Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > २०-३०-४० किलो वजन कमी करता येत नसेल तर ४ किलो करा..कारण

२०-३०-४० किलो वजन कमी करता येत नसेल तर ४ किलो करा..कारण

Weight Loss Tips : अनावश्यक वजनापैकी केवळ दहा टक्के वजन कमी करण्याने सुद्धा त्यांचे आरोग्य बरेच सुधारणार असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 05:22 PM2023-04-02T17:22:35+5:302023-04-02T17:43:05+5:30

Weight Loss Tips : अनावश्यक वजनापैकी केवळ दहा टक्के वजन कमी करण्याने सुद्धा त्यांचे आरोग्य बरेच सुधारणार असते

Weight Loss Tips : If you can't lose 20-30-40 kg then do 4 kg.. because | २०-३०-४० किलो वजन कमी करता येत नसेल तर ४ किलो करा..कारण

२०-३०-४० किलो वजन कमी करता येत नसेल तर ४ किलो करा..कारण

डॉ. नितीन गुप्ते

आज जगभर करोडो लोक लठ्ठ आहेत. ह्यापैकी अनेक जण आर्थरायटीस, हायपरटेंशन, डायबीटीस, हृदयविकार, स्ट्रोक्स सारखे क्रॉनिक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यातील बहुतेक लोक लठ्ठपणाचे विविध उपचार घेऊनही वजन कमी करण्यात आलेल्या अपयशाने हताश आणि वजन कसे कमी करावे ह्या चिंतेने गोंधळलेले आहेत. हे सगळे वीस, तीस, चाळीस किलो वजन उतरवायचे असल्याच्या काळजीचे प्रचंड दडपण उरावर घेऊन जगत आहेत. कुठल्याच ट्रीटमेंट मध्ये वजन फारसे किंवा फार काळ उतरत नसताना इतके सगळे वजन कमी कसे करायचे हे कळत नसल्याने हे लोक लठ्ठपणाचे दुष्परिणाम भोगत राहतात (Weight Loss Tips).

पण ह्या लोकांना हे माहीत नसते की आपल्या अनावश्यक वजनापैकी केवळ दहा टक्के वजन कमी करण्याने सुद्धा त्यांचे आरोग्य बरेच सुधारणार असते आणि वजना मुळे येणारी दुखणी ही बरीच कमी होणार असतात. अनावश्यक वाढलेले प्रत्येक चार किलो वजन आपल्या शरीराच्या खालच्या भागातील सांध्यांवरील प्रेशर (दाब) वीस किलोने वाढवते आणि त्यांची झीज तितक्या अधिक वेगाने होत जाते म्हणजेच आपल्याला तितक्या लवकर आर्थरायटीस (संधिवात) चा सामना करावा लागतो.

आपल्या अनावश्यक वाढलेल्या प्रत्येक चार किलो वजन कमी होण्याने आपल्या सांध्यां वरील तेव्हढे प्रेशर कमी होण्याने आर्थरायटीसमुळे होणारी सांध्यांची झीज होण्याचा वेग कमी होतो आणि काही वेळा आपण आर्थरायटीस टाळू ही शकतो. असे प्रत्येक चार किलो वजन कमी होण्याने आपले ब्लड प्रेशर ही लक्षणीयरित्या कमी होते. व्यायाम करून वजन कमी करण्याने सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 12.5 तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 8 एम एमने खाली येत असलेले दिसून आले आहे. चार किलो वजन कमी करण्याने रक्तातील ग्लुकोज लेव्हल्स खाली येऊन डायबीटिस होणे टळू शकते, किंवा डायबीटिस अधिक चांगला कन्ट्रोल केला जातो.

ह्या मुळे शरीरातील सेल्स (पेशी) ची इनस्युलिन सेन्सिटीव्हिटी सुधारते, म्हणजेच त्यांचा इनस्युलिन रेझिस्टन्स कमी होऊन रक्तातील ग्लुकोज आणि इनस्युलिन लेव्हल्स कमी राखण्यास मदत होते. व्यायाम आणि वजन कमी होण्याने रक्तातील एच डी एल (हृदयाच्या आर्टरीज् मध्ये प्लॅक निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घेणारे) कोलेस्टेरॉल वाढते तर टोटल कोलेस्टेरॉल आणि एल डी एल (हृदयाच्या आर्टरीज् मध्ये प्लॅक आणि हृदयविकार निर्माण करणारे) कोलेस्टेरॉल कमी होते. म्हणजेच आपण अधिक हार्ट हेल्दी होतो. तसेच व्यायामाने आणि वजन कमी करण्याने रक्तातील ट्रायग्लिसराईड्स जे हृदयाला मारक असते, तेही कमी होऊन आपण अधिक हार्ट हेल्दी होतो.

हे चार किलो वजन कमी करण्याने आपल्या शरीरातील इनस्युलिन, इस्ट्रोजन, ॲन्ड्रोजन सारख्या काही हॉर्मोन्स च्या लेव्हल्स कमी होतात. ह्या  हॉर्मोन्सच्या लेव्हल्स जास्त असण्याने ब्रेस्ट कॅन्सर सारखे काही कॅन्सर्स होण्याची शक्यता वाढते. त्याच बरोबर तुमची झोप सुधारून स्ट्रेस, डिप्रेशन कमी होते तर मूड चांगला राहण्यास आणि सेल्फ एस्टीम (आपल्या मनातील स्वतः बद्दलची प्रतिमा) सुधारण्यास मदत होते.

स्लीप ॲप्नीय (झोपेत परत परत श्वास बंद पडून परत चालू होणे, ज्या मुळे सतत झोप मोडणे) हा एक कॉमन आणि अतिशय त्रासदायक आणि हृदयासाठी घातक आजार आहे. त्या अजारामध्ये ही हे चार किलो वजन कमी करण्याने लक्षणीय सुधारणा होऊ शकते. शरीरातील फॅट सेल्स, विशेषतः पोटातील फॅट सेल्स काही केमिकल्स रक्तात सोडतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरातील टिश्यूंमधील सेल्स मध्ये इनफ्लमेशन (दाह) निर्माण होते. त्यामळे आर्थरायटीस, हायपरटेंशन, डायबीटिस, हृदयविकार, स्ट्रोक्स सारखे क्रॉनिक आजार निर्माण होतात. केवळ चार किलो वजन कमी करण्याने हे आजार होण्याचा धोका कमी होतो.

वजन, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, टोटल कोलेस्टेरॉल आणि एल डी एल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि एच डी एल कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी आणि स्वत:ला हायपरटेन्शन, डायबीटिस, हृदयविकार, हार्ट अटॅक्स आणि स्ट्रोक्स तसेच काही कॅन्सर्स पासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर भाज्या, फळे, साय काढलेले दूध आणि माफक पण पुरेशा प्रमाणात संपूर्ण धान्य आणि कडधान्य आणि खात असाल तर सागरी मासे ह्यांचा समावेश करणे, खात असला तर मांसाहार कमी राखणे आणि नियमित चालणे, पुरेशी विश्रांती ह्यांचा समावेश असलेली जीवनशैली स्वीकारणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

अशी जीवनशैली तरुण मुली आणि महिलांना ही पीसीओडी आणि वजनामुळे होणारे गर्भपात आणि वंध्यत्व ह्या आजारांपासून सुरक्षित ठेऊ शकते. थोडक्यात, अशी जीवनशैली ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच वीस, तीस किलो वजन कमी करण्याची काळजी सोडून द्या, हेल्दी खा, नियमितपणे चाला आणि पाहिले चार किलो कमी करा आणि मग तुम्हाला किती फिट आणि हेल्दी वाटते आहे ते प्रत्यक्ष अनुभवा!

(लेखक लठ्ठपणातज्ज्ञ आहेत)

संपर्क - 9890801727

ईमेल - slim@drnitingupte.com
 
drnitingupte@gmail.com   

Web Title: Weight Loss Tips : If you can't lose 20-30-40 kg then do 4 kg.. because

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.