Join us  

वजन कमी करायचं तर खाण्याच्या योग्य वेळा कोणत्या? आहारतज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 2:21 PM

Weight Loss Tips Perfect Time to Eat by Dietician Anjali Mukherjee: आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात, वजन कमी करायचं तर...

ठळक मुद्देसंध्याकाळी ७ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ पर्यंत काहीही खाऊ नये.प्रत्येक खाण्यामध्ये किमान ५ तासांची गॅप असायला हवी.

वजन कमी करायचं म्हटलं की आपण व्यायाम, आहार अशा सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही बदल करतो. कधी खाण्याच्या वेळा बदलतो तर कधी आहारातील पदार्थ बदलतो. चालणे, जीमला जाणे, सायकलिंग, योगा असे व्यायामाचे एक ना अनेक प्रकार आपण ट्राय करुन पाहतो. मात्र तरीही आपले वजन म्हणावे तसे कमी होतच नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण दैनंदिन जीवनशैलीत ज्या गोष्टी करु शकू त्याच करायला हव्यात (Weight Loss Tips Perfect Time to Eat by Dietician Anjali Mukherjee). 

महिनाभर वजन कमी करण्यासाठी एखादी गोष्ट केली आणि नंतर ती सोडून दिली असे होणार नाही. कारण काही दिवस एखादी गोष्ट केली आणि ती सोडून दिली की नंतर त्याचा उलटा परीणाम होतो आणि वजन आधी होते त्यापेक्षा जास्त वाढायला लागते. अशावेळी वजन कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही महत्त्वाच्या टिप्स देतात ...

प्रत्येक खाण्याचे प्रमाण किती असावे? 

नाश्ता जास्त प्रमाणात, दुपारचे जेवण मध्यम प्रमाणात आणि रात्रीचे जेवण हलके घेतल्यास आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. पण काहीवेळा सकाळच्या घाईत किंवा अन्य काही कारणांनी आपण अगदी कमी ब्रेकफास्ट करतो. नेहमीसारखे मध्यम प्रमाणात दुपारचे जेवण घेतो आणि रात्री प्रमाणापेक्षा खूप जास्त खातो. यामुळे वजन वाढते. रात्रीच्या वेळी वेगळे काहीतरी केले म्हणून, पाहुणे आले म्हणून किंवा कधी बाहेर खाल्ले तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो. मात्र असे करणे आरोग्यासाठी किंवा वजनासाठी अजिबात चांगले नसते. 

कोणत्या वेळेला खावे? 

दिवसातून साधारणपणे ३ वेळा खायला हवे. यामध्ये ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश असतो. या प्रत्येक खाण्यामध्ये किमान ५ तासांची गॅप असायला हवी. म्हणजेच नाश्ता किंवा ब्रेकफास्ट सकाळी ९ वाजता केला तर दुपारचे जेवण २ वाजता घ्यायला हवे आणि त्यानंतर रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजता घ्यायला हवे. संध्याकाळी ७ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ पर्यंत काहीही खाऊ नये. या गोष्टी अशाच्या अशा फॉलो केल्या तर तुमचे वजन नक्कीच कमी होऊ शकते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य