Join us  

वजन कमी करण्यासाठी फूड सोबतच डाएट ड्रिंक्सचीही गरज; 6 टेस्टी डाएट ड्रिंक्समुळे वेटलाॅसला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2022 5:18 PM

डाएट फूडसोबतच डाएट ड्रिंक्सचा समावेश करुन चयापचय क्रिया गतिशील करता येते.डाएट ड्रिंक्सच्या 6 प्रकारांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याचा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय सापडेल1

ठळक मुद्देआलं आंबा ड्रिंकनं चयापचय क्रिया सुधारते.चिया लेमोनेड प्याल्यानं शरीरात साठून राहिलेली चरबी कमी होते.पोट फुगणे, दुखणे, बध्दकोष्ठता हे त्रास बडिशेपाच्या चहाने दूर होतात.

वजन कमी करण्यासाठी फूड सोबतच डाएट ड्रिंक्सचीही गरज; 6 टेस्टी डाएट ड्रिंक्समुळे वेटलाॅसला मिळेल चालनावजन कमी करणं ही सोपी गोष्ट नाही. वजन कमी करण्याची गुरुकिल्ली म्हणजे चयापचय क्रिया. ती उत्तम असेल तर वजन कमी होईल, नियंत्रित राहील आणि ती जर व्यवस्थित काम करत नसेल तर मात्र वेटलाॅस अवघड काम होवून बसतं. चयापचयाच्या क्रियेत अनुवांशिकता हा घटक तर काम करतोच शिवाय व्यक्तिगणिक चयापचय क्रिया भिन्न असते. चयापचय क्रियेत अन्नाचं रुपांतर ऊर्जेत होतं. ही गती जेवढी चांगली तेवढा वजन कमी होण्यास, नियंत्रित राहाण्यास मदत होते.

Image: Google

चयापचय क्रिया एकदम बदलून टाकता येत नाही. पण ती सुधारता मात्र येते. आहारात फळं आणि पालेभाज्यांचा समावेश करुन चयापचय क्रिया सुधारता येते. आहारात क जीवनसत्वयुक्त आंबट फळांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि चयापचय क्रिया सुधारते. आहारात डाएट फूडसोबतच डाएट ड्रिंक्सचा समावेश करुन चयापचय क्रिया गतिशील करता येते. डाएट ड्रिंक्सच्या 6 प्रकारांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याचा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय सापडेल हे नक्की !

Image: Google

सफरचंद दालचिनी ड्रिंक

सफरचंद दालचिनी ड्रिंक करण्यासाठी ग्रीन ॲपल घ्यावं. एका भांड्यात ग्रीन ॲपलचे बारीक काप करुन टाकावेत. थोडी पुदिन्याची पानं धुवून घालावीत. 1 दालचिनीचा तुकडा घेऊन त्याचे अगदी बारीक तुकडे करुन घालावेत. 2 कप बर्फाचे तुकडे घालावेत. त्यात पाणी घालावं. झाकण ठेवून भांडं फ्रिजमध्ये ठेवावं, एखाद्या तासानंतर हे पाणी ग्लासमध्ये घेऊन प्यावं. ते पिताना त्यात थोडे ग्रीन ॲपलचे तुकडे आणि पुदिन्याची पानं देखील घ्यावीत. भांड्यातलं पाव भाग पाणी संपल्यावर त्यात आणखी पाणी घालावं. असं दिवसभर अनेकदा पाणी घालता येतं. 24 तासानंतर पुन्हा सर्व प्रक्रिया नव्यानं करावी आणि हेच पाणी दिवसभर प्यावं.

Image: Google

आलं- आंबा ड्रिंक

आलं आंबा ड्रिंक तयार करण्यासाठी एका भांड्यात अर्धा इंच आल्याचे बारीक काप करावेत. त्यात अर्धा कप फ्रोझन आंब्याचे बारेक तुकडे घालावेत. थोडी पुदिन्याची पानं आणि बर्फाचे तुकडे घालावेत. त्यात पाणी घालावं. झाकण ठेवावं. सर्व घटक पाण्यात नीट मिसळण्यासाठी ते तासभर तसंच ठेवावं. मग हे भांडं फ्रिजमध्ये तास दोन तास ठेवावं. एका ग्लासमध्ये पाणी भरावं. त्यात ताज्या आंब्याच्या थोड्या फोडी घालून हे पाणी प्यावं. हे पाणी पिल्यानं ताजंतवानं वाटतं. चयापचय क्रिया सुधारते आणि तोंडाला चवही येते.

Image: Google

चिया लेमोनेड

2 लहान चमचे चिया सीड्स 1 कप पाण्यात 1-2 तास भिजवाव्यात. चिया सीड्स रात्रभर भिजवल्या तरी चालतात. भिजलेल्या चिया सीड्स ग्लासमध्ये टकाव्यात. त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं आणि प्यावं. चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे चिया लेमोनेड पिल्याने पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. अनावश्यक खाणं टाळलं जातं. चिया लेमोनेड प्याल्यानं चयापचय सुधारतं. शरीरात साठून राहिलेली चरबी कमी होते.

Image: Google

जिरे दालचिनी ड्रिंक

जिरे दालचिनी ड्रिंक तयार करण्यासाठी गॅसची गरज नाही. हे ड्रिंक इलेक्ट्रिक किटलीतही करता येतं. यासाठी किटलीत 1 लिटर पाणी भरावं. त्यात 4 लहान चमचे जिरे आणी 2 दालचिनीचे तुकडे घालावेत. पाणी चांगलं उकळू द्यावं. पाणी पिण्याएवढं कोमट झालं की ते ग्लासमध्ये गाळून घ्यावं. त्यात 2-4 थेंब मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस् घालावा. पाणी चांगलं हलवून प्यावं. जिरे दालचिनी पाणी हे सकाळी रिकाम्या पोटी प्यावं.

Image: Google

बडिशेपाचा चहा

चयापचय क्रिया सुधारण्यासाठी बडिशेपाचा चहा उपयुक्त ठरतो. पोट फुगणे, दुखणे, बध्दकोष्ठता हे त्रास बडिशेपाच्या चहाने दूर होतात. बडिशेपाचा चहा करण्यासाठी 2 कप पाणी घ्यावं. गॅसवर मध्यम आचेवर ते उकळावं. काही खाल्ल्यानंतर कपात उकळलेलं गरम पाणी घ्यावं. त्यात 1 चमचा बडिशेप आणि 1 लहान चमचा लिंबाचा रस घालावा, यात लिंबाचे 1-2 कापही घालावेत, कपावर 2-3 मिनिट झाकण ठेवावं आणि मग हा चहा प्यावा.

Image: Google

आलं-दालचिनी चहा

आलं दालचिनी चहामुळे चयापचय क्रिया सुधारते. तोंडाची दुर्गंधी निघून जाते. बिघडलेलं पोटही नीट होतं. आलं दालचिनी चहा करण्यासाठी एक मोठा कप घ्यावा. त्यात व्हॅनीला बीन् सीड्स घालाव्यात. अर्धा इंच आल्याचे छोटे काप करुन घालावेत. यातच 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2 लिंबाचे काप घालावेत. यात उकळलेलं पाणी घालावं. 2-3 मिनिटं कपावर झाकणं ठेवावं. नंतर मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. दुसऱ्या कपात मिश्रण गाळून घ्यावं. हा चहा रोज संध्याकाळी घेतल्यास फायदेशीर ठरतो.

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजना