नाश्त्याला जे पदार्थ प्रामुख्याने केले जातात त्यात उपम्याचा समावेश होतो. उपमा हा रव्यापासून तयार केला जातो. पण वजन कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करावा लागतो. पोट भरायला हवं, शरीराला पोषण मिळायला हवं आणि महत्त्वाचं म्हणजे वजनही वाढायला नको. हे तीन उद्दिष्ट पूर्ण करणारा पदार्थ आपण नाश्त्याला नक्कीच करु शकतो. तो पदार्थ म्हणजे सातूचं पीठ आणि ओटसचा पौष्टिक उपमा.
छायाचित्र- गुगल
ओटससोबत सातूचं पीठ असल्यानं या उपम्यातून मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळतात. आणि यातील ओटसचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. ओटसमधे असलेल्या फायबरमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला सातूचं पीठ आणि ओटसचा उपमा हा उत्तम पर्याय आहे. भाज्यांचा वापर करुन हा उपमा आपण आणखी पौष्टिक करु शकतो.
छायाचित्र- गुगल
सातूचं पीठ आणि ओटसचा उपमा
हा उपमा करण्यासाठी 1 कप भाजून घेतलेले ओटस, 1 मोठा चमचा सातूचं पीठ, अडीच कप पाणी, 1 मोठा चमचा तूप, मोहरी, कढीपत्ता, एक इंच आलं बारीक चिरलेलं, एक हिरवी मिरची, पाव चमचा हिंग, एक कांदा बारीक चिरलेला, अर्धा कप उकडलेलं गाजर, अर्धा कप उकडलेल्या बीन्स, अर्धा कप उकडलेले स्वीट कॉर्न आणि मीठ एवढं जिन्नस लागतं.
छायाचित्र- गुगल
हा उपमा कसा करावा?
एका कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवावं आणि दुसर्या कढईत तूप गरम करावं. ते गरम झालं की त्यात मोहरी, कढी पत्ता, आलं, हिरवी मिरची, हिंग घालून ते व्यवस्थित परतून घ्यावं. नंतर त्यात कांदा घालावा आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतला गेला की त्यात एक कप भाजलेले ओटस घालावेत. ओटस परतले गेले की त्यात सातूचं पीठ घालावं. सर्व पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यावं. नंतर यात बारीक चिरलेल्या आणि उकडून घेतलेल्या भाज्या घालाव्यात. चवीनुसार मीठ घालावं. ते नीट मिसळून घेतलं की त्यात उकळलेलं पाणी घालावं. नंतर कढईवर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटं उपमा शिजू द्यावा. एक दोन मिनिटं मोठ्या आचेवर शिजवल्यानंतर मध्यम आचेवर उपमा शिजवावा. हा पौष्टिक उपमा गरम गरम खावा.
छायाचित्र- गुगल
उपम्यातील पौष्टिकता
सातूचं पीठ आणि ओटसचा उपमा पौष्टिक होतो तो या दोन घटकांमुळे तसेच त्यात घातल्या जाणार्या भाज्यांमुळे. ओटसमधे अँण्टिऑक्सिडण्टस आणि फायबर असतात. हे घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतात रक्तातील साखर नियंत्रित करतात. तर सातूच्या पिठात फायबर तर मोठ्या प्रमाणात असतातच शिवाय शरीरात ओलावा निर्माण होईल असे थंड गुणही त्यात असतात. सातूच्या पिठातला ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. सातूच्या पिठातील गुणधर्म पचन क्रिया सुरळीत करण्यासोबतच शरीराला ऊर्जा देतात.