Join us  

What Is Rainbow Diet : रेनबो डाएटचा नवा ट्रेंड, काय असते हे रंगबिरंगी डाएट? आरोग्यासाठी रंगांशी दोस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 9:07 AM

What Is Rainbow Diet : कोणत्या रंगाचे, कोणते पदार्थ खाल्ल्यास शरीराला काय फायदा होतो हे समजून घेऊया

ठळक मुद्देकलरफूल गोष्टींतून आपल्याला शरीरासाठी विविध पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे पुरेशा प्रमाणात मिळतात.निसर्गानेच निर्माण केलेल्या या रंगीबेरंगी गोष्टी खाल्ल्या तर तब्येत चांगली राहण्यास मदत होते

आपला आहार हा आपल्या एकूण तब्येतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण संतुलित, पोषक, ताजा आणि घरचा आहार घेतला तर आपली तब्येत दिर्घकाळ चांगली राहण्यास मदत होते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. निसर्ग पावसाळ्यात इंद्रधनुष्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपल्यासाठी रंगांची उधळण करतो  त्याचप्रमाणे आपल्या आहारातही ही उधळण असायला ही. विविध रंगांची फळे, भाज्या, सुकामेवा, कडधान्ये या निसर्गानेच तयार कलेल्या गोष्टींचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश ठेवल्यास आपलं आयुष्यही नक्कीच सप्तरंगी आणि इंद्रधनुष्याप्रमाणे कलरफूल होईल यात शंका नाही. आता रेनबो डाएट म्हणजे काय आणि यातील कोणत्या रंगाचे कोणते पदार्थ खाल्ल्यास शरीलाला काय फायदा होतो ? (What Is Rainbow Diet)

(Image : Google)

रेनबो डाएट म्हणजे काय ? 

रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यात ज्याप्रमाणे ७ रंग असतात त्याचप्रमाणे आपल्या आहारात या ७ रंगांच्या भाज्या आणि फळांचा समावेश करायला हवा. या रंगांमध्ये असलेल्या  पोषक तत्वांचा आपल्या शरीराला फायदा होता. सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे खाल्ल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विविध आजारांपासून आपण वाचू शकतो.  ताट इंद्रधनुष्यासारख बनवण्यासाठी त्यामध्ये लाल, हिरवा, लाल, जांभळा, पिवळा आणि नारिंगी यांसारखे विविध रंगांचे पदार्थ असणे आवश्यक आहे. या कलरफूल गोष्टींतून आपल्याला शरीरासाठी विविध पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे पुरेशा प्रमाणात मिळतात. पाहूयात यातील प्रत्येक रंगाचे आणि पदार्थांचे महत्त्व 

तांबडा - लाल

लाल फळे आणि भाज्यांमध्ये अँथोसायनिन्स नावाची रंगद्रव्ये असतात, जी तुमच्या शरीरात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात. डाळिंब, लाल मिरची, स्ट्रॉबेरी, टोमॅटो 

नारींगी - केशरी आणि पिवळा 

कॅरोटीनॉइड्स हा घटक बहुतेक केशरी आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात असतो. गाजर, लिंबू, संत्री, आंबा, पपई यांचं सेवन वाढवल्यास एकूण आरोग्याला फायदा होतो. रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि सांधे व त्वचा निरोगी राहण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो. 

(Image : Google)

हिरवा 

हिरव्या रंगाच्या पालेभाज्या तसेच काकडी, सलाड, गवार, भेंडी, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचा आहारात आवर्जून समावेश असायला हवा. हिरवा रंग हा ज्याप्रमाणे डोळ्यांना शांतता देणारा असतो तसेच तो शरीरासाठीही अतिशय उपयुक्त असतो. हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए हे घटक मुबलक प्रमाणात असल्याने आहारात यांचा समावेश महत्त्वाचा.

निळा आणि जांभळा

वांगी, जांभूळ, द्राक्षे यांसारखे पदार्थ आहारात घ्यायला हवेत. यामुळे जळजळ होण्याची समस्या असेल तर ती कमी होते तसेच स्मरणशक्तीसाठी हा रंग उपयुक्त असतो. 

तपकिरी 

यामध्ये साधारण चॉकलेटी रंगाच्या गोष्टी येतात. बदाम, आक्रोड, सर्व प्रकारची धान्ये यांसारख्या तपकीरी रंगाच्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यआहार योजनाअन्न