राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)
डाएट हा तसा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही बॅलन्स डाएटची चर्चा जोरदार असते. पण चौरस आहार हवा, बॅलन्स डाएट हवं असं म्हणताना हे चौरस, परिपूर्ण डाएट म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला पुरेसं स्पष्ट असावं. तर मुद्दा असा की ते बॅलन्स डाएट नेमकं प्लॅन कसं करायचं? मुद्दा असा की, दैनंदिन जीवनात आपल्याला दिवसभर अनेक प्रकारची कामं करावी लागतात. कोणाला शारीरिक कष्ट जास्त असतात तर कोणाला बौद्धिक ताण जास्त असतो. काम कोणतंही असो यासाठी ऊर्जा ही लागतेच. ही ऊर्जा आपल्याला आपल्या आहारातून मिळत असते. शरीराची रोजच्या रोज होणारी झीज यातून भरून काढली जाते आणि त्याशिवाय जर अधिक ऊर्जा उरली असेल तर ती चरबी किंवा फॅट्सच्या स्वरूपात साठवून ठेवली जाते.
वास्तविक जगभरात आहाराच्या अनेक पद्धती रूढ आहेत. लाखो पदार्थ आहेत. त्या त्या देशाचं हवामान , तिथं पिकणारी धान्यं,फळं, भाज्या यावर हे सगळं अवलंबून असतं. अगदी भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला तरी उत्तरेकडे आणि अगदी दक्षिणोकडे खाल्ले जाणारे पदार्थ भिन्न आहेत. उत्तरेत गहू,मका ही धान्यं अधिक वापरली जातात तर दक्षिणेत तांदूळ, उडीद डाळ यांचा वापर अधिक आहे. यासोबतच विविध प्रकारच्या भाज्या,डाळी, पालेभाज्या, कंदमुळं, फळं,कच्च्या भाज्या यांचाही समावेश होतो.
महाराष्ट्राची भौगोलिक रचना अशी आहे की आपण साधारण देशाच्या मध्यभागी आहोत. त्यामुळे आपण गहूही खातो आणि तांदूळही. याशिवाय ज्वारी,बाजरीही खातो. अनेक प्रकारच्या डाळी-साळी रोजच्या स्वयंपाकात वापरतो. आहाराची खरी गंमत आणि गरज हीच आहे. उगीचच अमुक एक प्रमाणात कबरेदकं खा, अमूक इतके प्रोटिन्स खा, फॅट्स घ्या अशा छापील आणि जड भाषेत बोलण्यापेक्षा चौरस आहार घ्या असं म्हणणं जास्त सोयीचं आहे.
संतुलित आहार म्हणजे?
उत्तम संतुलित आहार म्हणजे आपली प्रमाणबध्द महाराष्ट्रीयन थाळी असं म्हणायला हरकत नाही. तुरीचं किंवा मुगाचं वरण,भात ,दोन भाज्या एखादी फळभाजी, पालेभाजी ,कोशिंबीर ,कोरडी किंवा ओली चटणी, कधीतरी खिचडी, कढी, ताक, क्वचित सणावारी एखादा गोडाचा पदार्थ असं नियमित जेवण घ्यायला हवं. अधूनमधून लोणचं, पापड ,कधीतरी भजी, वडे असं तळणं अशा पद्धतीचा आहार ठेवला तर रोजच्या रोज शरीराला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे पोषक घटक मिळत राहतात. उत्कृष्ट प्रतीचा स्निग्ध पदार्थ म्हणजे गाईचं तूप. दोन्ही वेळेच्या जेवणात मिळून दोन ते तीन चमचे तूप भात किंवा पोळी याबरोबर खाण्यात असेल तर महत्वाच्या सर्व अवयवांच्या उत्तम कामासाठी लागणारी ऊर्जा या तुपातून मिळते.
कच्ची भाजी,कोशिंबीर, सॅलड,फळं या गोष्टी तंतुमय असल्यानं पोट साफ राहाण्यास मदत होते. भात, पोळी,भाकरी यातून आवश्यक कबरेदकं तर वरणातून प्रथिनं मिळतात. भाज्यांमधून क्षार, खनिजं यांचा पुरवठा होतो.
त्यामुळे संतुलित आहार म्हणजे आपण काहीतरी वेगळं करणं, डाएट म्हणजे काहीतरी फॅन्सी असं मनातून काढून टाकून. आपला पारंपरिक, वैविध्यपूर्ण आहार नियमित घेणं.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)