Join us  

दर २ तासांनी काहीतरी खावंसं वाटतं? आहारतज्ज्ञ सांगतात असं करणं चूक की बरोबर.…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 10:39 AM

What About Eating After Every 2 Hours Diet Tips : पचनसंस्थेसाठी, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होण्याच्या दृष्टीने असे खाणे योग्य की अयोग्य?

आपला आहार आणि आपले आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. आपण ज्या पद्धतीचा आहार घेतो किंवा ज्या प्रमाणात, वेळेला घेतो त्यावर आपले आरोग्य अवलंबून असते. आहाराच्या पद्धती या उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. काही जण दिवसातून २ वेळाच खातात तर काही जण ठराविक अशा ४ वेळेला योग्य प्रमाणात खातात. मात्र काही जणांना दर २ ते ३ तासांनी खाण्याची सवय असते. या सगळ्याचा त्या त्या व्यक्तीवर चांगला किंवा वाईट परीणाम होत असतो. प्रत्येकाच्या तब्येतीनुसार हा परीणाम होत असल्याने त्या व्यक्तीला आपल्यासाठी योग्य पद्धत कोणती हे माहित असते (What About Eating After Every 2 Hours Diet Tips).  

(Image : Google)

कधी रक्तातील साखर कमी करण्यासाठी तर कधी वजन कमी करण्यासाठी आपण आहारात बदल करतो. तर काहींना कामाचा ताण किंवा अन्य काही गोष्टींमुळे सतत खाण्याची इच्छा होते. एकावेळी जास्त खाल्ल्यास वजन वाढेल म्हणून दर काही वेळाने काही ना काही खाणारेही आपल्या आजुबाजूला असतात. काही जण दर २ तासांनी खातात. एकावेळी कमी खाल्ले जात असल्याने अनेकांना साधारण २ तासानंतर भूकही लागते. तर कधी ऑफीसचे काम करत असताना नाहीतर घरात असलो तरीही काहीतरी तोंडात टाकायची इच्छा होते. ज्यांचे मेटाबॉलिझम चांगले असते त्यांना अशाप्रकारे दर २ तासांनी खाल्ले तरी ते पचते किंवा त्यामुळे काही अपाय होत नाही. 

मात्र ज्यांना पचनाशी निगडीत तक्रारी आहेत अशांनी दर २ तासांनी खाणे योग्य नाही. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी याबाबत काही महत्त्वाची माहिती आपल्याशी शेअर करतात. ज्यांना इन्शुलिन घ्यावे लागते, कोठा जड असतो जे दिवसभर बैठे काम करतात किंवा जे इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत अशांनी असे दर काही वेळाने खाणे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नसते. दर काही वेळाने अन्न खाण्याने या व्यक्तींची इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होत जाते आणि त्यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. तसेच यामुळे पचनाशी निगडीत तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने अशाप्रकारे दर २ तासांनी खाणे योग्य नाही असे अंजली मुखर्जी यांचे म्हणणे आहे. मात्र आहारतज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊनच आपल्या आहाराचा पॅटर्न आपण ठरवायला हवा.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यआहार योजना