वजन कमी करायचा विचार डोक्यात आला रे आला की आपण आपल्याला त्यासाठी काय केले पाहिजे याचा शोध घ्यायला सुरूवात करतो. मग कधी जीम जॉइन करायचा विचार तर कधी वेगवेगळे डाएट प्लॅन्स, कधी एखादा प्रोटीन शेक घेऊन हे वजन कमी होतंय का बघतो तर कधी चक्क उपवास करतो. हे सगळे ठिक असले तरी आहार हा तुमच्या वजन वाढीतील महत्त्वाचा मुद्दा असतो. हा आहार योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतला तर तुमच्या वजनवाढीतील बऱ्याच अडचणी दूर होतात आणि नकळत वजन कमी व्हायला सुरुवात होते. यातही रात्रीच्यावेळी केल्या जाणाऱ्या जेवणाकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे, कारण रात्री आपण जेवल्यानंतर लगेच झोपत असल्याने खाल्लेले अन्न पुरेसे पचत नाही. पाहूयात रात्रीच्या वेळी जेवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात...
१. डीस्ट्रॅक्शन असू नये - दिवसभराच्या कामाने आपण थकलेले असतो, त्यामुळे अनेकदा रात्री घरी आल्यावर आपण फ्रेश होतो आणि दिवसभराचा ताण घालवण्यासाठी टीव्ही लावतो. मग हा टीव्ही बघतच आपण जेवण करतो. पण अशाप्रकारे टीव्ही बघत जेवणे आरोग्यासाठी घातक असते. टीव्ही बघत असल्याने आपण काय खात आहोत हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही आणि भुकेपेक्षा जास्तही खाल्ले जाऊ शकते. तसेच हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. सतत सोशल मीडियाचा वापर करणे ही अतिशय सामान्य सवय असल्याने जेवतानाही अनेक जण सोशल मीडियावर असतात. त्यामुळे जेवणातील लक्ष दुसरीकडे जाते आणि खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. त्यामुळे वजन आणि शरीरावरील चरबी वाढते. त्यामुळे जेवताना तुमचे पूर्ण लक्ष जेवणावरच असायला हवे.
२. मधल्या वेळेत काहीतरी खा - अनेकांना दुपारचे जेवण झाल्यानंतर थेट रात्री जेवण करण्याची सवय असते. पण यामुळे तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त भूक लागते आणि तुम्ही रात्रीच्या वेळी खूप जेवता. असे करण्यापेक्षा ५ ते ६ च्या दरम्यान चहाच्या वेळेला काहीतरी खाणे गरजेचे आहे. अशाप्रकारे छोट्या स्नॅक्सचा दोन जेवणांमध्ये समावेश केल्यास तुमच्या जेवणावर नियंत्रण येऊ शकेल. यामध्ये तुम्ही पोहे, मुरमुरे, साळीच्या लाह्या यांचा चिवडा, मकाणे, एखादा पौष्टीक लाडू, एखादे फळ, सलाड, क़डधान्ये अशा पौष्टीक पदार्थांचा समावेश करु शकता. अशाप्रकारे मधे खाल्ल्यामुळे मेटाबॉलिझमला गती मिळेल आणि वजन कमी होण्यास त्याची मदत होईल.
३. कॅलरीजकडे लक्ष ठेवा - रात्रीच्या वेळी तुम्ही खात असलेल्या अन्नातील कॅलरीजकडे लक्ष ठेवा. रात्रीच्या वेळी पिझ्झा, आईस्क्रीम, गोडधोड किंवा जंकफूडमधील कोणतेही पदार्थ खाल्ले तर यामुळे तुम्ही खूप जास्त कॅलरीज घेत आहात हे लक्षात ठेवा. यामुळे तुमचे वजन नक्कीच वाढेल. त्यामुळे रात्रीचा आहार जास्तीत जास्त हलका ठेवा. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊन इतर त्रास उद्भवू शकतात. तसेच जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणे, चही किंवा कॉफी पिणे, गोड काहीतरी खाणे अशी अनेकांना सवय असते. मात्र यामुळे तुम्ही जाड होण्याला कारण देता. त्यामुळे शक्यतो अशाप्रकारे जेवणानंतर काहीही खाणे टाळा.
४. जेवण टाळणे चुकीचेच - रात्रीचे जेवण बंद केले की आपले वजन आटोक्यात येईल असे वाटून अनेक जण आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा कोणताही सल्ला न घेता रात्रीचे जेवण बंद करतात. पण अशाप्रकारे तुम्ही रात्री जेवला नाहीत तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणापेक्षा जास्त भूक लागते. त्यामुळे तुम्हाला किती खाऊ आणि किती नको असे होऊन जाते. मग नकळतच खूप जास्त खाल्ले जाते. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढते. त्यामुळे रात्रीचे जेवण बंद करण्याची चूक करु नका तर दिवसभरातील कॅलरीजचे योग्य पद्धतीने विभाजन करा. असे केल्याने तुमचा मेटाबॉलिझम मजबूत होतो आणि वजन कमी करणे सोपे होते.