कामटेच्या नातेवाईकास १४ दिवसांची कोठडी, सीआयडीला पुरावे मिळाले--सांगली कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:25 AM2017-12-13T00:25:54+5:302017-12-13T00:29:24+5:30
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ५२, रा. खणभाग, सांगली) याला
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ५२, रा. खणभाग, सांगली) याला मंगळवारी न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कांबळेने कामटेला मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसे पुरावेही मिळाले आहे. दरम्यान, अमोल भंडारेला घाटावर घेऊन बसलेल्या संशयित दोघांचा सीआयडीकडून गतीने शोध सुरु आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आतापर्यंतच्या तपासात बाळासाहेब कांबळे याचे नाव निष्पन्न झाले. तो कामटेच्या पत्नीचा मामा आहे.
अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने त्याला मदतीसाठी बोलावून घेतले. तो मोटारीने शहर पोलिस ठाण्यात गेला. तेथून तो पहाटेपर्यंत कामटेसोबत फिरल्याचे निष्पन्न झाले आहे.
अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेच्या पथकाने मृतदेह पोलिस बेकर मोबाईल व्हॅनमधून विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात नेला होता. पण मृतदेह व्हॅनमधून बाहेर काढला नाही. डॉक्टरलाच बाहेर बोलावून घेण्यात आले होते. संबंधित डॉक्टरची सीआयडीने चौकशीही केली आहे.
रुग्णालयाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासणी केली. यामध्ये पोलिस व्हॅनजवळ कामटेसोबत बाळासाहेब कांबळे बोलत असल्याचे दिसून आले होते. तो कशासाठी तिथे आला होता, तो कितीवेळ कामटेसोबत होता, याची सीआयडीने चौकशी केली. त्याने कामटेला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला सोमवारी रात्री अटक केली. मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘त्या’ दोघांचा शोध
अमोल भंडारेला कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन बसलेल्या दोघांचा सीआयडीकडून शोध सुरू आहे. त्यांच्याबद्दल माहितीही मिळाली आहे. या माहितीची खातरजमा व पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुरावे हाती लागताच या दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.