Join us  

सतत ब्रेड खाल्ल्याने होतात 5 तोटे, आवडतं म्हणून नाश्त्याला ब्रेड बटर खाण्यापूर्वी हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2022 5:35 PM

मुळात ब्रेड (bread) हे आपलं स्थानिक अन्न नाही. पण सध्या आहारात ब्रेडचा समावेश बघता तो मूळ पदार्थ असल्यासारखा वाटतो. ब्रेडचे पदार्थ कधी तरी खाणं योग्य असले तरी आरोग्याचा विचार करता (bread effect on health) रोज ब्रेड खाणं आरोग्यास अपयकारक ठरतं असं पोषण तज्ज्ञ सांगतात. 

ठळक मुद्देब्रेडचे पदार्थ लवकर पचतात. त्यामुळे सारखी भूक लागते, हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. ब्रेड खाण्यास आवडत असलं तरी ब्रेड पचन व्यवस्थेवर विपरित परिणाम करतं.ब्रेड आणि ब्रेडच्या पदार्थांमुळे रक्तातील साखर एकदम वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. 

नाश्त्याला रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. वेळ कमी पण काहीतरी तर करायचं असतंच. अशा वेळेस घरात ब्रेड बटर (bread for breakfast) असेल तर नाश्त्याचा प्रश्न सुटतो. ब्रेड बटर, ब्रेड जॅम, ब्रेडचे सॅण्डविच असे ब्रेडचे पदार्थ पटकन होतात आणि आवडीनं खाल्ले जातात. पण म्हणून नाश्त्याला रोजच ब्रेड खायचं? मुळात ब्रेड हे आपलं स्थानिक अन्न नाही.  पण सध्या आहारात ब्रेडचा समावेश बघता तो मूळ पदार्थ असल्यासारखा वाटतो. ब्रेडचे पदार्थ कधी तरी खाणं योग्य असले तरी आरोग्याचा विचार करता रोज ब्रेड खाणं आरोग्यास अपयकारक (bread side effects on health)  ठरतं असं पोषण तज्ज्ञ डेलनाज चंदूवाडिया  सांगतात. ब्रेड खाण्याचे अपाय समजून घेतल्यास रोज ब्रेड खाणं अपायकारक कसं  हे लक्षात येईल.  डेलनाज चंदूवाडीया यांनी रोज आहारात ब्रेड किंवा ब्रेडचे पदार्थ असल्यास काय अपाय होतात हे सविस्तर सांगितलं आहे. 

Image: Google

रोज ब्रेड खाल्ल्यास..

1. रोज ब्रेड खाल्ल्यास वजन वाढतं.  कारण ब्रेडमध्ये कर्बोदकं, मीठ, साखर, मैदा यांचा समावेश असतो. हे घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. ब्रेडचे पदार्थ लवकर पचतात. त्यामुळे सारखी भूक लागते, सारखं खावंसं वाटतं. यामुळे वजन वेगानं वाढू शकतं. वजन कमी करायचं असल्यास नाश्त्याला रोज ब्रेड खाणं अपायकारक आहे. उलट नाश्त्याला प्रथिनंयुक्त पदार्थ असायला हवेत. 

2. सकाळी ज्या पदार्थांनी रक्तातील साखर एकदम वाढते असे पदार्थ खाणं टाळायला हवं. ब्रेडमुळे रक्तातील साखर एकदम वाढते. ब्रेड लवकर पचतं आणि रक्तातील साखर एकदम वाढते. रोजच्या आहारात ब्रेड असल्यास मधुमेह होण्याचा धोका असतो. ब्रेडमध्ये सिम्पल कर्बोदकं असतात, त्यामुळे ते सहज पचतात आणि मधुमेहाचं कारण ठरतात. त्यामुळे नाश्त्याला रोज ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ खाणं चुकीचंच. नाश्त्याला ज्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो,  जे खाल्ल्यानंतर पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं असे पदार्थ हवेत. 

3. ब्रेडमध्ये फायबरचं प्रमाण अत्यंत नगण्य असतं. यामुळे ब्रेड खाल्ल्यानं पचनक्रिया बिघडू शकते. ब्रेड खाल्ल्यानं चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. याचा परिणाम म्हणजे बध्दकोष्ठतेचा त्रास होतो. ब्रेडच्या ऐवजी नाश्त्याला प्रोबायोटिक पदार्थ असावेत. पोटासाठी उपयुक्त जिवाणुंना प्रेरणा देणारे चयापचय क्रियेचा वेग वाढवणारे पदार्थ नाश्त्याला खायला हवेत. अशा पदार्थांमुळे ब्रेडमुळे होणारी बध्दकोष्ठतेची समस्या होत नाही.

Image: Google

4. ब्रेड खाण्यास आवडत असलं तरी ब्रेड पचन व्यवस्थेवर विपरित परिणाम करतं. ब्रेड खाल्ल्यानंतर अनेकांना पोटात गॅसेस होतात. पोट फुगतं. अनेकजण ब्रेड नीट पचवू शकत नाहीत. त्यामुळे दिवसभर छातीत जळजळ होणं, पोटात गॅसेस होणं या समस्या  जाणवतात. 

5. सकाळी नाश्त्याला ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर आळस वाटतो, झोप येते. ब्रेडचे पदार्थ चविष्ट लागत असल्यानं जास्त खाल्ले जातात. त्यामुळे पोट गच्च होतं. शरीराला जडपणा जाणवतो. उत्साह जाणवत नाही. शरीर मनाला ऊर्जा मिळत नाही. 

Image: Google

नाश्त्याला कधीमधी ब्रेड, ब्रेडचे पदार्थ खाणं वेगळं आणि रोज खाणं वेगळं. रोज ब्रेडचे पदार्थ खाल्ल्यास त्याचे अपाय होणारच. ज्या दिवशी नाश्त्याला ब्रेडचे पदार्थ असतील त्या दिवशी ब्रेडचे अपाय टाळण्यासाठी प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात करायला हवा.  तसेच मैद्याच्या ब्रेडऐवजी ब्राउन ब्रेड खाल्ल्यास ते कमी अपायकारक ठरतात. 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना