सकाळचे उरले की तेच संध्याकाळी खाणे आणि रात्रीचे पदार्थ उरले तर ते सकाळी नाश्त्याला किंवा जेवणाच्या वेळेस खाणे असे अनेकदा होते. पुरुषाला चांगले ताजे, लहान मुलांनाही ताजे आणि मग महिलावर्गाकडून हे उरलेसुरले शिळे खाल्ले जाते. पण अशाप्रकारे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरु शकते. असे करण्याने शरीरातील रसायनांची क्रिया बिघडते आणि पोटदुखी, आम्ल खवळणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच तुम्हाला आरोग्याच्या इतर काही समस्या असतील तर त्या आणखी वाढण्याचीही शक्यता असते. सध्या घरोघरी रेफ्रिजरेटर उपलब्ध असल्याने फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खराब होत नाही असा आपल्या सगळ्यांचा समज असतो. पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्नाचे पोषक घटक कालांतराने कमी होतात हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.
धावपळीच्या जीवनशैलीत अनेकदा एकदम भाज्या, फळे आणून आपण फ्रिजमध्ये ठेवतोच पण बनवलेले अन्नपदार्थ दिर्घकाळ ठेवल्यास त्यात तयार होणारे बॅक्टेरीया आरोग्यासाठी घातक असतात. महिलांना नोकरी, मुले, घरातील काम, स्वयंपाक या सगळ्यात दोन्ही वेळेस वेगळा स्वयंपाक करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा सकाळचेच फ्रिजमध्ये ठेऊन किंवा ओव्हनमध्ये गरम करुन संध्याकाळी खाल्ले जाते. पण या इलेक्ट्रीक साधनांचा जास्त प्रमाणात वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. तसेच रात्रीच्या उरलेल्या पदार्थांचे फोडणीची पोळी, फो़डणीचा भात, उरलेल्या भाजीचे थालिपीठ असे करुन हे अन्नपदार्थ खाल्ले जातात. अन्न वाया न घालविण्याचा यामागील हेतू चांगला असला तरी सातत्याने अशाप्रकारे शिळे खाणे योग्य नाही. पाहूयात शिळे अन्न खाल्लाने शरीरावर होणारे दुष्परिणाम...
पोषक घटक कमी होतात - आपण अन्नपदार्थ शिजवतो तेव्हाच त्यातील पोषक घटक काही प्रमाणात कमी झालेले असतात. पुन्हा ते तसेच ठेवले किंवा फ्रिडमध्ये ठेवले तर या पोषक घटकांचे प्रमाण आणखी कमी होते. त्यामुळे अशा अन्नातून पोट भरते खरे पण त्यातून शरीराला म्हणवे तितके पोषण मिळत नाही.
बॅक्टेरिया तयार होतात - शिळ्या अन्नात बॅक्टेरिया तयार होण्याचे प्रमाण जास्त असते. यातही ओलसर पदार्थ किंवा डेअरी प्रॉडक्टसमध्ये हे बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आणि लवकर तयार होतात. त्यामुळे शक्यतो डेअरीचे पदार्थ पाश्चराईज्ड असायला हवेत, जेणेकरुन त्यात लवकर बॅक्टेरियाची निर्मिती होणार नाही. असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यताही कमी होऊ शकते.
विषबाधा होण्याची शक्यता - अन्नातील हानिकारक बॅक्टेरियांमध्ये विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्यामुळे उलट्या, जुलाब असे त्रास उद्भवतात. हे प्रमाण जास्त झाल्यास अतिसार होण्याचीही शक्यता असते.
बुरशीजन्य घटक तयार होतात - शिळ्या अन्नावर अनेकदा बुरशी तयार होते. काही वेळा ही बुरशी सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने ती आपल्याला दिसत नाही. तसेच पदार्थ गरम करुन तो हलवला गेला तर ही बुरशी पदार्थात एकजीव होते. त्यामुळे शिळे शक्यतो खाऊच नये आणि एखादवेळी खाल्ले तर ते नीट पाहून घ्यावे.