आपल्या जगण्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. ते पाळणं हे आपल्याच हिताचं असतं. हे नियम मोडणं, त्याला बगल देणं यात गंमत वाटत असली तरी शेवटी तोटा आपलाच होणार असतो. जसा वेळेचा नियम. असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट वेळ असते. ती गोष्ट जर त्या वेळेत झाली नाही तर त्याचे परिणाम नकारात्मक होतात. आपण जेव्हा फिटनेसचा विचार करतो, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा वेळ हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही उठता कधी, झोपता कधी, व्यायाम कधी आणि किती वेळ करता या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. फिटनेस आणि वेळेच्या बाबतीत आपण रात्रीचं जेवण कधी करतो या वेळेलाही खूप महत्त्व आहे. कारण रात्रीच्या जेवणाच्या वेळेचा परिणाम थेट आपल्या वजनावर होत असतो. यासंबंधी अनेक अभ्यास झालेले आहेत. हे अभ्यास सांगतात की वजन आरोग्यदायी पध्दतीनं कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण लवकर करा.
छायाचित्र- गुगल
जेवणआणि झोप यात हवं तीन तासाचं अंतर!
पोषण आहार तज्ज्ञ म्हणतात की, जेवणानंतर आपलं शरीर जोपर्यंत अँक्टिव्ह असतं, आपण काहीतरी काम करत असतो तोपर्यंत शरीरातील उष्मांक जळतात. जे उष्मांक जळत नाही ते शरीरात चरबीच्या स्वरुपात जमा होतात. झोपायच्या अगदी काही वेळ आधी जेवण केलं तर रक्तातील साखर आणि इन्शुलिन वाढायला लागतं. यामुळे आपल्याला झोपण्यासंबधीचे विकार उदभवतात. म्हणून तज्ज्ञ सांगतात की आपलं रात्रीचं जेवण हे दुपारचं जेवण आणि नाश्ता यांच्यापेक्षा हलकं असावं. झोपण्याआधी किमान तीन तास आधी जेवण करायला हवं. रात्रीचं जेवण उशिरा झालं तर त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो.
अभ्यास काय म्हणतो?
रात्रीचं जेवण आणि वजन यासंबंधी झालेला अभ्यास सांगतो की रात्री आपलं शरीर झोपेसाठी तयार होतं त्याच्या आतच आपलं जेवण झालेलं असलं पाहिजे. झोपण्याआधी शरीरात मेलाटोनिन हे हार्मोन स्त्रवतं. हे हार्मोन स्त्रवण्याआधी आपलं जेवण झालेलं असलं पाहिजे. जसा अंधार पडतो तसं शरीरात मेलाटोनिन स्रवायला लागतं. या हार्मोनचा आणि चयापचय क्रियेचा जवळचा संबंध असतो. जेव्हा आपल्या मेंदूला झोप येते तेव्हा आपण खाल्लेल्या अन्नाचं रुपांतर चरबीत होतं. यामुळे उशिरा जेवलं तर वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.
छायाचित्र- गुगल
संध्याकाळी जेवा 7 च्या आत
वजन कमी करण्यासाठी रात्री लवकर जेवायला हवं. रात्री लवकर जेवणं हे फक्त वजन कमी करण्यासाठीच महत्त्वाचं नसतं तर निरोगी राहाण्यासाठीही खूप महत्त्वाचं असतं. संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण झालं तर त्यामुळे पचन चांगलं होतं. अन्न सहज पचतं. आणि साहजिकच वजन कमी होण्यास त्याचा फायदा मिळतो. पण जर आपण उशिरा जेवण करत असू तर अन्न हे आतड्यातच पडून राहातं. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. शरीरात विषारी घटक निर्माण होतात. संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण केल्यास अन्नाचं रुपांतर चरबीत होत नाही.