वाढलेलं वजन कमी करायचं हे अनेकांपुढील एक मोठं आव्हान असतं. बांधा चांगला दिसण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वजन नियंत्रणात असणे केव्हाही फायद्याचेच. मात्र आहाराच्या चुकीच्या पद्धती, बैठी जीवनशैली, वाढते ताण आणि व्यायामाचा अभाव यांमुळे वाढलेले वजन ही एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे भविष्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्या उद्भवण्याचीही शक्यता असते. अनेकदा थायरॉईड किंवा आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळेही अचानक वजनवाढ होते. पण ही वजनवाढ आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. अशावेळी आपण वजन कमी व्हावे यासाठी डाएटच्या काही ना काही गोष्टी फॉलो करतो. (Wrong Eating Habits For Weight Loss) मात्र आहारशास्त्राची योग्य ती माहिती नसल्याने आपण फॉलो करत असलेल्या गोष्टी योग्य असतातच असं नाही. त्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी जास्त वाढतं किंवा आहे तेवढंच राहतं.
१. कमी खाणे
नेहमीपेक्षा कमी खाल्ले तर आपले वजन कमी होईल असे आपल्याला वाटते. पण अशाप्रकारे भूक मारुन वजन कधीच कमी होत नाही. कमी खाल्ल्याने आपला मेटाबॉलिझम कमी होतो आणि वजन कमी होत नाही. उलट कमी खाल्ल्याने आपल्याला सतत भूक लागते आणि पर्यायाने प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जाते. आपण खात असलेल्या अन्नातून आपल्याला पुरेसे पोषण मिळत नसेल तर शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात.
२. ग्लुटेन फ्री म्हणजे चांगले
ग्लुटेन फ्री पदार्थ खाणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते असा आपला समज असतो. म्हणून आपण बाजारात पदार्थ खरेदी करताना त्यावर ग्लुटेन फ्री असे लिहीलेले आहे का ते पाहतो. मात्र प्रत्यक्षात ग्लुटेन फ्री पदार्थ हा जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेला असू शकतो. त्यामुळे हे पदार्थ खाण्याने वजन कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढते. ग्लुटेन फ्री पदार्थात जास्त प्रमाणात कॅलरीज असू शकतात. तुम्हाला खरंच ग्लुटेन फ्रि खायचं असेल तर ब्रेड, केक, कुकीज आणि चिप्स खाण्यापेक्षा बटाटे, बिन्स आणि ग्लुटेन नसलेले धान्य खायला हवे.
३. लो फॅट किंवा फॅट फ्री डाएट
वजन कमी करायचे म्हणून काही लोक नियमित करत असलेली ही आणखी एक चूक आहे. फॅट फ्री पदार्थ खाल्ले तर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे आपण हे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खातो. आपण एखाद्या पदार्थातून फॅटस काढतो तेव्हा त्याची चव सुधारण्यासाठी त्यामध्ये नकळत साखरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात वापरले जातात. पण जास्त प्रमाणात साखर खाल्ली गेली तर आपण पुन्हा जाड होतो. त्यामुळे आपला मूळ बारीक होण्याचा उद्देश साध्यच होत नाही.
४. लो कार्ब आणि हाय प्रोटीन डाएट
आपल्या शरीराला कार्बोहायड्रेटस, स्निग्ध पदार्थ, प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे अशा सर्व घटकांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. यातील एक घटक जरी जास्त कमी झाला तरी शरीराचे काम योग्य पद्धतीने होत नाही. वजन कमी कऱण्यासाठी कार्बोहायड्रेटस कमी खायची हे योग्य असले तरी प्रमाणापेक्षा जास्त कमी खाल्ल्याने इतर तक्रारी निर्माण होऊ शकतात. तर शरीराला प्रोटीन्सची जास्त आवश्यकता असते म्हणून प्रमाणाबाहेर प्रोटीन्स खाणेही आरोग्यासाठी उपयुक्त नाही. प्रोटीन घेत असताना इतर घटकही शरीराला मिळतात का नाही ते पाहायला हवे. तसेच आपले पोट भरते की नाही तेही पाहायला हवे.