Join us  

तिखडगोड फराळ खाऊन वजन वाढलं, प्या 1 ग्लास गरम पाणी! ट्राय करा हा सोपा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 4:25 PM

आहारतज्ज्ञ म्हणतात की, दिवाळीत गोडधोड खायला घाबरता कशाला? एक पथ्यं पाळलं तर दिवाळीचे चार दिवस खाण्यापिण्याच्या आनंदावर वजन वाढीने, अपचन आणि अँसिडीने अजिबात पाणी फिरणार नाही. हे पथ्यं आहे पाणी पिण्याचं, पण तेही गरम.

ठळक मुद्देगरम पाणी हे एक वंगण घटकासारखं काम करतं. गरम पाण्यानं पचन क्रिया सुधारते आणि व्यवस्थित काम करते . गरम पाणी पिल्यानं भूक कमी लागते. भुकेवर नियंत्रण राहातं.गरम पाण्यामुळे आतडे आंकुचित पावतात आणि त्यात विषारी घटक साचून राहात नाही. ते बाहेर फेकले जातात.

मिठाया, तळलेले पदार्थ, जड जेवण याशिवाय दिवाळी पार कशी बरं पडेल. अख्खं वर्ष पडलेलं असतं खाण्या पिण्याचे नियम पाळण्यासाठी, पथ्यं आणि डाएटिंग करण्यासाठी.दिवाळीचे हे चार दिवस अनेकजण हे बाजूला ठेवून देतात, त्याकडे कानाडोळा करतात. पण अनेकजण ज्यांनी प्रयत्नपूर्वक वजन घटवलेलं असतं, जे वजनाच्या बाबतीत खूपच गंभीर असतात त्यांची मात्र द्विधा मनस्थिती होते. खाऊ की नको, खाल्लं आणि वजन वाढलं तर काय करा? अशा पेचात अडकलेले मिठाया आणि खमंग पदार्थ पाहून केवळ तोंडाला आलेलं पाणी गिळण्याचं काम करतात आणि मन मारत आवडत्या गोष्टींकडे पाठ फिरवतात. पण आहारतज्ज्ञ म्हणतात की, दिवाळीत गोडधोड खायला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपल्याला आवडतं ते मनसोक्त खा, ते गोड असू दे, तळलेले पदार्थ असू देत की जड जेवण. अजिबात बिचकू नका. एक पथ्यं पाळलं तर दिवाळीचे चार दिवस खाण्यापिण्याच्या आनंदावर वजन वाढीने, अपचन आणि अँसिडीने अजिबात पाणी फिरणार नाही. हे पथ्यं आहे पाणी पिण्याचं, पण तेही गरम.

दिवाळीच्या चार दिवसात घरी, बाहेर कुठेही काही गोडधोड, तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ले की लगेच एक ग्लास गरम पाणी प्यावं. गरम पाणी पिल्यानं तीन चार फायदे होतात. एकतर वजन वाढण्याचा धोका टळतो, शरीरावर असलेली चरबी घटवण्यास मदत मिळते.

Image: Google

गरम पाणी ते कधी आणि कसं प्यावं? आहारतज्ज्ञ म्हणतात तुम्ही जेव्हा केव्हा तळलेले पदार्थ खाल किंवा प्रमाणापेक्षा जास्तच गोड खाल्लेलं आहे असं जेव्हा होईल तेव्हा खाल्ल्यानंतर 10-15 मिनिटांनी 1 ग्लास गरम पाणी अवश्य प्यावं. गरम पाण्यानं खाल्लेल्या अन्नाचं पचन लवकर आणि सुलभ होतं. पचन नीट झालं की वजन वाढीचा धोका टळतो. खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यावंच पण सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालं आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्याआधी एक ग्लास गरम पाणी प्यावं.

गरम पाणी होतं काय?

1. दिवाळीच नाहीतर एरवीही सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालं की गरम पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. पचन व्यवस्था सुधारते. पचन सुधारलं की वजन वाढण्याचा धोका टळतो.

2. वजन कमी होण्यासाठी शरीरावरची चरबी कमी होणं गरजेचं आहे. चरबी कमी होण्यासाठी चरबी वितळणं गरजेचं असतं. ही चरबी वितळण्यासाठी दिवसभर काही वेळा गरम पाणी पिल्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या दिवसभराच्या डाएटमधे गरम पाण्याचा समावेश असायलाच हवा.

Image: Google

3. गरम पाणी पिल्यानं भूक कमी लागते. खाण्याच्या अर्धा तास आधी एक ग्लास गरम पाणी पिल्यानं जेवताना जास्त उष्मांक पोटात जाण्याची शक्यता कमी होते. प्रमाणात खाल्लं जातं. खाण्याआधी गरम पाणी पिण्याची सवय नसेल तर ती किमान दिवाळीचे चार दिवस तर पाळावी. यामुळे आवडीच तर खाल पण प्रमाणात खाण्याची हमी मिळेल.

4. गरम पाणी हे एक वंगण घटकासारखं काम करतं. गरम पाण्यानं पचन क्रिया सुधारते आणि व्यवस्थित काम करते . गरम पाण्यामुळे आहारातील असे घटकं जे पचण्यास अवघड असतात ते विरघळण्यास मदत होते.

5. दिवाळीच्या काळात काम कमी, शरीराची हालचाल कमी आणि गोड, तेलकट आणि जड खाणं जास्त होतं. त्यामुळे अन्न नीट न पचून बध्दकोष्ठता होते. त्यामुळे सणावारातही फ्रेशनेस जाणवत नाही. हे टाळण्यासाठी गरम पाणी प्यावं. गरम पाण्यामुळे आतडे आंकुचित पावतात आणि त्यात विषारी घटक साचून राहात नाही. ते बाहेर फेकले जातात. गरम पाणी पिल्यामुळे बॉडी डीटॉक्स तर होतेच शिवाय बध्दकोष्ठता होत नाही. अपचन होत नाही. पोट, शरीर छान हलकं राहातं.

टॅग्स :वेट लॉस टिप्स