Join us  

वजन कमी करायचं म्हणून भात बंद, असं कशाला? भात खा फक्त 4 नियम लक्षात ठेवा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 3:13 PM

आहारतज्ज्ञ म्हणतात भात खाणं हे चुकीचं नसून तो चुकीच्या पध्दतीनं खाणं ही चूक आहे, ती सुधारायला हवी. ती कशी?

ठळक मुद्दे दिवसातून एकदाच आणि प्रमाणात भात खा. भात भाज्यांसोबत किंवा भाज्या घालून खावा वजन कमी करण्यासाठी भात हा प्रमाणात पाणी घालून कुकरमधे शिजवावा.

 भात आणि वजन यांचं नातं काय आहे? भाताला वजनाच्या शत्रूसारखं का बरं वागवलं जातं? वजन वाढलं की आधी ‘आता मी भात बंद करणार’असं जाहीर केलं जातं. फार कमीजण आहेत ज्यांना भात आवडत नाही. बहुतांश लोकांना रोजच्या जेवणात एकदा तरी भात लागतोच. म्हणून मग वजन कमी करण्यासाठी बाकीचे काहीच उपाय न करता केवळ भात कमी करण्याचा पर्याय निवडणंही जिवावर येतं. पण त्यांच्या लेखी उपायच नसतो दुसरा काही! पण आहार तज्ज्ञ म्हणतात की, हे काही खरं नाही. रोज भात खाऊनही वजन कमी करता येतं. जर आपल्या आहारातला मुख्य आणि आवडीचा पदार्थ भात असेल तर तो फिटनेससाठी अनिच्छेने सोडण्याची अजिबात गरज नाही. उलट गरज आहे ती भात योग्य पध्दतीने खाण्याची. आहारतज्ज्ञ म्हणतात भात खाणं हे चुकीचं नसून तो चुकीच्या पध्दतीनं खाणं ही चूक आहे, ती सुधारायला हवी. ती कशी?

Image: Google

भात खाण्याची योग्य पध्दत

1. दिवसातून एकदाच- रोज दोन्ही जेवणात भात खाण्याची गरज नाही. दिवसातून एकदाच भात खा. यामुळे शरीरात कमी उष्मांक जातील. भातात मुळातच कर्बोदकाचं प्रमाण जास्त असतं. भात खाताना ताटात इतर कोणताही कर्बयुक्त पदार्थ नसावा. शिवाय भात खाताना भरपूर खाण्यापेक्षा एका विशिष्ट प्रमाणातच खाण्याची सवय लावावी. जेवताना एकदाच भात खावा. एक मध्यम आकाराची वाटी घेऊन तेवढाच भात खावा.

2. भाज्यांसोबत खावा भात- भात करतना त्यात आपल्या आवडीच्या भाज्या घालाव्यात. किंवा साधा भात रश्याच्या भाजीसोबत खावा. भातात भाज्या घालून भात केल्यास किंवा भातावर भाजी टाकून खाल्ल्यास आरोग्याला लाभही होतो आणि वजनही कमी होतं. भाज्यांमधे प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. तसेच भाज्यांमधे फायबर असल्यानं भाजी-भात खाल्ल्यास दीर्घकाळ पोट भरल्यासारखं राहातं. त्यामुळे जेवणानंतर सारखं काही खाण्याची गरज पडत नाही. पालक परतून तो भात शिजवताना त्यात घालावा. किंवा थोडं गाजर, सिमला थेंबभर तेलात परतून थोडेसे वाफवून भातात घालून खाणं फायदेशीर ठरतं.

Image: Google

3. तेला-तुपात परतणं टाळा- भात करताना भातात बटर, क्रीम, चिझ टाकू नये. वजन कमी करण्यासाठी भात हा पुरेसं पाणी घालून कुकरमधे शिजवावा. भात जर कुकरशिवाय शिजवणार असू तर आधी अर्धा तास तो पाण्यात भिजवावा. ते पाणी काढून भग जितके तांदूळ तितकंच पाणी घालून भात शिजवावा. जर भातात पाणी जास्त असेल तर भात शिजताना ते अतिरिक्त पाणी काढून टाकावं. यामुळे भातातील स्टार्च निघून जातात. असा भात शिजवताना त्यात तेल किंवा तूप घालू नये. असा भात खाल्ल्यानं वजन वाढत नाही. नियंत्रित राहातं. तांदळात पाणी घालून तो कुकरमधे शिजवून खाणं हे उत्तम . कारण या प्रक्रियेमधे अतिरिक्त तेला तुपाची गरज नसते.

Image: Google

4. आरोग्यदायी तांदळाचा पर्याय स्वीकारा- जर जेवणात दोन्ही वेळेस भात लागत असेल तर पांढर्‍या पॉलिश्ड तांदळापेक्षा ब्राउन राइस , हातसडीचा तांदूळ आता तर ब्लॅक राइस आणि रेड राइसही मिळतात. भाताचे हे प्रकार खावेत.कारण या प्रकारच्या भातात वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारे स्टार्च आणि फॅटस कमी असतात. या तांदळाचा भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. तसेच तांदूळ हे छोटे, मध्यम आणि लांब आकाराचे मिळतात. पण लहान आणि मध्यम आकाराच्या तांदळात स्टार्च आणि कर्बोदकं जास्त असतात म्हणून वजन नियंत्रित ठेवण्यसाठी, कमी करण्यासाठी लांब तांदळाचा भात खावा.