Join us  

Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर रात्री झोपताना करा फक्त २ गोष्टी; वजन झटपट कमी व्हायला होईल मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2022 11:20 AM

Weight Loss Tips : पाहूयात अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या रात्रीच्या वेळी केल्याने वजन नियंत्रणात येऊ शकते.

ठळक मुद्देझोप नीट झाली नाही तर आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवत असल्याने किमान ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. वजन वाढू नये म्हणून जीवनशैलीत काही आवश्यक बदल जरुर करायला हवेत

वजन वाढणे ही सध्या अतिशय सामान्य समस्या बनली आहे. वजन एकदा वाढले की ते कमी होणे अवघड असल्याने सुरुवातीपासूनच वजन वाढू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. बैठी जीवनशैली, जंक फूडचे सेवन, वाढते ताणतणाव यांमुळे वजन वाढते. वाढत्या वजनामुळे आपण बेढब तर दिसतोच पण डायबिटीस, बीपी, हृदयरोग यांसारखे आजारही मागे लागतात. मग हे वाढलेले वजन कमी कऱण्यासाठी आपण डाएट प्लॅन फॉलो करतो तर कधी जीममध्ये जाऊन घाम गाळतो. पण कित्येकांचे वजन यामुळेही कमी होत नाही (Weight Loss Tips). वजन वाढ ही सध्या अतिशय महत्त्वाची समस्या असून त्यावर वेळीच योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. 

(Image : Google)

व्यायामाबरोबरच डाएट हा आपल्या जीवनशैलीतील अतिशय महत्त्वाचा घटक असल्याने त्याबाबत काही नियम पाळल्यास वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यासाठी आपण जे काही करतो त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असते. अन्यथा काही जण थोडे दिवस एखादी गोष्ट करतात आणि काही दिवसांतच ती सोडून देतात. मात्र असे करण्याने वजन कमी होण्यास सुरुवात होते पण पुढे काही दिवसांतच ते होते त्यापेक्षा जास्त वाढते. त्यामुळे कोणतीही जीवनशैली नियमितपणे फॉलो करणे आवश्यक आहे. रात्री हलका आहार घेणे, झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवणे अशा काही गोष्टी पाळल्यास खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते आणि वजन नियंत्रणात राहते. पाहूयात अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या रात्रीच्या वेळी केल्याने वजन नियंत्रणात येऊ शकते.

१. रात्री कमीत कमी तेलाचा वापर करणे 

आपण रात्रीच्या वेळी अनेकदा तळलेले पदार्थ खातो. मात्र असे करणे वजन कमी करण्यासाठी उपयोगी नाही. रात्रीच्या वेळी शक्यतो उकडलेले पदार्थ खायला हवेत. यासाठी ज्या भाड्यांमध्ये कमी तेल लागते अशी नॉनस्टीक भांडी वापरावीत. तसेच कमीत कमी तेलात होतील असे पदार्थ करावेत. त्यामुळे कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात आणि फॅटस वाढण्याची शक्यता कमी होते. काहीवेळा आपण रात्री तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच झोपतो. यामुळे पोट आणि कंबर यांच्या आजुबाजूची चरबी वाढते. तसेच तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढून हृदयाच्या समस्याही निर्माण होतात.

(Image : Google)

२. पुरेशी झोप घेणे

आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. पण सोशल मीडियाचा अतिवापर, इतर ताणतणाव, कामाच्या वेळा यांमुळे हल्ली अनेकांचे झोपेचे गणित चुकते. पण झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो. झोप अपुरी झाल्यास वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. रात्रीची झोप कमी झाली तर सकाळी मेटाबोलिझम कमी होतो. पण झोप पूर्ण झाली तर कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या रोज पुरेशी झोप होत असेल तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. झोप नीट झाली नाही तर आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवत असल्याने किमान ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइलआरोग्यहेल्थ टिप्स