नवरात्रीच्या नऊदिवसांच्या उपवासाचं निमित्त साधून वजन कमी करण्याचा अनेकजणींचा उद्देश असतो. पण नवरात्र झाले की लक्षात येतं की उपवास करुनही आपलं वजन कमी तर झालं नाहीच उलट वाढलं. आहार तज्ज्ञ म्हणतात की केवळ उपवास केला म्हणजे वजन कमी होतं असं नाही. तर उपवासाचे म्हणूनही काही आहार नियम असतात, ते जर पाळले गेले तरच नवरात्रीच्या उपवासाचा सकारात्मक परिणाम वजनावर दिसून येईल. नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवासाचा आहार हा संतुलित आणि पौष्टिक असायला हवा. नऊ दिवसांची उठण्यापासून झोपण्यापर्यंत आहारापासून व्यायामापर्यंतची दिनचर्या आरोग्यदायी ठेवली तर वजन कमी होतंच आणि आरोग्यही छान राहातं.
Image: Google
नऊ दिवस काय करावं?
1. कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यावी. अपुर्या झोपेमुळे थकवा जाणवतो.
2. दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यावं. उपवासादरम्यान पाणी पिण्याकडे दुर्लक्ष झाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होतो. पाण्यासोबतच इतर द्रव पदार्थही शरीरात जाणं आवश्यक आहे. जसे लिंबू पाणी, नारळाचं पाणी, दही, ताक . यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहातं.
3. दर दोन तीन तासांच्या अंतरानं थोडं पौष्टिक खायला हवं. जे खाणार ते तेलकट, तळलेलं नसावं याची काळजी घ्यायला हवी.
Image: Google
4. उपवास आहे थकवा येईल म्हणून अनेकजण व्यायाम करणं टाळतात. पण फिटनेस तज्ज्ञ म्हणतात की उपवास असला तरी रोज अर्धा तास फिरायला जावं किंवा योग सारखा व्यायाम करावा. व्यायामामुळे पचनक्रिया सुधारते. व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त उष्मांकही जळतात
5. उपवासाच्या काळात कोणताच मानसिक तणाव घेऊ नये.
6. आपली विचार करण्याची पध्दत सकारात्मक ठेवावी. यामुळे शरीर आणि मनास ऊर्जा मिळते. नकारात्मक विचारसरणीने ऊर्जा खर्च होते.
7. उपवास असो की नसो आहारात एक तरी धान्यं असायलाच हवं. वजन कमी करण्यासाठी ते आवश्यकच आहे. त्यामुळे उपवास असला तरी भगर, राजगिरा यासारखे पदार्थ असायलाच हवेत.
8. नऊ दिवस रोज एकाच प्रकारचं खाणं, एकच पदार्थ सेवन करणं हे वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायद्याचं नसतं असं म्हटलं जातं. रोजच्या आहारात पदार्थ बदलायला हवेत. त्यामुळे शरीराला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळतात.
Image: Google
9. उपवास आहे म्हणून खूप वेळा चहा पिऊ नये. दुपारी किंवा संध्याकाळी चहा प्यायचा असल्यास जिर्याचा किंवा ओव्याचा चहा प्यावा. या दोन प्रकारच्या चहामुळे शरीर डिटॉक्स होतं. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातील फॅटस या दोन प्रकारच्या चहाने कमी होतात. संध्याकाळी नाश्त्याला नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. नारळ पाण्यात पोटॅशियम भरपूर असतं. शिवाय त्यात ब1, ब2, ब3 हे जीवनसत्त्वं असतात. ही जीवनसत्त्वं शरीरासाठी फायदेशीर असतात.
10. रोजच्या आहारात तीन चमचे साजूक तूप असायला हवं. वजन कमी करण्यासाठी साजूक तूप मदत करतं. तुपामुळे हाडं मजबूत होतात. साजूक तुपात ओमेगा 6 हे फॅटी अँसिड असतं. शरीरासाठी हा घटक अतिशय आवश्यक असतो.
11. उपवासाच्या काळात शेंगदाण्याची अँलर्जी नसल्यास रोज थोडे भाजलेले शेंगदाणे गुळासोबत खावेत. तसेच मधून मधून मखाना खाण्याचेही फायदे होतात. मखान्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यात फॅट नसल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मखाने उपयुक्त ठरतात.
12.उपवासाच्या काळात तळलेल्या पदार्थाऐवजी ताजं दही, फळं, सुका मेवा खावा. रोज एकाच प्रकारचा सुकामेवा न खाता अदलून बदलून खावा. या नऊ दिवसात एकाच प्रकारची फळं न खाता वेगवेगळी फळं खावीत यामुळे शरीरास आवश्यक ती सर्व जीवनसत्त्वं, आणि खनिजं मिळतात. पपई, अननस, सफरचंद, केळ, नाशपती ही फळं आलटून पालटून खावीत.
13. उपवासाला हलका आहार घ्यावा. उकडलेले बटाटा, काकडी, भोपळा, दही, मखाना, शेंगदाणे, डांगराची खीर यांचं प्रमाणात सेवन शरीरास फायदेशीर ठरतं.
Image: Google
नऊ दिवस काय टाळावं?
1. उपवास काळात बाहेर मिळणारे तयार ज्यूस, पॅकेटबंद ज्यूस पिऊ नये.
2. उपवासाचे दिवस असले तरी अधिका काळ उपाशी राहू नये.
3. वजन कमी करायचं म्हणून नवरात्रीच्या उपवासाला सकाळी किंवा संध्याकाळी पूर्ण उपाशी राहू नये.
4. उपवासाला खूप तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे पचन व्यवस्था बिघडून पोटाचे, पित्ताचे विकार होतात.
5. उपवासाचे पदार्थ खाताना एकाच वेळेस भरपूर न खाता नियमित अंतरानं थोडं थोडं पण पौष्टिक खावं. यामुळे पचन चांगलं होतं, शरीराला वेळोवेळी आवश्यक ऊर्जा मिळते. एकाच वेळी खूप खाल्ल्यास दिवसभर आळस राहातो. उपवासाच्या काळात हलका आहार हाच उत्तम असतो असं आहार तज्ज्ञ म्हणतात.
6. उपवासादरम्यान पाणी कमी प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
Image: Google
उपवास असतो फायद्याचा!
तज्ज्ञ म्हणतात की अधून मधून उपवास केल्याने विविध संसर्गजन्य आजारांपासून आपलं संरक्षण होतं. उपवासादरम्यान फळं, सुकामेवा, हलका आहार यामुळे पौष्टिक घटक शरीरात जातात. त्यामुळे पचन व्यवस्थेवर ताण पडत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे उपवासानं आरोग्य सुद्ृढ राहातं. उपवासादरम्यान योग्य आहाराच तंत्र सांभाळलं तर उपवासनं तब्येत बिघडत नाही उलट सुधारते याचा अनुभव येईल असं तज्ज्ञ म्हणतात. उपवासामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीर विषमुक्त होण्यास उपवास फायदेशीर ठरतो. यामुळे केवळ शरीरालाच फायदा होतो असं नाही तर मनही उत्साही होतं.