Eating Fast Side Effect : आपण जे काही खातो ते आपण बारीक चावून खाल्लं पाहिजे असं डॉक्टर नेहमीच सांगत असतात. 32 दात आहेत तर एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे. असंही म्हटलं जातं. पण याचा शब्दश: अर्थ न घेता जे खातो ते बारीक चावून खाल्लं पाहिजे हा हे सांगण्यामागचा उद्देश असतो. पचनक्रियेवर आपलं एकंदर आरोग्य अवलंबून असतं. जर पचन चांगलं झालं नाही तर शरीराला पोषण मिळत नाही आणि वेगवेगळ्या समस्या होतात. म्हणूनच घाईघाईनं न जेवण्याचा सल्ला दिला जातो. काही लोकांना असाही प्रश्न पडतो की, घाईघाईनं जेवलं तर वजन वाढतं का? तर फिटनेस एक्सपर्ट प्रशांत देसाई यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले एक्सपर्ट?
प्रशांत देसाई यांच्यानुसार, अन्न नेहमी व्यवस्थित बसून शांतपणे चावून खाल्लं पाहिजे. ही एक चांगली सवय आहे. पण एक घास संपत नाही तोच दुसरा तोंडात कोंबणं ही वाईट सवय आहे. असं केल्यास मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचा धोका अधिक वाढतो. यानं तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात शरीरात फॅट जमा होऊ लागतं. सवय अशीच राहिली तर पुढे तुम्ही लवकर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. एक्सपर्टनुसार, अन्न व्यवस्थित हळूवार चावून खाणाऱ्यांच्या तुलनेत घाईघाईनं खाणाऱ्यांना मेटाबॉलिज्म डिसऑर्डरचा धोका ४०० टक्के अधिक जास्त असतो.
कसं वाढतं वजन?
जेव्हा तुम्ही अन्न हळूहळू चावून खाता तेव्हा पोट मेंदुला संकेत देतो की, तुमचं पोट भरलेलं आहे. मात्र, घाईघाईने जेवण करत असाल तर तुम्ही ओव्हरईटिंग करता, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.
हळूहळू खाण्याची सवय कशी लावाल?
अन्न हळूहळू चावण्याची सवय लावण्यासाठी जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल बघणं टाळावं. तसेच जेवण करण्यासाठी जास्त वेळ द्या. घाईघाईने जेवण करू नका. जेवण करताना तुमचं लक्ष केवळ जेवणावर असलं पाहिजे. प्रत्येक घासाचा, त्याच्या चवीचा आनंद घेत खाल तरच ते तुमच्या अंगाला लागेल.
आयुर्वेदाचे जेवणाचे काही नियम
आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. असं केल्याने पचनक्रिया चांगली होते. आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर साधारण 30 मिनिटांनी पाणी प्यावे. याने पचनक्रिया व्यवस्थित होते.