थंडीचा सीझन म्हणजे वर्षभरातील भरपूर फळे आणि भाज्या उपलब्ध होण्याचा कालावधी. या काळात बाजारात मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळं खाल्ली तर वर्षभरासाठी तब्येत नक्कीच चांगली राहायला मदत होईल. या भाज्या आणि फळांमुळे शरीराला भरपूर पोषक घटक मिळत असल्याने आहारात त्यांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे तज्ज्ञ वारंवार सांगत असतात. सध्या बाजारात उपलब्ध असणारे एक महत्त्वाचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबाचे आरोग्यासाठी असणारे वेगवेगळे फायदे आपल्याला माहित असतात मात्र तरीही आपण हे फळ खायचा काही वेळा कंटाळा करतो. पण डाळिंबाच्या दाण्यांमध्ये सर्वाधिक अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरीयल घटक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे थंडीच्या काळात बाजारात सहज मिळणारी डाळिंब आवर्जून खायला हवीत.
(Image : Google)
सध्या बॉडी डिटॉक्सचेही बरेच फॅड आले आहे. मग हे डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. यासाठी एकाहून एक डाएट्स दिली जातात. तसेच अनेक जण ग्रीन टी सारखे घरगुती उपायही करताना दिसतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की डाळिंब बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टी पेक्षाही उत्तम पर्याय ठरु शकतो. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ल्यूक कॉटिन्हो याने याबाबत नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने डाळिंब खाणे का फायदेशीर आहे हे अतिशय उत्तम पद्धतीने सांगितले आहे. ट्विटिरवर केलेल्या या पोस्टला नेटीझन्सनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. आता पाहूयात काय आहेत डाळिंबाचे फायदे...
डाळींब खाण्याचे मस्त फायदे
१.वेटलॉससाठी उपयुक्त
डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य चांगली राहण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि वजन आटोक्यात राहते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास नियमित डाळिंब खायला हवे.
२. सूज कमी होते
अँटीऑक्सिडंटसमुळे शरीराचा दाह, सूज कमी होण्यास मदत होते. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असल्याने ही दाहकता कमी करण्यास त्याचा उपयोग होतो. यामुळे अर्थ्रायटीससारखे आजार होण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
(Image : google)
३. हिमोग्लोबिन वाढते
डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. उत्तम आरोग्यासाठी शरीरात लोह आणि हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे असते. डाळिंबामुळे लाल रक्तपेशी वाढतात आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
४. दातांचे आरोग्य उत्तम
डाळिंबामध्ये असणारे अँटी व्हायरल घटक दातांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे डाळिंबाचे दाणे खाणे दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर असते.
५. रक्तदाबाच्या समस्येवर उपयुक्त
नियमितपणे डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी उत्तम असते. रक्तदाब ही सध्या अतिशय सामान्य समस्या झालेली असून हा रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी डाळिंबाचा रस एक चांगला पर्याय आहे.