आपलं वजन एकदा वाढलं की ते काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही. पण मग एकदा आपल्यालाच आपल्या शरीराची झालेली अवस्था पाहून आपण काहीतरी करायला हवं असं वाटतं. मग कधी डाएट तर कधी व्यायाम, कधी आणखी काही प्रयोग करुन आपण एकदम फीगरमध्ये येण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही केल्या वजन म्हणावे तितके कमी होत नाही. आज आपण असे उपाय पाहणार आहोत जे केल्याने आपली चरबी घटण्यास निश्चितच मदत होऊ शकते (Weight Loss Tips). यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. नियमितपणे या गोष्टींचा अवलंब केला तर १ ते २ महिन्यात तुम्हाला स्वत:मध्ये नक्कीच बदल दिसून येतील. पाहूयात यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील याविषयी...
१. झोपेची आणि उठण्याची वेळ
रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे ही आपली आई-आजी आपल्याला कायम सांगत आलेली गोष्ट. पण आज तिच गोष्ट आपण अजिबात पाळत नाही. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी सोशल मीडिया, डोक्यातील वेगवेगळे विचार यांमुळे आपल्याला झोपायला ११ आणि १२ वाजतात. त्यामुळे आपल्याला सकाळी उठायलाही उशीर होतो. पण यामुळे आपले वजन कमी होत नाही. त्यामुळे रात्री झोपायची आणि सकाळी उठायची वेळ नक्की करा आणि त्या वेळी दररोज झोपा.
२. उठल्यावर कोमट पाणी प्या
सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या. या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळा आणि त्यात दोन चमचे मध घाला. यामुळे तुमचे शरीर डीटॉक्स व्हायला मदत होईल. नकळत शरीरावरील अनावश्यक चरबी घटण्यास याची चांगली मदत होईल.
३. पोट साफ होऊ द्या
दिवसभरात तुम्ही जितक्या वेळा टॉयलेटला जाल तितकी तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. त्यामुळे पोट साफ राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी पोट साफ होईल याची काळजी घ्या. जेणेकरुन तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमची पचनक्रिया सुरळीत राहिल्याने चरबी कमी होण्यास मदत होईल.
४. व्यायाम
सकाळी उठल्या उठल्या अर्धा तास काही ना काही व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही योगा, चालणं, धावणे, अॅरोबिक्स, जीम असे कोणतेही व्यायाम करु शकता. त्यामुळे तुम्हाला दिवसभर नक्की फ्रेश वाटेल.