वाढलेलं वजन कमी करणं हा अनेकांपुढील एक मोठा टास्क असतो. वजन वाढताना आपल्या ते लक्षात येत नाही, पण एकदा का आपण बेढब दिसायला लागतो, आपल्याला आपले कपडे बसेनासे झाले की आपला आकार वाढत असल्याचे आपल्या लक्षात येते. आता हे कित्येक दिवसांपासून वाढलेले वजन कमी कसे करायचे (Weight Loss Tips) असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. मग त्यासाठी कधी डाएट प्लॅन घेणे तर कधी जीम लावणे असे पर्याय अवलंबले जातात. या गोष्टी आपण काही दिवस नियमाने करतोही पण त्यातही पुन्हा खंड पजतो. मात्र रोजच्या रुटीनमध्ये सहज जमतील अशा काही सोप्या गोष्टी न चुकता केल्यास आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. पाहूयात सकाळी उठल्यावर नियमितपणे काय केल्यास आपल्याला याचा फायदा होऊ शकेल. आपल्या मॉर्निंग रुटीनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी...
१. पाणी पिणे
सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. शरीरातील कॅलरीज कमी करायच्या असतील तर याचा अतिशय चांगला फायदा होतो. शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो. पाण्याने पोट भरलेले असेल तर नकळतच आपण प्रमाणापेक्षा कमी खातो आणि त्यामुळे आपले वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्यामुळे आपण आजारांपासून वाचू शकतो.
२. नाश्त्यामध्ये प्रोटीन आवश्यक
आपल्या सकाळच्या नाश्त्याची सुरुवात चांगल्या डाएटने झाली असेल तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. नाश्त्यामध्ये प्रोटीन घेतल्यास आपल्याला दिवसभर प्रमाणापेक्षा कमी भूक लागेल आणि प्रोटीनमुळे पोट जास्त भरलेले वाटेल. प्रोटीनसाठी आपण अंडी, पनीर, चिआ सीडस, दुग्धजन्य पदार्थ यांचे सेवन करु शकतो. प्रोटीन शरीरासाठी अत्यावश्यक असल्याने त्याचा आपली तब्येत चांगली राहायलाही फायदा होतो.
३. व्यायाम
शरीर फिट ठेवायचे असेल तर व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. आपण आपल्या वेळेनुसार व्यायाम करतो, पण सकाळी लवकर केलेला व्यायाम आपल्या आरोग्यासाठी केव्हाही चांगला असतो. यामुळे आपली ब्लड-शुगर लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते. मेटाबॉलिझम कमी करण्यासाठीही व्यायामाचा अतिशय चांगला उपयोग होतो. घरातल्या घरात स्ट्रेचिंग करणे, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, योगासने यांसारखे व्यायाम आपण नक्कीच करु शकतो.