सांगली : गरिबीचे चटके सोसून कसाबसा संसार करणाऱ्या एका कष्टकऱ्याच्या खात्यावर अचानक लॉटरी लागल्यासारखे १ लाख ९० हजार रुपये जमा झाले. अनेकांना असे पैसे आल्यावर केवढा आनंद झाला असता. मात्र, या व्यवहाराने तो कष्टकरी हादरला आणि चुकून आलेले हे पैसे ज्याचे हाेते त्याला परत करेपर्यंत तो थांबला नाही.
नांद्रे येथील किशोर केशव आढाव या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगलीतील एका दवाखान्यात काम करणाऱ्या आढाव यांची घरची परिस्थिती बेताची आहे. पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती ओतपोत भरलेल्या आढाव यांनी जगण्याचा नवा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. २ जुलै रोजी त्यांच्या विदर्भ कोकण बँकेच्या खात्यावर १ लाख ९० हजार रुपये जमा झाले. त्यांना मोबाइलवर मेसेज आल्यानंतर दिवसभर ते अस्वस्थ होते. त्यांना हे पैसे सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून आले होते. त्यांनी त्यांच्या बँकेकडे चौकशी केली. त्यानंतर हे पैसे चुकून त्यांच्या खात्यावर आल्याचे समजले. हे पैसे नांद्रे येथील सचिन धनकुमार पाटील यांचे होते. तीन दिवसांत याबाबत माहिती मिळाल्यानंतर खात्यांतर्गत हे पैसे त्यांनी नुकतेच पाटील यांना वर्ग केले.
पावलोपावली जिथे आर्थिक धोकाधडीचा बाजार भरला आहे. ऑनलाइन व प्रत्यक्ष फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. १०० रुपयांसाठी खुनाच्या घटनाही घडत आहेत. अशावेळी खात्यावर जमा झालेली इतकी मोठी रक्कम कोणताही मोह न बाळगता तातडीने परत करण्याचे काम आढाव यांनी केले, ही कौतुकाची बाब आहे.
चौकट
आढाव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
पैसे जमा झाल्यानंतर ना बँकेतून फोन आला होता, ना ज्याची ही रक्कम होती त्याचा फोन होता. तरीही स्वत:हून या पैशाचा स्रोत शोधत आढाव यांनी ते परत केल्याने बँक व्यवस्थापकांनी त्यांचे कौतुक केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रमही घेण्यात आला.