कामेरी येथील रज्जाक मुल्ला, शहाबुद्दीन मुल्ला व फारूक मुल्ला यांची कामेरी येथील पवारकी मळा परिसरात पोल्ट्री आहे.
खासगी कंपनीकडून त्यांनी कोंबड्यांची पिल्ली घेऊन ४० ते ४५ दिवस त्याचा सांभाळ करून ते कंपनीला विक्रीसाठी परत करतात. शुक्रवारी सायंकाळी कामेरी परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे पोल्ट्री परिसरातील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. हे पाणी अचानक पोल्ट्रीत शिरले. रात्रीची वेळ असल्याने बचावकार्य करता आले नाही. यामध्ये १२ हजारांहुन अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम शेंडगे, तलाठी आर. बी. शिंदे, कोतवाल ए. टी. ठोंबरे यांनी घटनास्थळांवर जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. यात सुमारे १८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.