सततची बैठी जीवनशैली, फास्ट फूडचे सेवन आणि कामाचा ताण यामुळे वजन वाढणे ही समस्या अतिशय सामान्य झाली आहे. पण हे वाढलेले वजन कमी करायचे तर शरीराची थोडी तरी हालचाल व्हायलाच हवी ना. सकाळी उठल्यावर व्यायामाला जाण्यासाठी वेळ नाही. कारण घरातली कामं, स्वयंपाक आणि स्वत:चे आवरुन ऑफीसला पळण्याची घाई. अशावेळी सकाळी व्यायामाला वेळ मिळणंच कठिण. पण सकाळी व्यायाम नाही झाला म्हणून दिवसभरात व्यायाम करायचाच कंटाळा कराल तर त्यामुळे आणखी तोटा होईल. त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी तुमच्या सवडीनुसार कधीही व्यायाम करू शकता. वजन कमी करण्यासाठी (Weight loss Tips) आणि चांगली गाढ झोप येण्यासाठी तुम्ही दिवसातून अर्धा ते पाऊण तास नियमितपणे व्यायाम करणं (Fitness Tips) गरजेचं आहे.
सकाळी उठल्यावर हवा फ्रेश असते त्यामुळे सकाळी व्यायम केलेला चांगला असं म्हटलं जात असलं तरी दिवसाअखेर आपला स्टॅमिना, स्नायुंची ताकद, लवचिकता या सगळ्या गोष्टी सकाळच्या तुलनेत वाढलेल्या असतात. त्यामुळे रात्री आपण अधिक उत्साहाने व्यायाम करू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री व्यायाम केला तर त्याचा आपला दिवसभरातला थकवा दूर होण्यासाठी उपयोग होतो असं फिटनेसतज्ज्ञ सांगतात. आता रात्रीच्या वेळी नेमका कोणता आणि कसा व्यायाम (Exercise) करायचा ते जाणून घेऊया.
१. डान्स
झोपण्याच्या आधी तुम्ही केलेला कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल तुमच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरेल. डान्स हा आपल्यातील अनेकांना आवड़णारा विषय. यामध्ये शरीराच्या बहुतांश भागांची हालचाल होत असल्याने व्यायामाच्यादृष्टीने डान्सचा चांगला उपयोग होतो. यामध्ये तुम्ही वेस्टर्न, पारंपरिक नृत्य, बेली डान्स, अॅरोबिक्स अशा कोणत्याही प्रकारच्या डान्सचा समावेश करु शकता. डान्स केल्यामुळे कार्डिओ व्यायाम होतो. इतकेच नाही तर यामुळे आपले वजनही कमी होण्यास मदत होते. त्यामुळे केवळ १५ मिनीटे डान्स केल्यास आपल्याला त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.
२. चालणे
हा सर्वात सोपा आणि सहज करण्याजोगा व्यायाम आहे. आपण दिवसभर धावत असतो. त्यामुळे आपली आपल्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत भेट होत नाही. अशावेळी तुम्ही जेवण झाल्यावर आवर्जून चालायला गेल्यास तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत होते. खाल्लेले अन्न पचण्यासाठीही रात्रीच्या वेळी शतपावली करण्यााचा फायदा होतो. बाहेर चालायला जाणे शक्य नसेल तर घरात किंवा घराबाहेरच्या पॅसेजमध्ये २० मिनीटे आवर्जून चालायला हवे. मात्र चालण्याच्या व्यायामाआधी प्रोटीन असलेले डाएट घेतलेले केव्हाही चांगले.
३. स्ट्रेचिंग
स्ट्रेचिंग हा आपले स्नायू मोकळे होण्यासाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. दिवसभर शरीलाला आलेला ताण घालवण्यासाठी आणि हातपाय आणि इतर स्नायूंना आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग करणे अतिशय फायद्याचे असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनीटे शरीराच्या सर्व अवयवांचे स्ट्रेचिंग करायला हवे. यामुळे आपले शरीर लवचिक होण्यास मदत तर होतेच पण झोपही शांत येते.
४. योगा
रात्री झोपण्यापूर्वी योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. योगामुळे शरीराला तर फायदा होतोच पण आपला दिवसभराचा मानसिक आणि शारीरिक ताण दूर होण्यास मदत होते. फिटनेसबरोबच शांत झोप लागण्यासाठी योगा अतिशय उपयुक्त ठरतो.