Join us  

अकाली मृत्यू टाळायचे तर अती मीठ खाण्यावर निर्बंध घाला! -जागतिक आरोग्य संघटनेचं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:59 PM

जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच ६० श्रेणीतील अन्नपदार्थांसाठी सोडियमचा अर्थात मीठाचा मापदंड निश्चित केला आहे. हा मापदंड पाळून मीठाच्या अतिसेवनानं होणारी जीवितहानी टाळण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील सर्व देशांना केलं आहे.

ठळक मुद्देमीठ जर आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केलं गेलं तर उच्च रक्तदाब, हदयरोग, पक्षाघात, किडनी विकार यासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.वेगवेगळ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमधे मीठाच्या वापराचं प्रमाण वेगवेगळं असतं. पण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे मीठाचं प्रमाण जास्त असतं हे खरं. ब्रेड, वेफर्स, मांसाहारी उत्पादनं आणि चीज यामधे गरजेपेक्षा जास्त मीठ घातलेलं असतं.जागतिक आरोग्य संघटनेच्या दीर्घकालीन नियोजनानुसार अन्न प्रक्रिया करणाऱ्या याया कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपल्या सोडियमच्या वापरात तीस टक्क्यांनी घट करायची आहे.

मीठ हा पदार्थांमधला किंबहुना आहारातला मुख्य घटक. मीठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करु शकत नाही. पण म्हणून मीठ जास्त खाणं हे आरोग्यास लाभदायक नाही. उलट त्याचे धोकेच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार असं आढळून आलं आहे की मीठ/ सोडियमचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं दर वर्षी ३ मिलियन लोक हे मरण पावत आहे. ही संख्या कमी करायची असल्यास पदार्थ पर्यावरणविषयक समज वाढवणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच ६० श्रेणीतील अन्नपदार्थांसाठी सोडियमचा अर्थात मीठाचा मापदंड निश्चित केला आहे. हा मापदंड पाळून मीठाच्या अतिसेवनानं होणारी जीवितहानी टाळण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील सर्व देशांना केलं आहे.

स्वयंपाकात मीठ हे केवळ चवीचं काम करत नाही तर शरीराची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी मीठ हा खूप महत्त्वाचा घटक आहे. मीठामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहाते. थायरॉइड ग्रंथीचं काम व्यवस्थित होण्यासाठी मीठ मदत करतं. तसेच कमी रक्तदाब रोखण्यास आणि सिस्टिक फायब्रॉसिसच्या लक्षणात सुधारणा करण्यासाठी मीठ महत्त्वाचं काम करतं. पण मीठ जर आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केलं गेलं तर मात्र उच्च रक्तदाब, हदयरोग, पक्षाघात, किडनी विकार यासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ६० श्रेणीतील अन्नपदार्थातील सोडियमच्या प्रमाणाला मापदंड लावल्यानं मीठाचं सेवन करण्याचं प्रमाण कमी होईल आणि लोकांचा जीव वाचेल. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थात सोडियमचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला असतो. प्रक्रिया केलेलं पॅकेज्ड फूडला लोकांकडून प्रचंड मागणी असते. नव्या मापदंडानुसार या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधे मीठाच्या अती वापरावर निर्बंध येणार आहेत त्याचा परिणाम अती मीठाच्या वापरातून उद्भवणाऱ्या अनेक आजारांपासून लोकांचं आरोग्य सुरक्षित राहाण्यात होईल असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेला वाटतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या दीर्घकालीन नियोजनानुसार अन्न प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी २०२५ पर्यंत आपल्या सोडियमच्या वापरात तीस टक्क्यांनी घट करायची आहे.वेगवेगळ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमधे मीठाच्या वापराचं प्रमाण वेगवेगळं असतं. पण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे मीठाचं प्रमाण जास्त असतं हे खरं. ब्रेड, वेफर्स, मांसाहारी उत्पादनं आणि चीज यामधे गरजेपेक्षा जास्त मीठ घातलेलं असतं. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या मार्गदर्शक प्रणालीनुसार १०० ग्रॅम बटाट्याच्या वेफर्समधे ५०० मिलीग्रॅम एवढं मीठ असावं. तर पाय, पेस्ट्रीजमधे १२० मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात मीठाचा वापर असावा तर मांसाहारी उत्पादनांसाठी ही मर्यादा ३४० मिलीग्रॅम इतकी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला अभ्यासादरम्यान असं आढळून आलं आहे की दररोज पाच ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी इतकं मीठ खाणं आरोग्यास लाभदायी असताना प्रत्यक्षात मात्र पाच ग्रॅमपेक्षा खूप जास्त मीठ खाल्लं जातं. त्याचा परिणाम म्हणजे तीस लाख लोक दरवर्षी हदयरोगानं मृत्यू पावत आहे. तसेच हा अभ्यास सांगतो की अती प्रमाणात मीठ सेवनानं अतीताण, हदयविकारा झटका आणि पक्षाघातासारख्या आजारांचा धोका कैक पटीनं वाढतो. जागतिक आरोग्य संघटना ही जगभरातल्या देशांना मानवाचे मृत्यू रोखण्याचं काम अतिशय माफक दरात होवू शकतं हे सांगते.  त्यानुसार फक्त मीठाचं सेवनाचं प्रमाण कमी केल्यास आपण २५ लाखांपेक्षा अधिक मृत्यू रोखू शकतो.

पोटॅशिअम हा पदार्थांच्या नैसर्गिक स्वरुपात , शुध्दीकरणाची प्रक्रिया न केलेलं धान्यं, फळं, भाजीपाला यात आढळतं. पोटॅशिअम शरीरास आवश्यक खनिजं आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित राहातं.शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं प्रमण संतुलित राहातं. पेशींचं कार्य उत्तम होतं.

शरीराची क्रिया नीट चालण्यासाठी मीठ महत्त्वाचं आहेच. पण तितकंच महत्त्वाचं म्हणजे आहारात मीठाचं प्रमाण योग्य राखलं जाणं हे आहे. संपूर्ण जगाला मीठाच्या वापरासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं घालून दिलेले मापदंड बघता आपणही आपल्या पातळीवर मीठ आवश्यकतेपेक्षा जास्त तर खात नाही ना हे तपासणं आवश्यक आहे.

मीठासंबंधीचे गैरसमज आधी दूर करा.

किती प्रमाणात मीठ खायला हवं हे पोटतिडकीनं संपूर्ण जगातल्या देशांना सांगणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं मीठाबाबतचे गैरसमजही अधोरेखित करुन वैयक्तिक पातळीवर ते दूर करण्याचं आवाहनही केलं आहे.- खूप घाम आल्यानंतर आपल्या शरीरातील मीठ कमी होतं. त्यामुळे मीठ जास्त खायला हवं, समुद्री मीठ हे नैसगिक असतं, म्हणून ते खाणं योग्य असतं, मीठाचे निर्बंध हे केवळ वयस्कर लोकांनीच पाळायला हवेत हे ते गैरसमज.ते दूरुस्त करतान जागतिक आरोग्य संघटना म्हणते की खूप घाम आल्यानंतर शरीराचं जे डिहायड्रेशन होतं ते कमी होण्यासाठी मीठाची नाही केवळ पाण्याची गरज असते. तसेच पौष्टिक घटक आणि योग्य आहार यासाठी महत्त्वाचा असतो. केवळ मीठानं हे साध्य होत नाही.