आपली जीवनशैली ही आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम करत असते. यामध्ये आपण घेत असलेला आहार, झोप, व्यायाम आणि आपल्या जीवनशैलीतील इतर सवयींवर आपले आरोग्य अवलंबून असते. वजन नियंत्रणात ठेवणे, सतत ताजेतवाने आणि उत्साही असणे, निरोगी आयुष्य जगणे अतिशय आवश्यक असते. यामध्ये आहाराची भूमिका सर्वात महत्त्वाची असून पोषक, घरात केलेला, ताजा आहार घेणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा कधी नाईलाजाने आपण बाहेरचे खातो. आता काय खातो हे जसे महत्त्वाचे आहे तसे किती खातो आणि कोणत्या वेळेला खातो याकडेही लक्ष देणे आवश्यक असते (What Is The Perfect Time For Dinner) .
जेवणाच्या वेळा महत्त्वाच्या...
आपले शरीर हे एखाद्या मशीनप्रमाणे काम करत असते. त्यामुळे आपण शरीलाला ज्यापद्धतीने सवय लावू तसे ते काम करते. रोजच्या ठरलेल्या वेळेला नाश्ता किंवा जेवण करणे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. अनेकदा जेवणाऱ्या वेळा बदलल्या, चुकल्या तर आपल्याला अॅसिडीटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात. याचे कारण शरीराला त्यावेळी अन्न मिळण्याची लागलेली सवय. आपल्या वेळा ठरलेल्या असतील तर आपल्याला त्या वेळेला बरोबर भूकही लागते. पण ती वेळ टळली तर भूकमोड होते असे झाल्यास तब्येतीकडे दुर्लक्ष होते आणि तब्येत बिघडण्यास सुरुवात होते.
रात्रीच्या जेवणाची वेळ काय असावी?
लवकर नीजे लवकर उठे तया आरोग्या संपत्ती लाभे ही म्हण आपण अनेकदा ऐकलेली असते. पण कामाचा ताण, वेळा, सोशल मीडिया यांमुळे आपण रात्री उशीरा झोपतो. किमान रात्री १० वाजता झोपायला हवे. तसे असेल तर ७ ते ८ च्या दरम्यान आपले रात्रीचे जेवण व्हायला हवे. झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवण होणे आवश्यक असते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होते आणि लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रेरॉल यांसारख्या जीवनशैलीशी निगडीत तक्रारी उद्भवत नाहीत. अनेक जण रात्री उशीरा जेवतात आणि जेवल्या जेवल्या झोपतात. त्यामुळे अन्नाचे पचन न झाल्याने पचनाच्या आणि आरोग्याच्या इतर तक्रारी उद्भवतात. तसेच रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे असेही आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. त्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यात व्यवस्थित अंतर ठेवल्यास आपल्याला त्याचा चांगला फायदो होऊ शकतो.