वनस्पतींचा चहा अर्थात हर्बल टी हा ताजतवानं करण्याचा एक स्वादिष्ट उपाय आहे. शिवाय या हर्बल टी मधे आरोग्यास उपकारक आणि वेगवेगळ्या आजारांवर फायदेशीर असे पोषक घटक असतात. हर्बल टीमुळे पोटाला थंडावा मिळतो, पोटास हलके वाटते. पचन सुधारण्यास हे चहा मदत करतात. हर्बल टी हा अनेक प्रकारे आरोग्यास फायदेशीर ठरतो. थंडीत होणारा सर्दी खोकल्याचा त्रास, मनावरचा ताण आणि भिती घालवण्यासाठी हे हर्बल टी उपयुक्त ठरतात. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तर हे खूपच उपयुक्त ठरतात. हर्बल टी पिण्याच्या सवयीमुळे पोटावरची चरबी, कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. कारण या हर्बल टीमधील घटक चरबी विरघळवण्यास मदत करतात, चयापचयाची क्रिया सुधारतात. त्यामुळे हर्बल टी आणि वेटलॉस अशी गट्टी जमली आहे. या हर्बल टीच्या यादीत पुदिना आणि लिंबाचा चहा हा वजन कमी करण्यासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. पुदिना आणि लिंबाच्या चहामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर ताजंतवानं होतं.
Image: Google
चवीला उत्तम, पोटात गेल्यानंतर थंडावा देणारा पुदिना आणि लिंबाचा चहा फक्त पोटावरची चरबीच कमी करत नाही तर या चहामधे पुदिना आणि लिंबात असलेले पोषक घटक उतरतात. त्यामुळे या चहात भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस , जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. हे घटक निरोगी आरोग्यास मदत करतात . शिवाय पुदिना आणि लिंबाचा हा चहा पटकन होतो . या चहाचा मुख्य फायदा शरीर विषमुक्त होण्यास आणि आतून शरीर स्वच्छ होण्यास होतो. पुदिना लिंबाचा चहा नियमित पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
पुदिना लिंबाचा चहा आणि वेटलॉस
पुदिना आणि लिंबाचा उपयोग वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यात उपचारासारखा होतो. पुदिना आणि लिंबामधे अँण्टिऑक्सिडण्टस आणि विविध पोषक घटक असतात. हे घटक वजन कमी करतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अभ्यास आणि संशोधन सांगतं की पाणी पिल्यानं शरीरात ओलावा टिकून राहातो, पाण्यामुळे चयापचय क्रिया सुधारते तसेच मधे मधे पाणी पित राहिल्यानं पोट भरलेलं राहातं. पुदिना लिंबाचा चहा यात कॅलरीज अगदीच कमी असतात. म्हणूनच हा चहा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. कारण या चहातील घटक चयापचयावर सकारात्मक परिणाम करतात, या चहातील घटक मनाला समाधान देतात आणि शरीरात ओलावा राखून ठेवण्यास मदत करतात. हा चहा पुदिना आणि लिंबामुळे मनाला ताजा करणारा सुगंध देतो. यामुळे मनात आल्हाद निर्माण होतो. शरीराला थंडावा मिळतो. म्हणूनच हिवाळा असो की उन्हाळा हा पुदिना लिंबाचा चहा आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी परिणामकारक उपाय ठरतो. कोणताही विशेष उपाय न करता घरच्याघरी वजन कमी करण्याचा, पोट कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रोज पुदिना लिंबाचा चहा पिणं होय.
Image: Google
पुदिना लिंबाचा चहा हे डिटॉक्स पेय आहे. हे रोज पिणं ही उत्तम सवय आहे. यामुळे फक्त वजन कमी होतं असं नाही तर त्वचा आणि केस सुंदर आणि निरोगी होण्यास हे डिटॉक्स पेय मदत करतं. ‘युनिर्व्हसिटी ऑफ मॅरीलॅण्ड मेडिकल सेंटर’ येथे झालेला अभ्यास सांगतो ,की पुदिना लिंबाचा चहा रोज जास्त पिला तरी तो हानिकारक ठरत नाही उलट फायदेशीरच ठरतो. या चहामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात. निरोगी आरोग्याचा मंत्र एक कप पुदिना लिंबाच्या चहात सापडेल असं तज्ज्ञ सांगतात ते उगाच नाही.
कसा करायचा पुदिना लिंबाचा चहा?
पुदिना लिंबाचा चहा करण्यासाठी अर्धा कप पुदिन्याची ताजी पानं, 2 कप गरम पाणी, अर्धा लिंबाच रस, थोडं मध एवढीचं सामग्री लागते.
हा करण्यासाठी आधी भांड्यात पाणी गरम करायला ठेवावं. पाणी उकळलं की त्यात धुतलेली पुदिन्याची पानं टाकून पातेलं दहा मिनिटं झाकून ठेवावं. दहा मिनिटानंतर हे पाणी गाळून घ्यावं. त्यात लिंबाच रस आणि मध घालून चमच्याने चहा ढवळून घ्यावा आणि प्यावा.