Join us  

Weight Loss Tips : वाढलेलं वजन कमी करायचं तर लक्षात ठेवा फक्त ४ गोष्टी; दिसाल स्लीम-फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 12:21 PM

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आहाराच्या काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या तर त्याचा निश्चितच उपयोग होतो

ठळक मुद्देवजन नियंत्रणात आणायचं तर आहाराच्या बाबतीत काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवीवजन वाढीचा ताण न घेता सोप्या उपायांनी त्यावर मात करता येते

वाढतं वजन ही सध्या अनेकांपुढील एक मोठी समस्या आहे. आरोग्याच्यादृष्टीने तर वाढलेले वजन चांगले नाहीच पण सौंदर्याच्या दृष्टीनेही वाढलेले वजन चांगले दिसत नाही. एकदा वजन वाढायला लागले की ते काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. मग वाढलेले ही चरबी कमी करण्यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत राहतो (Weight Loss Tips). शरीराच्या ठराविक भागांमध्ये वाढणारी ही चरबी आपल्या शरीराचा शेपही खराब करते. मग कधी आपण खूप व्यायाम करतो तर कधी क्रॅश डाएटसारखे पर्याय निवडतो. पण तरी काही केल्या वजन कमी व्हायचे नाव घेत नाही. डाएट करायचे म्हणजे खाणे-पिणे पूर्णच बंद करुन टाकायचे असे नाही तर डाएटचे काही नियम पाळल्यास वजन कमी होण्यास निश्चितच मदत होते. पाहूयात आहाराच्या कोणत्या गोष्टी नियमित पाळल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)

१. गोड पदार्थांपासून दूर राहा

आपल्याला माहित आहे की गोड खाल्ल्यामुळे वजन वाढते. मात्र तरीही समोर गोड आले की आपण स्वत:वर कंट्रोल करु शकत नाही. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे असते. सतत गोड खाल्ले तर वजन वाढण्यास त्याची मदत होते. यामुळे केवळ वजनच वाढत नाही तर रक्तातील साखर वाढण्याचीही शक्यता असते. त्यामुळे गोड पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे. 

२. हिरव्या पालेभाज्या खा 

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. इतकेच नाही तर या भाज्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास वजन घटण्यास मदत होते. यासाठी आपण पालक, मेथी, चुका, चाकवत, आळू, कोथिंबीर, चवळी, मुळ्याचा पाला अशा सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करु शकतो. 

३. ब्रेकफास्ट हेल्दी असावा

सकाळचा ब्रेकफास्ट हेल्दी असणे अतिशय आवश्यक आहे. ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास तब्येत चांगली तर राहतेच पण वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे अशा पौष्टीक घटकांचा आहारात जरुर समावेश करायला हवा. यामुळे पोट तर भरलेले राहीलच पण शरीराचे पोषण होऊन वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

(Image : Google)

४. फायबर असलेले पदार्थ खा

फायबर असलेले पदार्थ आहारात असायला हवेत. यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक तर मिळतातच पण पोट साफ होण्यासही फायबर्स अतिशय उपयुक्त ठरतात. बदाम, ब्रोकोली, सगळ्या प्रकारचे सलाड, सगळी धान्ये यांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. हे पदार्थ आहारात आवर्जून असायला हवेत.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्स