्यांमध्ये विद्रव्य फायबर्स आणि ग्युकोमोनान फायबर्स असतात. या दोन्ही गोष्टी वजन कमी होण्यास उपयुक्त असल्याने दररोज आवर्जून मेथ्या खायला हव्यात
२. हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात असं आपण नेहमी ऐकतो. मात्र पालेभाजी किंवा इतर काही भाज्या समोर आल्या की आपण नाक मुरडतो आणि पोळी किंवा भाकरीसोबत दुसरं काही खायला आहे का ते पाहतो. मात्र तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा. पालेभाज्यांमुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते आणि शरीराचे उत्तम पोषण होते.
३. नाष्ता आणि जेवणाच्या मधे काय घ्यावे
सकाळचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणाच्या मधे आपल्याला काही ना काही खावेसे किंवा प्यावेसे वाटते. अशावेळी आपण चहा किंवा कॉफी काही गोड पदार्थ खातो. मात्र असे करणे योग्य नाही. या मधल्या वेळात तुम्ही फळं, ताक, नारळ पाणी असं काहीतरी घेतलं तर वजन कमी होण्यास त्याची चांगली मदत होते.
४. पोळी किंवा भाकरी खाताना
पोळी किंवा भाकरी ही त्या त्या ऋतूनुसार धान्य वापरा. भाकरी करताना त्यामध्ये दोन धान्य असतील तर अधिक चांगलं. त्यामुळे ती पचायला हलकी होते. गहू, मका, बार्ली, नाचणी असं ऋतूनुसार वेगवेगळी धान्य खाल्लेली केव्हाही चांगली.
५. गोड टाळा
अनेकांना नाश्ता किंवा जेवण झाल्यावर, मधल्या वेळात सतत गोड खावसं वाटतं. मात्र गोड खाण्याने आपण जास्त प्रमाणात कॅलरीज घेतो. अनेकदा गोड खायचं नाही म्हणून मध, गुलकंद, चॉकलेट, आईस्क्रीम अशा गोष्टी खाल्ल्या जातात. परंतु या गोष्टींमधून शरीराला विशेष पोषण तर मिळत नाही पण कॅलरीज जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी या पदार्थांचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर गोड पूर्णपणे बंद करायला हवं.