Join us  

Weight Loss Tips: प्या पेरूच्या पानांचा स्पेशल चहा, वजन कमी होण्यासह भरपूर फायदे, चहाही चवीला भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 12:54 PM

Guava Leaf Tea for Weight loss: वजन कमी करण्यासाठी हा स्पेशल चहा खरोखरंच खूप उपयुक्त ठरतो. काही दिवस नियमितपणे प्या आणि वजनात होणारा बदल स्वत:चा अनुभवा..

ठळक मुद्देपेरूसोबतच त्याच्या पानांचाही एका खास पद्धतीने उपयोग करून घ्या. कारण हीच पानं आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. 

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे खूप लोक आपण आजूबाजूला पाहतो. कुणी डाएट करतं तर कुणी व्यायामावर भर देतं. डाएट आणि व्यायाम या दोन्हीवर फोकस करून शिस्तीत वेटलॉस करणारेही अनेक आहेत. आहारातले बदल आपल्या रुटीनमध्ये केलेले छोटे छोटे बदलही अनेकदा वेटलॉस (weight loss) आणि वेटगेनसाठी (weight gain) कारणीभूत ठरत असतात. त्यामुळेच तर हा एक छोटासा उपाय नियमितपणे करून बघा.. उपाय अगदी सोपा आहे.. पण नियमितपणे केला तरच वेटलॉससाठी मदत होऊ शकते असं ब्राझील येथील अभ्यासकांचं मत आहे.

 

पेरू हे बहुतेक जणांच्या आवडीचं फळ. अंगणात पेरूचं झाड असेल तर आणखी बहार.. पेरू आपण सहज तोडून घेतो आणि त्याच्या बहुगुणी पानांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष करतो. पण आता असं करू नका. पेरूसोबतच त्याच्या पानांचाही एका खास पद्धतीने उपयोग करून घ्या. कारण हीच पानं आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. 

 

पेरूच्या पानांचा चहा करण्यासाठी (hoe to make guava tea) एका भांड्यात एक कप पाणी उकळत ठेवा. पेरूची अगदी कोवळी पाने घेऊ नका. थोडी मुरलेली पाने घ्या. ती स्वच्छ धुवा आणि हातानेच बारीक- बारीक तुकडे करून उकळत्या पाण्यात टाका. त्यात आवडीनुसार थोडंसं लिंबू आणि गुळ टाकला तरी चालेल. एक कप पाणी उकळून आटलं आणि साधारण पाऊण कप झालं की गॅस बंद करा. पेरुच्या पानांचा चहा झाला तयार. रोज सकाळी रिकाम्यापोटी हा चहा गरम असतानाच प्या.. काहीकाळ हा उपाय नियमितपणे केल्यास नक्कीच वजन कमी होईल. कारण असा चहा प्यायल्यामुळे कार्बोहायड्रेट्सचे साखरेत रुपांतर होण्याची क्रिया मंदावते आणि त्यामुळे वजनात होणारी वाढ नियंत्रणात राहते. 

 

पेरुच्या पानांचे औषधी उपयोग- पेरुची पाने त्वचा आणि केसांसाठीही अतिशय उपयुक्त आहेत.- केस खूप गळत असल्यास हा उपाय फायदेशीर ठरेल.- रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही उपयुक्त.- या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात.- वारंवार तोंड येणे किंवा इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपयुक्त. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यव्यायामफिटनेस टिप्स