Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं असेल तर स्वयंपाकघरातल्या या काही गोष्टींशी दोस्ती करा !

वजन कमी करायचं असेल तर स्वयंपाकघरातल्या या काही गोष्टींशी दोस्ती करा !

वजन कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांची आणि विशिष्ट डाएटची अजिबात गरज नसते. आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या, फळं, डाळी , मसाले हे अन्न पदार्थ वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहेत .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 07:46 PM2021-04-30T19:46:49+5:302021-05-01T14:25:11+5:30

वजन कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांची आणि विशिष्ट डाएटची अजिबात गरज नसते. आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या, फळं, डाळी , मसाले हे अन्न पदार्थ वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहेत .

Why look for something difficult to lose weight? All you need is your own kitchen! | वजन कमी करायचं असेल तर स्वयंपाकघरातल्या या काही गोष्टींशी दोस्ती करा !

वजन कमी करायचं असेल तर स्वयंपाकघरातल्या या काही गोष्टींशी दोस्ती करा !

Highlightsरोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या हव्यातच.डाळी आणि कडधान्यांमधे प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते.वजन कमी करण्यासाठी उकडलेला बटाटा खाणं फायदेशीर ठरतं.

वजन कमी करण्यासाठी वेगळेच पदार्थ असतात, नेहेमीपेक्षा वेगळं आणि विशिष्ट असलेलं डाएट फॉलो केलं तरच आपलं वजन कमी होणार असा अनेकींचा समज असतो. या समजूतीतूनच मग एकामागून एक डाएटच्या मागे लागलं जातं. इतकंच नाही तर जे आपल्याकडे सहज मिळत नाही असे खाण्याचे महागडे प्रकार ऑनलाइन मागवले जातात. वजन कमी करायचं तर अशी वाट वाकडी करुन चालण्याची गरज नाही. खरंतर प्रश्न जेव्हा वजन कमी करण्याचा असतो तेव्हा फक्त आहारावर अवलंबून राहून चालत नाहीच. व्यायाम आणि आहार असा संयोग असेल तरच अपेक्षित परिणाम दिसतात. कोणत्याही प्रकारचा व्यायाम जर नियमित करत असाल तर वजन कमी करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांची आणि विशिष्ट डाएटची अजिबात गरज नसते. आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या, फळं, डाळी , मसाले हे अन्न पदार्थ वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहेत . जे रोज सहज उपलब्ध असतं त्याचं महत्त्वं समजत नाही तसंच काही या अन्नपदार्थांच्या बाबतीतही होतं.


 

काकडी
काकडीमधे जवळपास ८५ टक्के पाणी असतं. काकडीमधे पाण्याचा अंश आणि तंतूमय घटक जास्त असल्यानं वजन कमी करण्यासाठी लो कॅलरी फूड म्हणून काकडी खूप महत्त्वाची आहे. काकडीमुळे इतर पदार्थांमधे जे विषारी घटक असतात तेही शरीराबाहेर फेकले जातात.

हिरव्या पालेभाज्या
रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या हव्यातच. पालक, मेथी, तांदुळका, आंबाडी, बीटाचा पाला, ब्रोकोली, कोबी या भाज्यांमधे उष्मांक आणि कर्बोदकं कमी असतात. जीवनसत्त्वं आणि खनिजं असलेल्या या भाज्या कोरड्या भाजीच्या किंवा पातळी आमटीच्या स्वरुपात खाणं फायदेशीर ठरतं.

डाळी आणि कडधान्यं
डाळी आणि कडधान्यांमधे प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते.  मोड आलेल्या कडधान्यांची उसळ, कच्च सलाड , कढण यांचं सेवन फायदेशीर ठरतं.

पनीर
यालाच कॉटेज चीज असंही म्हणतात. एरवी चीज खाणं आरोग्यासाठी फायदेशीर नसतं. पण प्रथिनंयुक्त आणि कमी उष्मांक असलेलं पनीर खाणं वजन कमी करण्यासाठी उतम पर्याय आहे. पनीरच्या सेवनातून शरीरास आवश्यक कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजंही मिळतात. शिवाय ते घरीही सहज बनवता येतं.

उकडलेले बटाटे
वजन वाढेल म्हणून अनेकजण बटाटे आहारातून वगळतात. पण उकडलेल्या बटाट्यात स्टार्च नसतात. म्हणून उकडलेला बटाटा खाणं फायदेशीर ठरतं. बटाटा उकडला की त्यातील चांगली कर्बोदकं, तंतूमय घटक आणि पोटॅशिअम वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. उकडलेला बटाटा खाल्ला की पोटभरीची भावना निर्माण होते. संध्याकाळच्या वेळेत उकडलेला बटाटा खाल्ला की एकामागोमाग एक खाण़्याच्या वाईट सवयीला लगाम बसतो.

फळं आणि सुकामेवा
वजन कमी करण्यासाठी फळं टाळून कसं चालेल? जीवनसत्त्वांचा खजिना असलेली फळं पोट भरल्याचं समाधान खूप वेळ टिकवून ठेवतात.तसेच अक्रोडसारखा सुकामेवा रोज खाल्ल्यानं वजन कमी होण्यास चालना मिळते.

लाल तिखट
भाजी आमटीत आवर्जून लाल तिखटच वापरावं. लाल तिखटानं केवळ पदार्थांना चव येते असं नाही तर शरीरातील चरबी जाळण्यासही ते उपयुक्त ठरतं. लाल तिखटाचे पदार्थ खाल्ल्यानं खाण्याचं समाधान मिळतं.

लिंंबू
लिंबू पिळून वरण आमटी करणं, सलाड वर लिंबू पिळून खाणं, लिंबू पाणी पिणं या कोणत्याही स्वरुपात लिंबू सेवन करणं गरजेचं आहे. पदार्थांमधील लिंबाच्या वापरानं पचन क्रिया सुधारते. शिवाय अतिरिक्त चरबी कमी होण्यास लिंबाची मदत होते.
वरील यादीतील सर्वच भाज्या फळं, सुकामेवा आपल्या घरात आणि जवळपासच्या दुकानात सहज उपलब्ध होतात. गरज फक्त त्यांचं महत्त्वं उमजून त्यांचा योग्य पध्दतीनं स्वयंपाकात आणि आहारात उपयोग करण्याची आहे.

Web Title: Why look for something difficult to lose weight? All you need is your own kitchen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.