तासन् तास बैठं काम, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांमुळे वजन वाढण्याच्या तक्रारींत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातही पोटाचा घेर वाढण्याची समस्या अनेकांना सतावत आहे. पोटाचा घेर वाढणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय चांगले नसते. तसेच पोटाचा घेर वाढलेला असेल तर आपले व्यक्तिमत्त्वही चांगले दिसत नाही. म्हणूनच वेळीच पोटाचा घेर नियंत्रणात आणणे आवश्यक असते. कारण एकदा पोट वाढायला लागले की ते काही केल्या कमी होत नाही. मात्र नियमितपणे १० मिनीटे वेळा काढून काही योगासने केल्यास पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास त्याची चांगलीच मदत होते. पाहूया ही योगासने कोणती आणि ती कशी करायची (Yogasana To Reduce Belly Fat)...
१. हलासन
हलासन हे संपूर्ण शरीराला ताण देण्यासाठी अतिशय उत्तम असे आसन आहे. यामुळे पोट आणि कंबर यांवरही ताण येतो आणि याठिकाणची चरबी कमी होण्यास मदत होते. कंबरेला हाताने आधार देऊन पाय पूर्ण वर घ्यायचे आणि डोक्याच्या मागच्या बाजुला जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे पोटाला पीळ बसतो आणि पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.
२. धनुरासन
धनुरासनात पोटाचा भाग जमिनीवर असतो आणि मांड्यांपासून पायाचा पूर्ण भाग वर उचललेला असतो. तसेच पोटाच्या पुढचा भागही वर उचललेला असतो. त्यामुळे पोटावर एकप्रकारचा भार येतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
३. वशिष्ठासन
यामध्ये एक हात आणि पावलांचा काही भाग यावर शरीराचा तोल सांभाळावा लागतो. दिसायला हे आसन सोपे दिसत असले तरी प्रत्यक्षात अशाप्रकारे तोल सांभाळणे जिकरीचे असते. किमान अर्धा ते १ मिनीट या आसनात राहण्याचा प्रयत्न करायला हवा. यामुळे पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास निश्चितच मदत होते.
४. उष्ट्रासन
उष्ट्रासन हे संपूर्ण शरीराला ताण देणारे आसन आहे. पाठीचा मणका, पोटाचा घेर, हात, पाय, मांड्या या सगळ्यांना ताण पडत असल्याने उष्ट्रासन -आवर्जून करायला हवे. यामुळे पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास नक्कीच फायदा होतो.