आपलं वजन वाढायला लागलं की आपल्याला नकळत टेन्शन यायला लागतं. आपण बेढब तर दिसत नाही ना, आपल्याला लोक जाडी म्हणून चिडवतील असा विचार करुन आपण मनानेच काहीतरी डाएट करायला सुरुवात करतो. नेहमीची खाण्यापिण्याची सवय आणि एकाएकी सुरू केलेलं डाएट आणि व्यायाम यामुळे शरीराला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. योग्य ती माहिती नसताना डाएट केल्यास आपले वजन तर कमी होते पण शरीराचे योग्य पद्धतीने पोषण न झाल्यास आरोग्याच्या समस्याही उद्भवतात (Weight Loss Tips). मात्र वजन कमी करण्यासाठी तुम्ही हात धुवून मागे लागला असलात तरी खालील ४ चुका अजिबात करु नका नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
१. बराच वेळ उपाशी राहणे
आपल्याला वाटते उपाशी राहिले किंवा बराच वेळ काही खाल्ले नाही तर आपले वजन कमी होईल. पण हा समज अतिशय चुकीचा आहे. बराच वेळ उपाशी राहिल्यामुळे आपल्याला थकवा आल्यासारखे वाटते आणि वजन तर कमी होतच नाही. त्यामुळे जास्त वेळ उपाशी राहण्यापेक्षा डाएटमधील फॅटसचे प्रमाण कमी करा.
२. ब्रेकफास्ट टाळणे
ब्रेकफास्ट हा आपल्या संपूर्ण दिवसातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. रात्रभर आपण झोपलेलो असल्याने शरीर जास्त वेगाने काम करत असते. तसेच रात्रीच्या जेवणानंतर बराच काळ गेल्याने शरीराला ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. सकाळी चांगला ब्रेकफास्ट केल्यास तुमचा दिवस तर चांगला जातोच पण तुम्ही दिवसभर डाएट किंवा व्यायाम जे कराल त्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकता.
३. डाएट फूड खाणे
आपण बाजारात गेल्यावर अनेकदा त्या गोष्टीवरचे लेबल पाहून ते डाएट फूड आहे की नाही ते पाहून ते घ्यायचे की नाही ते ठरवतो. पण अशाप्रकारे डाएट फूड लिहीलेल्या अन्नपदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटीव्हज जास्त प्रमाणात असण्याची शक्यता असते. या पदार्थांमध्ये साखर आणि मीठाचे प्रमाणही कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहणे आणि त्यांचा आहारात कमीत कमी वापर करणे केव्हाही चांगले.
४. रात्री जेवणानंतर न चालणे
रात्री जेवणानंतर चालणे अतिशय आवश्यक असून अनेकदा आपण थकलेलो असल्याने खाल्ल्यानंतर तसेच झोपतो. पण त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही आणि त्याचे चरबीमध्ये रुपांतर होते. त्यामुळे न चुकता रात्री जेवल्यानंतर १५ मिनीटे आवर्जून चालायला हवे. त्यामुळे आपले वजन तर वाढत नाहीच पण आपल्याला झोपही शांत लागते.