Join us  

काय बिघडलं रात्रीचं शिळं अन्न सकाळी खाल्लं तर? महागामोलाचं फेकून द्यायचं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 6:26 PM

घरोघर महिलाच शिळं अन्न जास्त खातात, त्यातून त्यांच्या तब्येतीचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. शिळं अन्न खाणं मग कितपत श्रेयस्कर? (what's wrong in eating stale food?)

राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)

घरात अन्न रात्री उरतंच. त्या शिळ्या अन्नाचं काय करायचं हा घराघरातला प्रश्न असतो. हे अन्न धड टाकूनही देता येत नाही. अनेक घरात फेकून देण्यापेक्षा हे अन्न खाल्लं जातं. त्यातही मुलांना, नवऱ्याला, घरातल्या वृद्धांना कशाला शिळं द्या असं म्हणत, त्यांची काळजी घेत बायकाच शिळं खातात. अनेकजणी तर शिळी पोळी एकजरी उरलेली असली तरी खाऊन टाकतात. अन्नाची फेकझोक करणं चूक, पण म्हणून सतत शिळं अन्न खाणंही योग्य नाही.रोज अनेक पेशंट्सशी बोलताना आम्ही अगदी सविस्तर आहाराचा इतिहास विचारतो. काय खाता, केव्हा खाता, किती खाता. असे अनेक प्रश्न त्यात समाविष्ट असतात. हे विचारण्यामागचा हेतू हा असतो की त्यांना जो आजार झालाय त्यात त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा किती हात आहे?आयुर्वेदानुसार आजार बरा करायचा असेल तर केवळ औषधोपचार करून उपयोग नाही , त्याबरोबर पथ्य पाळणं, अहितकारक आहार न घेणंही महत्त्वाचंच असतं.अनेकदा महिला रुग्ण सांगतातच की आम्ही शिळ्या पोळ्या, वरण, भात, भाज्या नेहमीच खाता. अगदी टिपिकल कारण पुढे केलं जातं ते म्हणजे इतकं महागामोलाचं अन्न वाया कसं घालवायचं? फेकून कसं द्यायचं ? परवडतं का हल्लीच्या महागाईच्या दिवसात ?

(Image :Google)

शिळ्या अन्नाला आयुर्वेद ‘पर्युषित आहार’ असे म्हणतो. याचा साध्या भाषेत अर्थ असा की जे अन्न शिजवल्यानंतर एक रात्र उलटून गेली आहे असे अन्न.मग ते अन्न सकाळी शिजवलेले असो किंवा रात्री !! जेव्हापासून फ्रीजचा शोध लागला तेव्हापासून तर लोकांना असं वाटू लागलं की त्यात काहीही ठेवलं की ते कधीच खराब होणार नाही. मला पेशंट सांगतात, अहो , काही नाही , काही उरलं की आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग दुसर्या दिवशी गरम करून खातो!खरं तर असं आहे की पाणी आणि अग्नी यांचा संस्कार करून काहीही पदार्थ तयार केला की साधारण ४-५ तासात त्या पदार्थाचे गुणधर्म बदलू लागतात.त्यात रासायनिक विघटन व्हायला सुरुवात होते.  अन्न गरम राहील असे डबे , कॅसेरोल वगैरे वापरणं या सगळ्या सोयी आहेत फक्त . फ्रीज हीही अशीच एक कालानुरूप वापरायची सोय आहे. कमी तापमानात अन्न खराब करणाऱ्या जंतूंची वाढ होत नाही म्हणून केवळ त्याचा उपयोग .खरं म्हणजे दूध,ब्रेड, भाजीपाला अशा वस्तू पट्कन खराब होऊ नयेत म्हणून त्याचा वापर व्हावा ही मर्यादित अपेक्षा ठेवायला हवी, पण तसं होत नाही.आपण खरंच कपाटासारखा त्याचा वापर करतो. कच्चं पक्कं सगळं त्यात गर्दी करून कोंबतो. दूध ,दही ,भाजी , मांस-मच्छी, तयार भाजी,आमटी आणि काहीही.

(Image :Google)

आता असं शिळं अन्न खावं का?

१. तुम्ही कोणत्याही प्रकारे ते अन्न टिकवण्याचा प्रयत्न केलात तरी रात्र उलटली की त्याचे पोषक अंश कमी होतात आणि अन्न म्हणून त्याची क्वालिटी कमीच होते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नावर अतिरेकी थंडाव्याचे परिणाम होतात आणि अन्न पचायला जड होते, पचन संस्थेवर उगीचच ताण पडतो. त्यामुळे ते न खाणेच हितकर आहे .२. अनेकांना असं शिळे अन्न खाऊन अम्लिपत्त होते. जळजळ होते. दीर्घकाळ असे अन्न खात राहिल्यास शरीरात अनेक आवश्यक तत्वांची कमतरता निर्माण होते.औषधोपचारावर खर्च होतो. त्यामुळे शिळं अन्न न खाणं हेच श्रेयस्कर.

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :अन्नआरोग्य