वाढते वजन ही सध्या अनेकांपुढील एक मोठी समस्या आहे. एकीकडे कामाचा ताण, व्यायामासाठी न मिळणारा वेळ आणि वेगवेगळ्या कारणांमुळे खाल्ले जाणारे जंक फूड यामुळे वजनाच्या समस्या या हल्ली अतिशय सामान्य झाल्या आहेत. एकदा वजन वाढले की त्यामुळे उद्भवणाऱ्या मधुमेह, बीपी किंवा हृदयरोग यांसारख्या समस्या डोकेदुखी होऊन बसतात. पण वेळीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपण आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतो. अनेकदा आपल्याला वजन कमी करायला हवं (Weight Loss Tips ) हे आपल्याला माहित असतं. त्यासाठी आपण काही ना काही प्रयत्नही करत असतो. पण योग्य प्रकारची माहिती नसल्याने आपण करत असलेल्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी चुकीच्या ठरु शकतात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी उलट जास्त वाढू शकते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी आवर्जून टाळायला हव्यात अशा ४ गोष्टी...
१. हाय प्रोटीन इनटेक किंवा प्रोटीनची कमतरता
आपल्या शरीराला आणि स्नायूंना प्रोटीनची आवश्यकता असते. शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होण्यासाठी प्रोटीन अतिशय गरजेचे असते. आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. प्रोटीनमुळे पोट भरलेले राहते आणि बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे नकळत कमी खाल्ले जाते आणि तरीही शरीराचे पोषण होते. त्यामुळे आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात असायला हवे. पण हे प्रोटीन प्रमाणापेक्षा जास्त झाले तर त्याचे फॅटसमध्ये रुपांतर होते. त्यामुळे आहारात डाळी, क़डधान्ये, दुधाचे पदार्थ यांचे प्रमाण चांगले असायला हवे.
२. आवडीचे खाणे सोडणे
वजन कमी करायचे म्हणून अनेकदा आपण चहा सोडतो, कधी आपल्याला आवडणारी पावभाजी, भजी, वडे अगदी भातही सोडतो. पण आपल्या आवडीची गोष्ट सोडल्याने आपल्याला सतत काहीतरी खावेसे वाटते आणि ते बऱ्याचदा जंक फूड असते. त्यामुळे आरोग्यावर अशाप्रकारे काही पदार्थ खाणे सोडणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे आपल्याला आवडणारी गोष्ट खाणे एकदम बंद करु नका, तर कधीतरी प्रमाणात तो पदार्थ खाल्ल्यास हरकत नाही हे लक्षात ठेवा.
३. क्रॅश डाएट करणे
अनेकदा वजन कमी करायचं म्हणून आपल्यातील अनेक जण क्रॅश डाएट फॉलो करतात. काही वेळा उपवास करतात तर काही वेळा फक्त फळं, सॅलेड खाऊन वजन कमी करण्याचे ठरवतात. पण अशाप्रकारे वजन कमी केल्यास त्याचा आरोग्याला उपयोग होत नाही. तर ठराविक काळाने आपल्याला पोषण न मिळाल्याने वेगळेच त्रास निर्माण होतात. त्यापेक्षा जंक फूड खाणे टाळणे, वेळच्या वेळी घरचा सात्विक आहार घेणे या गोष्टींचे पालन केल्यास वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.
४. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम
अनेकदा वजन कमी करायचे म्हणून प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केला जातो. व्यायाम करणे चांगले असले तरी तो प्रमाणातच असायला हवा. अशाप्रकारे जास्त व्यायाम करणे आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या थकवणारे ठरु शकते. मात्र व्यायाम करताना आपली शीरीरिक क्षमता, आपले वजन या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे शरीराला खूप ताण देऊन व्यायाम केल्यास शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते आणि वजन कमी होण्याऐवजी जास्त वाढते.