वजन कमी करणे हा सध्या अनेकांपुढील एक मोठा टास्क असतो. तारुण्यात बारीक असणारे आपण अगदी ३ ते ४ वर्षात भराभर जाड होत जातो आणि मग आपला बदललेला आकार, रुप पाहून आपल्यालाच आपली लाज वाटायला लागते. बैठे काम, कामाचा आणि अन्य गोष्टींचा असणारा ताण, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव यांमुळे वजन वाढता वाढता वाढे होत जातं. एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की ते नियंत्रणात येणे अवघड होते (Weight Loss Mistakes Diet Tips) .
मग हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मनानेच किंवा कोणी सांगितलेले काही ना काही उपाय करायला सुरुवात केली जाते. पण योग्य मार्गदर्शन न घेता अर्धवट माहितीवर असे प्रयोग करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. यामुळे वजन तर कमी होत नाहीच, पण इतर अनावश्यक त्रास सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरेशी माहिती न घेता वजन कमी करण्यासाठी कोणतेही प्रयोग करणे टाळलेलेच केव्हाही चांगले. आहारतज्ज्ञ अमिता गद्रे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात .
१. अॅपल सायडर व्हिनेगर
बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी अॅपल सायडर व्हिनेगर घेतात ज्यामुळे आपली वाढलेली चरबी घटण्यास मदत होईल असे त्यांना वाटत असते. पण प्रत्यक्षात अॅपल सायडर व्हिनेगरने असे काहीही होत नाही. त्यामुळे हा उपाय करणे फारसे उपयोगाचे नसते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.
२. ग्रीन टी
अनेक जण वजन कमी होण्यासाठी सर्रास ग्रीन टी घेतात. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो असे सर्रासपणे सांगितले किंवा लिहीले, बोलले जाते. मात्र संशोधन करताना ग्रीन टी एक्सट्रॅक्ट किंवा ग्रीन टीचा सप्लिमेंटल फॉर्म वापरला जातो. आपण पेय म्हणून ग्रीन टी घेतो तेव्हा मात्र त्याचा तितका उपयोग होत नाही.
३. फ्लॅक्स सिडस
आहारात फायबरचे प्रमाण वाढावे यासाठी फ्लॅक्स सिडस उपयुक्त असतात असे सांगितले जाते. त्यामुळे आपण जेवणानंतर, चटणीच्या स्वरुपात जवसाचा समावेश करतो. मात्र यामध्ये असा कोणताच घटक नसतो ज्यामुळे तुमचे वजन झरझर कमी होऊ शकते.
४. भात किंवा पोळीऐवजी मिलेटस खाणे
आहारात गव्हाची किंवा ज्वारीची रोटी किंवा भात खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे नाचणी, बाजरी, राजगिरा यांसारख्या मिलेटस म्हणजेच तृणधान्यांचा आहारात समावेश करायला हवा असे सांगितले जाते. काहीवेळा आहारतज्ज्ञांकडूनही अशाप्रकारची तृणधान्ये खाण्यास सांगितले जाते. मात्र त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते असं नाही कारण त्यातही धान्यांइतक्याच कॅलरीज असतात.
५. ऑईल पुलिंग
ऑईल पुलिंग करणे हा दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगला उपाय असतो. त्यामुळे हात सरळ तोंडात घालून खाण्याऐवजी हात उलटा करुन डोक्याच्या मागून तोंडात घालणे असे याला म्हणायला हरकत नाही.