वजन कमी करताना काय खाणं योग्य याला खूप महत्त्व आहे. विशेषत: सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक, भूक नियंत्रित ठेवणारे पदार्थ पोटात गेले तर ऊर्जा मिळते आणि वजन कमी होण्यास त्याची मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्याचे नियम लक्षात घेता सकाळी नाश्त्याला रवा इडली खाणं योग्य पर्याय आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते रवा इडलीमधे कमी कॅलरीज असतात. रवा इडली पचायला वेळ घेते. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत पोट भरलेलं राहातं. शिवाय त्याचं साखरेत रुपांतर व्हायलाही वेळ लागतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रवा इडली उत्तम पर्याय आहे.
रवा इडली ही प्रथिनं आणि कर्बोदकांचा उत्तम स्त्रोत आहे. कर्बोदकं शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे व्यायाम करुन वजन कमी करणार्यांसाठी ऊर्जा टिकवण्यासाठी रवा इडली मदत करते. रवा इडलीत फॅटस आणि कोलेस्ट्रॉल कमी असतं. त्यामुळे पौष्टिक खाण्यासाठी रवा इडली खावी असं आहार तज्ज्ञ सांगतात. रवा इडली नाश्त्यात नियमित खाल्ल्यास त्याचा उपयोग वजन कमी करण्यासा होतो.
रवा इडलीत लोह असतं. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं. तसेच रवा इडली शरीरातील सोडियमचं प्रमाण नियंत्रित ठेवते. याचाच अर्थ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही रवा इडलीचा उपयोग होतो. रवा इडलीत अनेक जीवनसत्त्वं असतात, त्यात फॅटस कमी असतात, लोह, फायबर, कर्बोदकं असतात. त्यामुळे संपूर्ण अन्न म्हणून रवा इडलीकडे बघितलं जातं.
छायाचित्र:- गुगल
पौष्टिक रवा इडली करण्याची सोपी पध्दत
रवा इडली करण्यासाठी 1 छोटा चमचा तूप, एक चोटा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 1 चमचा किसलेलं आलं, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 2 कप रवा, 2 कप दही, 1-2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 कप बारीक चिरलेल्या भाज्या( गाजर, सिमला मिरची, कोबी)
छायाचित्र:- गुगल
रवा इडली बनवताना
एका कढईत तूप घालून ते गरम करावं. त्यात मोहरी आणि हिंग घालावं. त्यानंतर किसलेलं आलं, कढीपत्ता आणि हळद घालावी. हे थोडा वेळ परतून घ्यावं. त्यानंतर यात बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात. भाज्या घातल्यानंतर त्या मऊ होईपर्यंत परताव्यात. नंतर त्यात रवा घालावा. रवा घातल्यानंतर सतत पाच ते दहा मिनिटं तो परतत रहावा. नंतर गॅस बंद करुन त्यात दही आणि मीठ घालावं. मिश्रण चांगलं दाटसर होईल. हे मिश्रण पंधरा मिनिटं तसंच राहू द्यावं.
पंधरा मिनिटानंतर या मिश्रणात पानी घालावं. ते थोडं सरसरीत करावं. शेवटीत त्यात बेकिंग सोडा घालावा. इडलीच्या साच्याला तूप लावावं आणि रव्याचं मिश्रण घालावं. आणि इडल्या वाफवायला ठेवाव्यात. मोठ्या आचेवर इडल्या चार पाच मिनिटं वाफवाव्यात.