Join us  

हिरव्या पालेभाज्यांचा रस रोज पिणं आरोग्यासाठी खरंच फायदेशीर ठरते? पालेभाज्या खाणं ठीक पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2023 5:27 PM

पालेभाज्यांचा रस पिण्याचा नवा ट्रेण्ड आहे, पण तो कितपत बरा पोटाला आणि आरोग्यालाही..

ठळक मुद्देऐकीव सल्ल्याला प्रमाण मानून अनेकजण आपल्या बागेतील किंवा परिसरातील मिळतील त्या झाडांची पानं आणून ज्यूस बनवू लागले.

- वैद्य राजश्री कुलकर्णी (लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ, एम.डी आहेत.)

हिवाळा सुरू झाला की व्यायाम आणि डाएट यावर खूप चर्चा होतात. ऐकीव माहितीवर बरंच काही सुरू केलं जातं. मध्येच ते सोडूनही दिलं जातं.सध्या ग्रीन ज्यूसचं फॅड खूपच जोरात आहे ! सगळ्या हिरव्या भाज्या बारीक करून त्याचा रस काढून, गाळून पिणं असं साधारण याचं स्वरूप असतं. सकाळी व्यायाम करून आल्यावर बहुतेकजण हा असा रस पितात. यात पालक किंवा इतर पालेभाज्या, दुधी भोपळा, कोथिंबीर वगैरे आपण नेहमी वापरतो त्या भाज्यांचे रस प्यायले जात असतील तर एकवेळ तेही ठीक आहे परंतु मध्यंतरी त्यातच आणखी एक असा ट्रेण्ड आला होता की सगळ्या हिरव्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं. हे क्लोरोफिल आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे आणि ते शरीरात विषार साठू देत नाही. ते उत्तम ॲण्टी ऑक्सिडण्ट म्हणून काम करतं.  या अशा ऐकीव सल्ल्याला प्रमाण मानून अनेकजण आपल्या बागेतील किंवा परिसरातील मिळतील त्या झाडांची पानं आणून ज्यूस बनवू लागले.

मुळात पालेभाज्या या कडवट,तुरट रसाच्या असतात. आपण जेव्हा पोळी बरोबर भाजी या स्वरूपात त्या खातो तेव्हा त्यात तेल,मीठ,मसाले टाकून त्या बनवतो त्यामुळे त्या रूचकर लागतात परंतु जेव्हा त्यांचा रस काढला जातो तेव्हा बरेचजण तो तसाच पिऊ शकत नाहीत आणि मग त्यांना रूचकर बनवण्यासाठी विविध युक्ता केल्या जातात. मग कधी त्यात कडधान्यं मिसळली जातात, कधी फळं घातली जातात तर कधी सुकामेवा वापरला जातो. तर कधी साखर,बर्फ वगैरे टाकून या रसामध्ये गोडवा आणला जातो. पालेभाज्या या कितीही पौष्टिक असल्या तरी त्यांचा ज्यूस आणि स्मूदी सेवन करण्याआधी त्यांचे बरे वाईट परिणाम समजून घ्यायला हवेत.

(Image :google)

हिरव्या रसांचा फायदा१. हे रस आपण इतर कोणतीही प्रक्रिया न करता वापरत असल्यामुळे त्यातून व्यवस्थित पोषक द्रव्यं नैसर्गिकरित्या वापरल्यास मिळू शकतात.२. या ताज्या वनस्पतींमध्ये ॲण्टी ऑक्सिडण्ट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात विषार साठू देत नाहीत३. रस या पातळ,द्रव स्वरूपात वापरल्यामुळे रक्तात पोषणमूल्यं पट्कन शोषली जातात४. हिरव्या भाज्यात क्लोरोफिल असल्यानं पचन चांगलं होतं तसेच विशेषत: यकृताचं आरोग्य सुधारतं. पाचक स्त्नाव योग्य आणि चांगल्या प्रकारे स्त्रवतात.५. रक्तशुद्धी होते आणि रक्ताभिसरण सुधारतं.

(Image :google)

६. रोगप्रतिकारक शक्ती वाढते७. यकृत आणि मूत्रपिंड यांचं कार्य सुधारतं.८. अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या विरोधात शरीरात विशेष प्रतिकार शक्ती निर्माण होते९. ताज्या रसांमुळे उत्साह वाढतो, शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते.१०. त्वचा चमकदार व तुकतुकीत होते.

११. केस मजबूत आणि चमकदार होतात१२. शरीरातील आम्लाचं प्रमाण कमी होतं.१३. वय वाढल्याची लक्षणं उशीरा दिसतात१४. पोट आणि आतड्यांची कार्यशक्ती वाढते.

(Image :google)

पण फायद्यासाठी पथ्यं हवं!

१. कोणताही रस किंवा ज्यूस हा कितीही आरोग्यदायी आहे असं गृहीत धरलं तरी तो परिपूर्ण आहार होऊ शकत नाही कारण त्यात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ यांचा अभाव असतो२.जर हिरव्या भाज्यांच्या रसात साखर घालून त्याचं सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी या रसाचा काहीच उपयोग होत नाही३. पालेभाज्यातील काही भाज्या किंवा वनस्पती या औषधी गुणधर्म असणाऱ्या असतात. त्यामुळे व्यक्तिपरत्वे त्याचे होणारे परिणाम देखील विभिन्न असतात. सगळ्या वनस्पती प्रत्येक व्यक्तीला चालतीलच असं सांगता येत नाही४. काही जणांना सातत्यानं हिरवा रास प्यायल्यानं पित्त होणं, मळमळ ,उलट्या होणं, डोकेदुखी, पुरळ येणं, खाज येणं, शरीरात उष्णता जाणवणं अशा तक्रारी जाणवू शकतात तर याविरुद्ध काही जणांना वारंवार सर्दी, खोकला असे त्रास होतात.

५. अगदी नेहमीच्या वापरातील भाज्या देखील एकेकट्या अत्यंत गुणकारी असल्या तरी जेव्हा सगळ्या एकत्र करु न वापरल्या जातात तेव्हा त्या संयोगानं त्या मिश्रणाला काय नवीन गुणधर्म प्राप्त होतील आणि त्यात कशा प्रकारचे बदल घडतील हे माहीत नसल्यानं त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात.६. दीर्घकाळ केवळ असाच रसाहार करत आल्यास शरीरात इतर जीवनसत्त्वं किंवा पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते७. आपली प्रत्येकाची तब्येत, प्रकृती ही एकमेकांपेक्षा भिन्न आहे त्यामुळे काय चालेल,काय सहन होणार नाही,कशाची बाधा होऊ शकते हे सर्व व्यक्तिगणिक बदलतं.

 

टॅग्स :अन्नफिटनेस टिप्स