आधुनिक जीवनशैलीचे जसे अनेक फायदे आहेत तसेच तोटेही. सर्वात मोठा तोटा म्हणजे वजन वाढणं. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात पण जोपर्यंत आपण आपल्या आहाराकडे जागरुकतेने बघत नाही, त्यात आवश्यक ते आरोग्यदायी बदल करत नाही तोपर्यंत वजन कमी होणार नाही हेही खरंच. वजन कमी करण्यासाठी आहारात मिश्र भाज्यांचं सॅलेडचा समावेश अवश्य करावा. मिश्र भाज्यांचं सलाड हा वजन कमी करण्याचा एक अतिशय साधा आणि हेल्दी पर्याय आहे. सध्या पावसाळा आहे. पावसाळ्यात भाज्या कच्च्या स्वरुपात खाणं हानिकारक ठरतं. म्हणूनच उकडलेल्या मिश्र भाज्यांचं सलाड हे पावसाळ्यात वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं.मिश्र भाज्यांचं सलाड तयार करणं अतिशय सोपं आहे. यात आपण हव्या तितक्या भाज्या घालू शकतो. सलाडद्वारे आपल्या शरीरात जास्तीत जास्त पोषक तत्त्वं जायला हवे असल्यास ते योग्य रितीने तयार करता यायला हवं.
छायाचित्र- गुगल
कसं बनवायचं ?
मिश्र भाज्यांचं सलाड तयार करण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑइल, 3 बेबी कॉर्न, 1 किंवा 2 टमाटे, 1 सिमला मिरची, 1 पिवळी सिमला मिरची, 2 गाजर, 8-10 घेवडा ,1 ब्रोकोली, मीठ आणि काळी मिरी पावडर एवढं जिन्नस घ्यावं.
सर्वात आधी ब्रोकोली गरम पाण्यात थोडा वेळ उकळून घ्यावी. यामुळे ब्रोकोली नरम होते. इतर सर्व भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात. एका कढईत ऑलिव्ह ऑइल घालावं. ऑलिव्ह ऑइल ऐवजी दुसरं कुठलं तेल किंवा बटरही वापरु शकतो. यात बेबी कॉर्न आणि सर्व कापलेल्या भाज्या घालाव्यात. त्यात थोडं पाणी घालून या भाज्या मंद आचेवर थोड्या उकडाव्यात. फक्त पाच मिनिटं हे सलाड उकडावं. नंतर यात चवीपुरतं मीठ आणि काळी मिरी पावडर घालावी.
छायाचित्र- गुगल
मिश्र भाज्यांचं सलाड खाण्याचे फायदे
1. या सलाडमधे सर्व प्रकारचे जीवनसत्त्वं, खनिजं, प्रथिनं असतात. हे सर्व घटक शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असतात.
2. या सलाडमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. हे सलाड खाल्ल्यानं फुट फुगण्याची समस्या होत नाही.
3. सलाड खाल्ल्यानं शरीर जड होत नाही. आळस येत नाही. यामुळे ऊर्जा मात्र भरपूर मिळते.
4. मिश्र भाज्यांचं सलाड खाल्ल्यानं भरपूर फायबर मिळतं. शरीरात ओलावा राहातो . यामुळे वजन कमी व्हायलाही मदत होते.
5. रोज मिश्र भाज्यांचं सलाड खाल्ल्यानं पचन क्रिया सुधरते.
छायाचित्र- गुगल
सलाड कच्चं खाऊ नये कारण..
पावसाळ्यात कच्चं सलाड खाऊ नये. या सलाडमधे कांदा, टमाटा, काकडी, मुळा चिरुनही टाकता येतो. पण पावसाळ्यात कच्च्या भाज्यांमुळे त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात भाज्यांमधे अनेक प्रकारचे किटाणू असतात. या किटाणूतून हानिकारक गॅस बाहेर पडतो. हा गॅस आरोग्यासाठी घातक असतो. म्हणूनच मिश्र भाज्यांचं सलाड हे ऑलिव ऑइलवर परतून थोडं शिजवून( उकडून) घेणं आवश्यक आहे. हे सलाड खाल्ल्यानं वजन झपाट्यानं कमी होतं आणि शरीराचं पोषणही होतं.