पोळी खाल्ल्यानं वजन वाढतं असा समज करुन वजन कमी करण्यासाठी पोळी जेवणातून वजा केली जाते. पोळी या आहारातील महत्त्वाच्या घटकाकडे डाएटच्या भाषेत केवळ कर्बोदकं म्हणून बघितलं जातं. आणि वजन कमी करायचं असल्यास आहारात कर्बोदकं कमी आणि प्रथिनं जास्त हवीत या नियमबरहुकुम पोळी खाण्यावर स्वत:हून बंदी आणली जाते. पण आपलं महाराष्ट्रीयन आणि भारतीय जेवणात पोळी हा तसा महत्त्वाचा घटक आहे. आणि पोळी खाल्ली नाही तर पोट भरल्यासारखं वाटत नाही हे ही तितकंच खरं.रोजच्या आहारातली पोळी वजा न करताही आपण वजन कमी करु शकतो. त्यासाठी पोळी करताना काही पथ्यं नियम पाळायला हवेत.
छायाचित्र- गुगल
पोळीचे नियम
1. पोळी ही नरम आणि छान पांढरी व्हावी यासाठी गव्हाचं पीठ अनेकजण चाळून घेतात. त्यामुळे गव्हाच्या पिठातला कोंडा निघून जातो. पण कोंडयात वजन कमी करण्यास आणि पचन व्यवस्था सुरळीत करण्यास सहाय्य करणारे फायबर असतात. फायबर नसलेल्या पिठाच्या पोळ्या वजन वाढीस कारणीभूत ठरतात. तर अनेकजण वेळेअभावी. आयतं गव्हाचं पीठ बाजारातून आणतात. त्यात कोंडा काढून टाकलेला असतो. अशा पोळी आरोग्याचा विचार करता अजिबात पौष्टिक नसते. पोळी ही पौष्टिक होण्यासाठी आणि पोळीने वजनही कमी होण्यासाठी कणकेतला कोंडा शाबूत ठेवण्याची काळजी घ्यायला हवी.2. पोळ्यांसाठी कणीक भिजवताना त्यात इतर धान्यांचं पीठ टाकलं तर ती पौष्टिकही होते आणि त्यातलं फायबर आणखी वाढतं. अशा पोळीनं पोट लवकर भरतं. जास्त पोळ्या खाणं आपोआपच यामुळे टळतं. यासाठी निम्मी कणीक आणि निम्मं ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणीचं पीठ घ्यावं. अशा पोळीत प्रथिनं आणि फायबर हे दोन्हीही महत्त्वाचे घटक जास्त प्रमाणात असतात.
छायाचित्र- गुगल
3. पोळी आणखी कसदार करायची असल्यास कणीक मळताना त्यात भोपळा, बीट, कोबी किसून टाकावी.4. कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर ती आरोग्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे पोळी ही पौष्टिक पध्दतीनं केली तरी ती प्रमाणातच आणि भूक भागेल इतकीच खावी.