सांगली : जिल्ह्यातील २४४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या विकासासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून उपकेंद्रांची दुरुस्ती आणि फर्निचर खरेदी केली जाणार आहे. यानिमित्ताने गावागावांतील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या, खासदार संजयकाका पाटील, आरोग्य सभापती आशाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे आणि सर्वच पदाधिकारी, अधिकारी या कामासाठी प्रयत्न करीत होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ग्रामीण आरोग्य यंत्रणा प्रभावी करण्याचे काम गतीने सुरू आहे. कोरोना संकट काळात ५९ आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण झाले आहे. तेथे ऑक्सिजन मशीनपासून ते ताप तपासणीपर्यंत अनेक नवनव्या सुविधा झाल्या. १४ रुग्णवाहिकांची खरेदी सुरू आहे. आता आरोग्य उपकेंद्र सक्षम होतील. या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक केंद्राच्या योजनेतूनच करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या गावांमधील या केंद्रांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे शक्य झाले आहे. कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या डॉक्टरांना त्यांच्या गावाजवळच नेमणूक आहेत. आटपाडी तालुक्यातील १३, जत तालुक्यातील ३१, कडेगाव तालुक्यातील १५, कवठेमहांकाळ तालुक्यातील १९, खानापूर तालुक्यातील २२, मिरज तालुक्यातील ३६, पलूस तालुक्यातील १६, शिराळा तालुक्यातील ३३, तासगाव तालुक्यातील २८, वाळवा तालुक्यातील ३२ उपकेंद्रांचा समावेश आहे. आरोग्य वर्धिनी केंद्र उपक्रमात नूतनीकरण आणि दुरुस्तीची कामे होणार आहेत. उपकेंद्राचे काम सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या अटी असणार आहेत. त्याबाबतही संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.