Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > स्वयंपाक करताना, कोथिंबीर हवीच! पण फक्त स्वाद आणि गार्निशसाठी नव्हे, कोथिंबीरीचे 14 फायदे

स्वयंपाक करताना, कोथिंबीर हवीच! पण फक्त स्वाद आणि गार्निशसाठी नव्हे, कोथिंबीरीचे 14 फायदे

कोथिंबीर ही केवळ पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट स्वादापुरती म्हणून मर्यादित स्वरुपात वापरणं चूक आहे. आहार तज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ रोजच्या आहारात कोथिंबीर ही असलीच पाहिजे हे आवर्जून सांगतात ते कोथिंबीरमधे असलेल्या गुणधर्मांमुळे. आरोग्यविषयक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरणारी कोथिंबीर चटणी, पावडर, ज्यूस किंवा आपल्याला आवडेल त्या स्वरुपात खाणं महत्त्वाचं असतं असं तज्ज्ञ सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 02:16 PM2022-01-04T14:16:11+5:302022-01-04T14:30:09+5:30

कोथिंबीर ही केवळ पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट स्वादापुरती म्हणून मर्यादित स्वरुपात वापरणं चूक आहे. आहार तज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ रोजच्या आहारात कोथिंबीर ही असलीच पाहिजे हे आवर्जून सांगतात ते कोथिंबीरमधे असलेल्या गुणधर्मांमुळे. आरोग्यविषयक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरणारी कोथिंबीर चटणी, पावडर, ज्यूस किंवा आपल्याला आवडेल त्या स्वरुपात खाणं महत्त्वाचं असतं असं तज्ज्ञ सांगतात.

While cooking, you need cilantro! But not just for taste and garnish, 14 benefits of cilantro | स्वयंपाक करताना, कोथिंबीर हवीच! पण फक्त स्वाद आणि गार्निशसाठी नव्हे, कोथिंबीरीचे 14 फायदे

स्वयंपाक करताना, कोथिंबीर हवीच! पण फक्त स्वाद आणि गार्निशसाठी नव्हे, कोथिंबीरीचे 14 फायदे

Highlightsरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, हदयाचं आरोग्य सुधारण्यास कोथिंबीरचा उपयोग होतो. कोथिंबीरमधे स्थूलता विरोधी घटक असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते.सौंदर्य विषयक समस्यांचं निवारणही कोथिंबीरच्या रसामुळे होतं. 

बाजारात हिरवी गार कोथिंबीरची जुडी पाहिली की ती घ्यावीशीच वाटते. त्यात जर ती स्वस्त असली की मग दोन तीन जुड्या घेतल्या जातात. कोथिंबीरच्या वडया, दशम्या , पुऱ्या, चटणी, कोथिंबीरची कुरकुरीत भजी असे कितीतरी पदार्थ करता येतात.  कोथिंबीरला असलेल्या स्वादामुळे ज्या पदार्थात ती वापरतो त्या पदार्थाची चव आणि सौंदर्य खुलतं. कुठलाही तिखटामिठाचा पदार्थ केला की तो सजवण्याचा सोपा उपाय म्हणजे वरुन कोथिंबीर भुरभुरणे. पण कोथिंबीर ही पदार्थात प्रामुख्याने वरुन टाकली जाते. त्यामुळे कोथिंबीर फक्त पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट चवीसाठीच असते असा समज अनेकांचा असतो. कोथिंबीर स्वस्त असली की ती मूठमूठ वापरणं आणि ती महाग असली, की नाही टाकली कोथिंबीर पदार्थात तर काय बिघडतं असं म्हणून आवडत असूनही किंमतीमुळे मन मारलं जातं. 

Image: Google

पण कोथिंबीर ही केवळ पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट स्वादापुरती म्हणून मर्यादित स्वरुपात वापरणं चूक आहे. आहार तज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ रोजच्या आहारात कोथिंबीर ही असलीच पाहिजे हे आवर्जून सांगतात ते कोथिंबीरमधे असलेल्या गुणधर्मांमुळे . कोथिंबीरमधे प्रथिनं, कर्बोदकं, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, अ, ब6, क, ई, के यासारखी महत्त्वाची जीवनसात्त्वं, फोलेट, कोलिन यासारखे पौष्टिक घटक असतात . हे सर्व घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास, आरोग्य चांगलं राखण्यास, तसेच आरोग्याशी निगडित महत्त्वाच्या समस्यांवर उपाय करण्यास फायदेशीर ठरतात.  कोथिंबीर खाणं, कोथिंबीरचा ज्यूस करुन पिणं, जेवणात कोथिंबीर आणि थोडा पुदिना, ओलं नारळ घातलेली चटणी खाणं, कोथिंबीरचे पदार्थ करुन खाणं  यामुळे शरीराला निरनिराळे फायदे होतात.

Image: Google

कोथिंबीर खाल्ल्याने काय मिळतं?

1. कोथिंबीरमधील गुणांवर झालेलं संशोधन सांगतं, की कोथिंबीरच्या पानंमधे जो इथेनाॅल अर्क असतो त्यात अनेअ फ्लेवोनाॅईड असतात. हे फ्लेवोनाॅइडस शरीरात रोगप्रतिकारक म्हणून काम करतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती सुधरवतात.

2. कोथिंबीरच्या पानांमधे क्वेरसेटिन नावाचा घटक तसेच फ्लेवोनाॅइडस असतात. हे दोन्ही घटक शरीरातीतील बॅड कोलेस्टेराॅल घटवतात आणि हदयाचं आरोग्य सुरक्षित राखतात.

3.  मधुमेहासाठी कोथिंबीर उपयुक्त असते असं संशोधनातून आढळून आलं आहे. कारण कोथिंबीरमधे रक्तातील साखर कमी करणारे घटक असतात. कोथिंबीरमधील या गुणधर्मामुळे स्वादुपिंडात इन्शुलिन तयार होण्याचं प्रमाण वाढतं.

4.  नॅशनल सेंटर फाॅर बायो टेक्नाॅलाॅजी इन्फोरमेशनद्वारे झालेलं संशोधन सांगतं, की कोथिंबीरच्या सेवनामुळे पचनास फायदा होतो. कोथिंबीरमधे लिनालूल नावाचा घटक असतो. हा घटक पोट फुगी झाल्यास उपयोगात येणाऱ्या औषधासारखं काम करतं. 

5.  कोथिंबीरचा रस पिल्याने सारखी तहान लागण्याची समस्या दूर होते. 

6. कोथिंबीरमधे बुरशीरोधक , दाहरोधक गुणधर्म असतात. हे गुण अनेक प्रकारचे बुरशीजन्य आजारांचा धोका कमी करतात. शिवाय दातांना किड लागण्यापासूनही वाचवतात.

Image: Google

7.  सर्दी खोकला झाल्यास घरचा उपाय म्हणून  कोथिंबीर फायदेशीर असते. पारंपरिक उपचार पध्दतीत ऋतू बदलल्यानंतर होणारे सर्दी ताप यासारख्या आजारांमधे कोथिंबीरचा उपयोग केला जायचा, अजूनही साध्या सर्दी तापावर कोथिंबीरचा फायदेशीर ठरतो.

8.  वजन कमी करण्यासाठीही कोथिंबीरचा उपयोग होतो. कोथिंबीरच्या पानांमधे क्वेरसेटिन नामक फ्लेवोनाॅइड हा घटक असतो. क्वेरसेटिन हा घटक स्थूलताविरोधी म्हणून ओळखला जातो. या घटकामुळे वजन कमी होतं. 

Image: Google

9. कोथिंबीरच्या सेवनानं पचनाशी निगडित अनेक समस्या दूर होतात. अपचन, पोटात दुखणं, भूक न लागणं  यासारख्या समस्यांवर कोथिंबीरचा उपयोग प्रभावी ठरतो. कोथिंबीरमधील हायड्रोक्लोरिक अर्क भूक वाढवण्यास मदत करतं. त्यामुळेच भूक लागत नसल्यास कोथिंबीर खावी किंवा कोथिंबीरचा रस घेण्यास सांगितलं जातं. 

10. डोळे चुरचुरत असतील, डोळ्यांची आग होत असेल तर कोथिंबीरच्या पानांचा उपयोग केल्यास डोळ्यांच्या समस्यांवर आराम पडतो. कोथिंबीरमधील ॲण्टिऑक्सिडण्टस डोळ्यांवरील समस्यांवर उपचारासारखे काम करतात. डोळे आल्यानंतरही कोथिंबीरच्या रसाचा उपयोग केला जातो. 

11. मुखाचं आरोग्य सांभाळण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते. तोंडाला दुर्गंधी येणं, जिभेवर थर तयार होणं यासारख्या त्रास कोथिंबीरच्या रसाचा उपयोग केल्यास तोंडांचं आरोग्य, दातांचं आणि घशाचं आरोग्य चांगलं राहातं.

12.  पाळी येते तेव्हा गर्भाशयाचं तोंड आंकुचन पावतं. त्यामुळे अनेकजणींना पोटदुखी, कंबरदुखी यांचा सामना करावा लागतो. अभ्यास सांगतो, की कोथिंबीरमधे वेदना कमी करणारे आणि स्नायुंना आराम देणारे घटक असतात. कोथिंबीरमधे दाह आणि सूजविरोधी घटक असल्याने मासिक पाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी कोथिंबीरच्या सेवनानं बरीच कमी होते. 

13. गरोदरपणात 70 ते 80 टक्के महिलांना मळमळणं, उलट्या होणं या समस्या जाणवतात. चयापचय आणि संप्रेरकांमधे होणारे बदल याला कारणीभूत असतात. अभ्यास आणि संशोधन सांगतं , की असा त्रास होत असल्यास कोथिंबीर नुसती चावून खाल्ल्यानेही फायदा होतो. 

14. आरोग्यासाठी कोथिंबीर जितकी फायदेशीर तितकीच ती सौंदर्यवर्धकदेखील आहे. कोथिंबीरमधे दाह आणि सूजविरोधी घटक असतात तसेच कोथिंबीरमधे ॲण्टिऑक्सिडण्टस असल्याने त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या सुर्याच्या अति नील किरणांपासून त्वचेचं रक्षण करणे, शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरुन येणे यास्वरुपात कोथिंबीर त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तसेच कोथिंबीरच्या पानांचा रस त्वचेवर माॅॅश्चरायजरसारखं काम करुन त्वचा ओलसर आणि मऊ ठेवतो.

Image: Google

आहारामधे कोथिंबीर

आहारामधे कोथिंबीर वापरण्याचे अनेक प्रकार आहेत. कोशिंबीर, सॅलेडमधे, सुक्या ओल्या भाज्यांवर, आमटी वरणावर कोथिंबीर वरुन भुरभुरायला लागते. त्यासोबतच भाज्या- आमट्यांच्या वाटणांमधे कोथिंबीरचा उपयोग करावा.  कोथिंबीरची पुदिना घातलेली हिरवी चटणी पदार्थाची चव वाढवण्यास तसेच आरोग्यदायी गुणधर्म  यासाठी महत्त्वाची ठरते. कोथिंबीर आणि लिंबाचा भात चविष्ट लागतो, पौष्टिक असतो आणि पटकन होतो. कोथिंबीरची पीठ पेरुन भाजी खाणं, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातलेलं सूप पिणं तसेच कोथिंबीर वाळवून त्याची पावडर करुन दिवसातून 1 ते 3 ग्रॅम सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. 

Image: Google

कोथिंबीरचा ज्यूस

पचनाशी निगडित समस्यांवर उपाय म्हणून, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर डिटाॅक्स करण्यासाठी,  हाडांना कॅल्शियम पुरवून हाडं मजबूत करण्यासाठी  कोथिंबीरचा ज्यूस पिणे फायदेशीर मानलं जातं. कोथिंबीरचा ज्यूस पिल्याने पोट स्वच्छ राहातं, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येण्याची समस्या टळते. रात्री झोप नीट न लागणं, चक्कर येणं, डोकं दुखणं यावरही कोथिंबीरचा ज्यूस पिणं गुणकारी मानलं जातं. झोपेची समस्या असणाऱ्यांनी झोपण्याआधी कोथिंबीरचा ज्यूस पिल्यास चांगली झोप लागते. 

कसा करायचा कोथिंबीरचा ज्यूस?

कोथिंबीरचा रस करण्यासाठी 4-5 कप धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, 1 चमचा लिंबाचा रस, 1 इंच आलं, चिमूटभर मीठ, 1 ग्लास पाणी घ्यावं.  

कोथिंबीरचा ज्यूस करण्यासाठी सर्वात आधी कोथिंबीर निवडून, धुवून चिरुन घ्यावी. चिरलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालावी. यातच आलं किसलेलं आलं, चमचाभर लिंबाचा रस, मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घालून ते मिक्सरमधून चांगलं वाटून काढावं. त्यानंतर त्यात पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सर फिरवून घ्यावा. मिक्सरमधे बारीक केलेलं मिश्रण गाळणीने गाळून घ्यावं. कोथिंबीरचा रस सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर मानला जातो. आठवड्यातून दोन तीनदा कोथिंबीरचा रस पिल्यास आरोग्यास फायदा होतो. 

Web Title: While cooking, you need cilantro! But not just for taste and garnish, 14 benefits of cilantro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.