एचआयव्ही पॉझिटिव्ह १00 महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:53+5:302021-01-16T04:29:53+5:30
सांगली : वेळेवर होणाऱ्या तपासण्या, योग्य उपचार यामुळे सांगली जिल्ह्यातील एचआयव्ही मातांच्या मुलांमधील संक्रमण नियंत्रणात येत आहे. जिल्ह्यात ...
सांगली : वेळेवर होणाऱ्या तपासण्या, योग्य उपचार यामुळे सांगली जिल्ह्यातील एचआयव्ही मातांच्या मुलांमधील संक्रमण नियंत्रणात येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात एकूण १०२ एचआयव्ही गरोदर महिलांपैकी १०० मातांची मुले एचआयव्ही निगेटिव्ह आली आहेत. तरीही शासकीय यंत्रणा हे संक्रमण पूर्णपणे थांबविण्यासाठी धडपडत आहे.
जिल्ह्यात २०१९-२० व २०२०-२१च्या डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण ११२ गरोदर महिलांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली. प्रसूती झालेल्या महिलांपैकी १०२ बाळांच्या डीएनए-पीसीआर/ॲण्टिबॉडी चाचणी करण्यात आली. त्यात १०० बाळांच्या चाचण्या निगेटिव्ह तर केवळ दोन बाळांच्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उपचार, संवाद, शिक्षण या स्तरावर काम सुरू आहे. गरोदर मातांबाबत अधिक सतर्कता बाळगून त्यांच्यातून बाळांना होणारे संक्रमण पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबत आहे. त्यामुळे हे संक्रमण नियंत्रणात येत आहे.
चौकट
दोन वर्षात ११२ बाधित महिलांची प्रसूती
गेल्या दोन वर्षात ११२ एचआयव्ही बाधित महिलांची प्रसूती झाली. या सर्व महिलांची प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर एंटीरेट्रोवाइरल थेरेपी (एआरटी) सुरू आहे. ती यापुढेही कायम राहील. दोन पॉझिटिव्ह बाळांचीही काळजी घेतली जात आहे.
चौकट
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी
एचआयव्हीबाधित महिला गरोदर असल्यास तिने वेळेवर औषधोपचार, योग्य आहार घेणे गरजेचे आहे, तर सहा महिने बाळाला अंगावर पाजले पाहिजे. नियमित तपासणी व आरोग्य विभागाचा सल्ला घेणेही आवश्यक असून, त्यामुळे बाळ निगेटिव्ह जन्माला येते.
कोट
योग्यवेळी तपासणी व योग्य उपचार यामुळे एचआयव्ही बाधित मातांमधून बाळांमध्ये होणारे संक्रमण अत्यंत कमी झाले आहे. ते शून्यावर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याकामी राबणाऱ्या सर्व यंत्रणांमुळे जिल्ह्यातील एचआयव्हीचे प्रमाणही कमी होत आहे.
- संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली